आधीच जगावर संकटे काही कमी नाहीत. करोना विषाणूचे संकट, देशोदेशींच्या टाळेबंदीमुळे आर्थिक संकट आणि आता टाळेबंदी उठत असल्यामुळे नव्या प्रश्नांचे संकट! या नव्या प्रश्नांचा एकंदर सूर असा की नेमके संकट कोणते होते- टाळेबंदी हेही संकटच होते की टाळेबंदी उठवली जाणे हे संकट आहे? असो. मुद्दा एवढाच की, संकटे आधीच भरपूर आहेत हे साऱ्या जगाला मान्य आहे. आणि तरीही जगभर चिंता मात्र एकच होती.. ‘किम जाँग उन हल्ली दिसत कसे नाहीत?’
हे किम जाँग उन म्हणजे काही शेजारच्या इमारतीतले कुलकर्णी किंवा शहा नव्हेत.. ‘हल्ली दिसत कसे नाहीत?’ विचारायला. अर्थात, हल्ली कुलकर्णी वा शहा का दिसत नाहीत वगैरे प्रश्न कुणालाही पडेनासे झालेले आहेत. ‘घरातच बंद असतील’ हे उत्तर सर्वानाच शेजारच्या इमारतीतील लोकांबद्दल, किंवा शेजारच्या इमारतीच्या पलीकडली.. तिच्याही शेजारची, मागच्या रस्त्यावरली.. सर्वच इमारतींतील लोक हल्ली का दिसत नाहीत हे सर्वाना माहीत आहे. पण किम जाँग उन हे प्रासादात राहणारे. उत्तर कोरियाचे ते सर्वेसर्वा नेते. त्यांच्या मनात येईल तेव्हा ते चित्रवाणीवर दिसू शकतात. मनात येईल तेव्हा नभोवाणीवरून मनातली गोष्ट जनतेला ऐकवू शकतात. तरीही किम जाँग उन दिसले नाहीत म्हणून जगाला घोर लागला. कुणी म्हणाले, फार आजारी होते हो ते! कुणी म्हणाले, हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागली.. अशी शस्त्रक्रिया अपयशी झाली की संपले सारे! हे ‘कुणी’-कुणी साधेसुधे नाहीत : उत्तर कोरियाच्या पार्लमेण्टाचे दोघे सदस्य, तैवानचे हेरखाते, शेजारच्या दक्षिण कोरियातील स्वतंत्र प्रसारमाध्यमे.. हे सारे जण किम यांची वाईट बातमीच सांगत होते.
किम हे हुकूमशहा. किंवा एकाधिकारशहा. हे दोन्ही प्रकारचे शहा जातात तेव्हा असे गुपचूपच जातात. किम गेले तर मग हुकूमशहा म्हणून जगाने कुणाकडे बोट दाखवायचे? चीन, रशिया, तुर्कस्तान, अमेरिका.. बोटाने दिशा तरी किती शोधायच्या? त्यापेक्षा हुकूमशहा म्हणून एखादेच किम असलेले बरे. पण तेच नसतील तर चिंताच! ही चिंता किम यांनीच दूर केली.. परवा कुठूनसे ते एका ‘स्फुरद खत कारखान्या’च्या उद्घाटन सोहळय़ाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले दिसले आणि जगाने नि:श्वास सोडला. ‘आजारी होते ’ म्हणणाऱ्यांना सपशेल माफी मागावी लागली! पण पुन्हा तीन दिवस झाले.. आता पुन्हा कुणी म्हणेल – ‘किम दिसले नाहीत कुठे..’
विश्वगुरू होऊ पाहणाऱ्या आमच्या देशात, आमच्या घरातील संगणकावर हा सारा घटनाक्रम पाहताना आम्हांस शिशु-बाल-तरुणपणीच्या घोषपथकातील धून आठवली.. ‘किम् सत्यम्, किम् मिथ्यम्, किम्प्रतिगच्छति मोक्षो.. ’ – मोक्ष कुणालाही कशानेही मिळो; पण सत्य काय आणि मिथ्य काय, कोण जाणे!