नवी दिल्ली : सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी बॅसल ३ भांडवली आवश्यकतेचे पालन करताना ‘एटी १’ रोख्यांद्वारे चालू वर्षांत १८,००० कोटींची उभारणी केली आहे. चालू वर्षांत स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र अर्थात महा बँकेकडून या रोख्यांच्या माध्यमातून निधी उभारणी करण्यात आली. आणखी काही बँकांकडूनदेखील लवकरच या माध्यमातून निधी उभारणी केली जाण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, एटी १’ रोख्यांच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षांत ३०,००० कोटींचा निधी बँकांकडून उभारला जाण्याची आशा आहे.

 येस बँकेने २०२० मध्ये ‘एटी १’ रोख्यांद्वारे ८,४१५ कोटींची निधी उभारणी केली होती, मात्र तिच्या ‘एटी १’ रोख्यांची संपूर्ण थकबाकी ही निर्लेखित (राइट ऑफ) केली गेल्याने गुंतवणूकदारांनी धसका घेतला होता. मात्र या क्षेत्रात चांगल्या दर्जाच्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकादेखील आहेत, जेथे दिवाळखोरीचा धोका नगण्य आहे. या प्रकारच्या रोख्यांमधील जोखमींमुळे जास्त व्याज उत्पन्न मिळते. हे रोखे शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी असले तरी जारी केलेल्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीनंतर त्यांचे विमोचन करता येते.

कोणी किती निधी उभारला?

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षांत ७.७५ टक्के व्याजदराचे अतिरिक्त श्रेणी १ (एटी १) रोख्यांद्वारे सर्वाधिक ६,८७२ कोटींचा निधी गोळा केला. त्यापाठोपाठ खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने ७.८४ टक्के व्याजदराने ३,००० कोटी, बँक ऑफ बडोदाने ७.८८ टक्के व्याज देऊन २,४७४ कोटी, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेने प्रत्येकी २,००० कोटी, युनियन बँकेने १,३२० कोटी आणि महा बँकेने ८.७४ टक्के व्याज देऊन ७१० कोटींचा निधी उभारला आहे. रोख्यांद्वारे उभारल्या गेलेल्या भांडवली रकमेमुळे बँकांच्या व्यवसाय वाढीला चालना मिळेल.

Story img Loader