करोनामुळे अनेकांचा श्वास रोखला गेला, तरीही आमची श्वसनक्रिया मात्र सुरूच. कारण एकच :  वाचकांपर्यंत सारे काही ताजे पोहोचवण्याची आमची धडपडी वृत्ती. अतिशय खडतर स्थितीत आम्ही ती जोपासत असताना सोनियाजींच्या एका सूचनेमुळे हा श्वास थांबतो की काय, धडपडय़ा वृत्तीला लगाम बसतो की काय, या शंकेने आमच्या विश्वाची पार झोप उडाली आहे. जाहिराती हा माध्यमविश्वाला उभे ठेवणारा महत्त्वाचा टेकू, तोच काढून घ्या, असे पराभवाच्या गाळात रुतलेला हा पक्ष म्हणतो. ‘घर फिरले की घराचे वासे फिरतात’ अशी एक म्हण आहे. त्याचा संदर्भ तर या मागणीमागे नसेल ना, अशी शंका आता आम्हाला यायला लागली आहे. सारी माध्यमे सरकारची बटीक झाली आहेत, असा सार्वत्रिक समज गेल्या सहा वर्षांत देशभर फोफावला. काही ठिकाणी तर याचा फैलाव करोनापेक्षा जास्त वेगाने होता. हा समज अर्थसत्यावर आधारित आहे हेही अनेकदा दिसून आले, पण सत्तेविना तळमळत असलेल्या काँग्रेसला मात्र हा समज खरा वाटत असावा असे या मागणीतून सिद्ध होते. आमचा दुसरा तर्क जरा वेगळा आहे. नाही तरी माध्यमे ‘आपली’ राहिलेलीच नाहीत, मग करा मागणी व सरकारी वहाणेमार्फत ठेचून टाका या विंचवांची नांगी असा मतलबी विचार यामागे असू शकतो. समजा, मोदीजींनी ऐकले तर तेच खलनायक ठरतील, आपले काय जाते, असाही स्वार्थ यामागे असावा. आमच्यातल्याच काहींचे म्हणणे आणखी वेगळे. सध्याचे सरकार जाहिरातबाज म्हणून ओळखले जाते. त्यावर कुठाराघात करण्यासाठीच ही मागणी जाणीवपूर्वक काँग्रेसने समोर केलेली असू शकते. आता हे तर्क, समज थोडे बाजूला ठेवू व वास्तवाचा विचार करू. माध्यमविश्व हा भलेही व्यवसाय असला तरी लोकशाहीतील प्राण अशीही त्याची ओळख आहे. आता तोच फुंकायच्या गोष्टी काँग्रेस करत असेल तर राज्याराज्यांतील त्यांच्या सरकारांच्या जाहिरातधोरणाचे काय? तिथेही अखंडपणे हे प्रतिमासंवर्धन सुरूच असते. मग काँग्रेसची त्यांच्या सरकाराविषयीची भूमिका आम्हाला नको का कळायला? तसेही प्रश्न विचारणे आमचे मूळ कार्य. आपल्यावरचे संकट गहिरे झाले की जरा जास्तच प्रश्न सुचू लागतात. त्यामुळेच काँग्रेसी राज्यांकडे लक्ष वेधले इतकेच! संकट कोणतेही असो, त्याचा सर्वाधिक फटका गरिबांना बसतो. तो सर्वासमक्ष आणण्याचे काम आमचे. आता आम्हीच संपलो तर हे काम करणार कोण? गलितगात्र काँग्रेसमध्ये तेवढी धमक तरी उरली आहे का? त्यात  सध्याच्या राजवटीने साऱ्यांचीच विभागणी दोन गटांत केलेली. पैकी एक गट काँग्रेसकडे आशेने बघणारा. यात आमच्यातील काही जण आहेत हे सोनियाजींना कुणी तरी सांगा हो! सध्याची राजवट कशीही असली तरी काँग्रेस मात्र सहिष्णू वागणारा पक्ष. या प्रतिमेला तडा जाईल असे वागणे बरे नव्हे! सोनियाजी, येतील हो, तुमचेही बरे दिवस येतील.. तोवर संकटकाळी साऱ्यांच्याच पोटात थोडी थोडी भाकर जाऊ द्या. उगीच एकाचे पोट भरावे म्हणून दुसऱ्याला उपाशी ठेवू नका. आमच्यातलेच काही बोरुबहाद्दर तुमच्या मागणीवजा पत्राची रचना करणारा सल्लागार कोण याचा शोध घेण्यात गुंतले आहेत. तूर्तास त्यांना आम्ही रोखले आहे. ही मागणी तातडीने मागे घेतली जाईल, या आशेने!