इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर कंपनीमध्ये अनेक फेरबदल झाले आहेत. जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे. ट्विटर ब्ल्यू टीक सेवेसाठी शुल्क घेतले जात आहे. अनेक कर्मचारी स्वत: नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. ते जाऊ नयेत यासाठी ट्विटरचे वरिष्ट अधिकारी त्यांची समजूत काढत असल्याचे काही अहवालांतून समोर आले आहे. यावर युजरला ट्विटरमध्ये चाललंय तरी काय? असा प्रश्न नक्कीच आला असेल, तर ट्विटरने एका मजेदार मिमच्या माध्यामातून ट्विटरची परिस्थिती दाखवून दिली आहे.
झोमॅटोने आपल्या ट्विटर हँडलवरून एक मिम शेअर केला आहे. यातून इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी स्वीकारण्यापूर्वी कंपनीची परिस्थिती आणि ट्विटरची मालकी स्वीकारल्यानंतरची परिस्थिती खाद्यपदार्थांच्या छायाचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.
मिममध्ये डाव्या बाजूला न शिजवलेली स्पेगेटी दाखवण्यात आली आहे, जी मस्क यांनी ट्विटरची धुरा सांभाळण्यापूर्वीची परिस्थिती दर्शवते, तर उजव्या बाजूला नुडल्स दाखवण्यात आले आहेत, जे ट्विटरची सध्याची परिस्थिती दर्शवत आहेत. एकमेकांत गुतलेले नुडल्स इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतरची परिस्थीत दर्शवत असल्याचे झोमॅटोने आपल्या मिममधून सांगितले आहे.
झोमॅटोने हे मिम शेअर केल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्सनी झोमॅटोच्या पोस्टचे कौतुक केले आहे, तर काहींनी झोमॅटो प्रमाणे ट्विटरची परिस्थिती छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवली आहे.