झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयने ऑर्डरमधील पदार्थ खाल्ल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि कंपनीची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली. कंपनीचा टीशर्ट घातलेला आणि कंपनीची बॅग असलेल्या या व्यक्तीचा बॅगेतून काढून पदार्थ खातानाचा व्हिडियो कॅमेरात कैद झाल्याने आणि व्हायरल झाल्याने कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याच प्रकारामुळे कंपनीने अखेर अशाप्रकारे चोरुन ऑर्डरमधील पदार्थ खाणाऱ्या आपल्या डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढून टाकले. अन्नपदार्थांशी अशाप्रकारे केलेली छेडछाड आम्ही खूप गांभीर्याने घेतो असे ट्विट कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन केले आहे.

यावर कंपनीने एक ब्लॉगही लिहीला आहे, त्यात कंपनी काही गोष्टी गांभिर्याने घेते असे सांगत ४ टप्प्यांमध्ये घडलेल्या घटनेबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आमच्या युजर्स, रेस्टॉरंट पार्टनर्स आणि भागीदार या सर्वांना आम्हाला या गोष्टी सांगायच्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे. डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी करायचा पदार्थ खात असल्याचे यामध्ये दिसत आहे, ही घटना मदुराईमध्ये रेकॉर्ड करण्यात आली आहे. त्याला कामावरुन काढून टाकल्याचेही कंपनीने यामध्ये म्हटले आहे. अशाप्रकारची घटना चुकून एखादवेळी घडते, त्यामुळे आमची सेवा घेणाऱ्या ग्राहकांनी एका घटनेमुळे तर्क बांधू नये असे आवाहनही कंपनीकडून करण्यात आले आहे. परंतु अशाप्रकारची घटना भविष्यात घडू नये यासाठी आम्ही टेंपर प्रूफ टेप आणि इतर सावधगिरी घेऊ असे म्हटले आहे.

आधी व्हायरल झालेला व्हिडियो…

हा ब्लॉग मोहित गुप्ता यांनी लिहीला आहे. मात्र आपण या डिलिव्हरी बॉयला काढून टाकले आहे असे पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावरुन अनेक प्रकारच्या प्रतिक्रीया आल्या आहेत. भूक ही माणसाच्या नियंत्रणाच्या पलिकडची गोष्ट आहे त्यामुळे कंपनीने इतकी कठोर शिक्षा देणे योग्य नाही असेही अनेकांनी या ट्विटला प्रतिक्रीया देताना म्हटले आहे. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने पार्सलमधील पदार्थ काढून खाल्ल्याची घटना घडली होती. हा व्हिडियो ट्विटरवर अपलोड करण्यात आला होता. त्यामध्ये तो फॉईल पेपरच्या बॉक्समधील पदार्थ खात असल्याचे दिसत आहे. मग हा बॉक्स होता त्याचप्रमाणे नीट लावून तो ठेऊन देतो आणि आणखी एक बॉक्स काढून पुन्हा त्यातील पदार्थ खायला सुरुवात करतो. मग त्यातलेही चार घास खातो आणि तो बॉक्सही ठेऊन देतो.