कचऱ्यातून खतनिर्मिती होते, बायोगॅसही तयार होतो पण त्यावर कडी करत निर्मला कांदळगांवकर यांनी कचऱ्यापासून वीजनिर्मितीही सुरू केली आहे, इतकंच नव्हे तर याच कचऱ्यातून अनेक स्त्रियांसाठी रोजगार उपलब्ध झाला असून कचरा वेचण्यातून ‘स्वच्छ भारत’ उद्दिष्टही साध्य होत आहे. कचऱ्यालाच आपलं भांडवल बनवून सुरू झालेली ‘विवाम’ अ‍ॅग्रो टेक ही कंपनी आता ‘विवाम’ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड कंपनी झाली आहे. या भरारीविषयी..
मुलं मोठी झालीत. त्यामुळे स्वत:ला गुंतवून घेण्यासाठी काही तरी करायचंय. पण उद्योग असा हवा की त्याचा कच्चा माल जवळच उपलब्ध व्हायला हवा. त्यातून अशिक्षित महिलांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा आणि त्यातून तयार होणाऱ्या उत्पादनासाठी बाजारपेठही जवळच हवी. असा विचार करत असतानाच
निर्मला कांदळगावकर यांना कच्चा माल सापडला जो सगळीकडे सहज उपलब्ध असतो, कचरा!
कचरा प्रत्येक घराघरातून रोजच्या रोज तयार होत असतो. गावात तो उकिरडय़ावर फेकला जातो तर शहरात पालिकेच्या गाडीतून नेऊन डम्पिंग ग्राऊंडवर ओतला जातो. एकेका शहरातून शेकडो टन कचरा निर्माण होतो आणि तो साचत जाऊन डिम्पग ग्राऊंडवर कचऱ्याचे डोंगर तयार होत राहातात. आता हा ज्वलंत प्रश्न मानला जात असला तरी २००० मध्ये जेव्हा निर्मला यांनी या विषयावर काम करायचं ठरवलं त्या वेळी याची व्याप्ती आणि तीव्रता फारशी कोणाला भिडली नसावी. पण दूरदृष्टीच्या निर्मला यांनी या विषयावर अभ्यास सुरू केला. पारंपरिकरीतीने कचरा विभक्तीकरण आणि विघटन या दोन्ही गोष्टी खूपच वेळखाऊ होत्या. त्यांनी कृषी विद्यापीठात पर्यावरण विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदविका घेत दोन र्वष या विषयाचा अभ्यास केला आणि शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाटीच्या पद्धती शिकून घेतल्या. सुरुवातीला आसपासच्या गावात सभा घेऊन लोकांमध्ये या प्रश्नाबद्दल जागरूकता निर्माण करायला सुरुवात केली.
एकदा औरंगाबादमधल्या माळीवाडा येथे सभेत एका गरीब महिलेने निर्मला यांना विचारलं की, आम्ही रोज वीस रुपये रोजावर मिळेल ते काम करतो. तुम्ही आम्हाला काही काम का देत नाही? त्या वेळी केवळ जनजागृतीच्या माध्यमातून समाजसेवा न करता हा कचरा वापरून आपण रोजगारनिर्मिती करू शकतो हे निर्मला यांना प्रकर्षांनं जाणवलं. त्यानंतर मात्र समाजोपयोगी पण तरीही उत्पन्न देणारा हा उद्योग सुरू करून तो वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले.
अशिक्षित, गरीब महिलांच्या माध्यमातून गावागावातून, घराघरातून ओला कचरा गोळा करायचा. शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे विघटन करून गांडूळ खत बनवायचं आणि ते आसपासच्या शेतकऱ्यांना विकायचं या कामाने व्यवसायाची सुरुवात झाली. गावातला कचरा गावातच जिरेल, स्वच्छता राहील, तिथल्या शेतकऱ्यांना कमी खर्चात उत्तम सेंद्रिय खत मिळेल, गावातल्या स्त्रियांना रोजगार मिळेल आणि रासायनिक खतविरहित अन्न सगळ्यांनाच मिळेल, असा बहुउद्देशीय उपक्रम लोकांनाही आवडला आणि अगदी थोडय़ाच काळात या खताची मागणीही वाढली. मग काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या व्यवसायाचं क्षेत्र वाढत गेलं. २००१ मध्ये ‘विवाम’ अ‍ॅग्रो टेक’ या कंपनीची स्थापना करून त्यामार्फत निर्मला गांडूळ खत बनवायचा प्रकल्प उभारून गावातल्या स्थानिक लोकांना तो चालवायचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. हा उपक्रम शेतकऱ्यांना इतका आवडला की त्यांनी स्वत: सरकारी कार्यालयात मागणी करून त्यावर अनुदान मिळवले. ५ हजार रुपयांचे हे अनुदान सरकारने कंपनीच्या नावाने द्यायला सुरुवात केली. जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनीही येऊन या उपक्रमाची पाहणी केली, मंत्रालयातूनही चौकशी करण्यात आली. ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांत शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्यासाठी आणि नेपाळमधेही हे प्रकल्प त्यांनी उभे करून दिले आहेत.
गावाबरोबरच शहरातही हा उपक्रम राबवता येईल का हा विचार सुरू झाला आणि कचऱ्यापासून बायोगॅसनिर्मितीचे प्लांट बनवले गेले. त्यातून बनणारा गॅस अन्न शिजवण्यासाठी वापरला जातो. त्यानंतरची पुढची झेप म्हणजे कचऱ्यापासून वीजनिर्मिती! निर्मला आणि त्यांचे पती गिरीश कांदळगावकर यांनी भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राकडून (बी.ए.आर.सी.) त्याचं तंत्रज्ञान विकत घेतलं. ‘विवाम’च्या टीमने त्यात हवे ते बदल करत उपयोगी असं बायोगॅसपासून वीजनिर्मिती करायचं सयंत्र विकायला सुरुवात केली. एक टन कचऱ्यातून साधारणत: ५ किलोवॅट वीज निर्माण होते. ही वीज स्वत: वापरता येते किंवा वीज कंपन्यांना विकतासुद्धा येते. त्यातून उपउत्पादन म्हणून द्रवरूप खतही मिळतं. शिवाय स्थानिक महिलांना प्रत्येकी आठ ते दहा हजार रुपये महिना इतकं उत्पन्न मिळू शकतं. सुरुवातीला ‘विवाम’ हा पूर्ण प्रकल्प उभा करून देते. त्यानंतर मात्र स्थानिक लोकांनी तो चालवायचा असतो. औरंगाबाद, नांदेड, पुणे या ठिकाणांच्या आसपास टेंडर भरून असे काही प्रकल्प त्यांनी सुरू केले आहेत. काही वेळा मात्र स्थानिक लोकांच्या इच्छाशक्ती अभावी चांगले सुरू असलेले प्रकल्प बंदही पडतात. त्यामुळे लोकसहभाग असेल तरच हे प्रकल्प यशस्वी होतात हे निर्मला आवर्जून सांगतात.
पुढे सरकारी कामकाजात सोप्पं पडावं यासाठी २००७ मध्ये कंपनी प्रायव्हेट लिमिटेड झाली आणि आता ‘विवाम’ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि’ या नावाने प्रसिद्ध आहे. निर्मला यांचे पती, मुलगा आणि मुलगीही आता ‘विवाम’मध्ये कार्यरत आहेत. आता कंपनीचे कामकाज खूप वाढले असून त्यांची स्वत:ची इंजिनीअर टीम आहे. विविध प्रकारचे संशोधन करणे, ग्राहकाच्या गरजेनुरूप मशीन बनवून देणे ही कामे या टीममार्फत केली जातात. खत आणि वीज निर्माण करणारे मशीन, पालिकेकडे येणारा टनावारी मिश्र कचरा विभक्त करणारे मशीन, प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणारे मशीन, एका दिवसात कचऱ्यापासून खत निर्माण करणारं मशीन, कचरा वाहून नेणारी वाहने, अशा एक ना अनेक गोष्टी ‘विवाम’मार्फत बनवल्या जातात.
पण सगळाच्या सगळा कचरा एका जागी नेऊन त्याचे विघटन करण्यापेक्षा स्थानिक पातळीवरही प्रयत्न केले पाहिजेत असं त्यांना वाटलं आणि त्यामुळे घरच्या घरी अगदी कमी जागेत गांडूळ खत आणि बायोगॅस तयार करायचं उपकरणही त्यांनी लोकांना उपलब्ध करून दिलं आहे. निर्मला म्हणतात की, आपल्याकडे टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनसाठी जागा असते, तशीच या उपकरणासाठीही छोटी जागा ठेवायची. त्याचा वास वगैरे येत नाही आणि तुमचा ओला कचरा शून्य होतो. सगळा कचरा आपणच निर्माण करतो त्यामुळे ‘कचऱ्याला आपलं म्हणा’ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे.
आज मोठी उलाढाल असणारा हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा मानला जात असला तरी सुरुवातीला निर्मला यांना बराच विरोधही झाला. लोकांकडून सहकार्य मिळणे फार त्रासदायक ठरले पण तरीही जिद्दीने त्या लोकशिक्षण करत राहिल्या. मी कचरा घेणार नाही मात्र तुम्ही केलेलं खत विकत घेईन, असं सांगून लोकांना कचऱ्यापासून खत तयार करायला उद्युक्त केलं. ज्येष्ठ नागरिक संस्थांमध्ये या कामाचा प्रसार केला. एका ज्येष्ठ नागरिकाने आणखी पाच ओळखीच्या लोकांची नावं सांगायची आणि निर्मला यांनी त्या पाच घरी जाऊन आपल्या कामाचा प्रसार करायचा, अशी एक स्कीमही त्यांनी राबवली. हळदीकुंकूसारख्या कार्यक्रमात प्लास्टिकच्या वस्तू लुटण्यापेक्षा सेंद्रिय खत लुटा, असं सांगत स्त्रियांमध्येही या कामाचा प्रचार केला आणि स्वच्छतेचा हा वसा लोकांना दिला. त्यामुळे हळूहळू अनेक लोकांना या कामाची उपयुक्तता कळली.
निर्मला यांचं रोजगार उत्पन्न करणारं आणि तरीही समाजाच्या भल्याचं काम पाहून त्यांना नॅशनल वुमन आंत्रप्रनर (‘टाटा टीआयई स्त्री शक्ती’), अवनी मित्र (तळवलकर ट्रस्ट), पुण्य रत्न (पुणे), चाणक्य पुरस्कार (पी.आर.सी.आय. मुंबई), इमर्जिग एक्सलन्स (मुंबई), वुमन सुपर अचिव्हर (वर्ल्ड वुमन लीडरशिप काँग्रेस) अशा अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं आहे. भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत समिती’मध्येही त्यांचा सहभाग आहे, त्यामार्फत वाराणसीमध्येही त्यांचं काम सुरू आहे. स्वच्छ डम्पिंग ग्राऊंड, स्वच्छ गाव आणि शून्य कचरा ही त्यांची संकल्पना आहे आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. पण हे स्वप्न त्यांचं एकटीचं असून चालणारं नाही तर आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपण हे स्वप्न सत्यात उतरवलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचीच साथ जरुरी आहे.

विवाम सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि,
औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक
६६६.५्र५ंेॠ१४स्र्.ू.्रल्ल
+९१ ९४२३७८१३०४
ल्ल्र१ें’ं@५्र५ंेॠ१४स्र्.ू.्रल्ल

maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
pune best city for women loksatta news
महिलांना काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या पहिल्या पाच शहरांत पुण्याला स्थान

सल्ला
कचरा व्यवस्थापन हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. पर्यावरणाशी निगडित या व्यवसायामुळे तुम्ही रोजगार निर्माण करताच शिवाय तुमचं गाव स्वच्छ ठेवता. त्या कचऱ्यातून बनलेलं सेंद्रिय खत तुमचे शेतकरी वापरतात आणि रासायनिक खतविरहित असं अन्न तुम्हालाच परत मिळतं.
उद्दिष्ट
गावागावातले डम्पिंग ग्राऊंड स्वच्छ करून ती जागा मुलांना खेळायला मैदानं म्हणून ग्रामपंचायतीला सुपूर्द करणे. एक गाव एक बायोगॅस करून पाइपलाइनद्वारे गॅस घराघरात पोहोचवणे, वीज तयार करणे, बचतगटाच्या मार्फत ही कचरा व्यवस्थापनाची कामे करून गाव स्वयंपूर्ण बनवणे.

– स्वप्नाली मठकर

Story img Loader