ठाणे : प्रकृती अतिशय गंभीर असलेल्या भिकाजी निर्गुणे (३९) यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच अशापद्धतीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. भिकाजी यांना एकप्रकारे हा दुसरा जन्मच असल्याचे त्यांचे कुटुंबिय सांगत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकणातील कुडाळ भागात भिकाजी हे त्यांची पत्नी, दोन मुलांसह राहतात. ते एसटी महामंडळात यांत्रिक विभागात काम करतात. घरी असताना ३ जुलैला त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु हृदय विकाराचा झटका तीव्र असल्याने त्यांना कोल्हापूर येथील एका रुग्णालयात हलविण्यात आले. तिथेही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांना मुंबईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार भिकाजी यांच्या कुटुंबियांनी त्यांना मुंबईतील एका शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्या हृदयाचे प्रत्यारोपण करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संपूर्ण निर्गुणे कुटुंबियांना धक्का बसला. या हृदय प्रत्यारोपणास लाखो रुपयांचा खर्च येणार होता.

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातील डाॅ. प्रवीण कुलकर्णी हे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करु शकतात. अशी माहिती तेथील डाॅक्टरांनी त्यांना दिली. त्यामुळे ३ ऑगस्टला निर्गुणे कुटुंबियांनी भिकाजी यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्यांना तात्काळ अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तेथे त्यांच्यावर औषधोपचार आणि वैद्यकीय यंत्रांद्वारे तपासणी करण्यात येत होती. तसेच त्यांच्या प्रकृतीवर डाॅ. कुलकर्णी यांच्याकडून लक्ष ठेवले जात होते.

हृदय प्रत्यारोपणासाठी रक्तगट आणि वयाचा विचार केला जातो. भिकाजी यांचे ‘ओ-पाॅझिटीव्ह’ रक्तगट आहे. त्यानुसार २४ ऑगस्टला मध्यरात्री ३ वाजता ओ पाॅझिटीव्ह रक्तगट असलेले हृदय नानावटी रुग्णालयात उपलब्ध झाल्याची माहिती ज्युपिटर रुग्णालयास मिळाली. प्रशासनाने तात्काळ मुंबई आणि ठाणे पोलिसांच्या मदतीने ग्रीन काॅरिडोर तयार केले. अवघ्या ३५ मिनीटांमध्ये हे हृदय ज्युपिटर रुग्णालयात आणण्यात आले.

त्यानंतर कुलकर्णी आणि त्यांच्या डाॅक्टर कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ शस्त्रक्रिया सुरू केली. चार तासांच्या आत ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रुग्णाची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात येईल अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. भिकाजी यांना आमच्या रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यांना दाखल करून आम्ही तात्काळ उपचार सुरू केले होते. हृदय मिळाल्यापासून चार तासांच्या आत ही शस्त्रक्रिया पार पडणे आवश्यक असते. सुदैवाने हृदय मुंबईत मिळाल्याने शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. – डाॅ. प्रवीण कुलकर्णी, हृदयविकार तज्ज्ञ, ज्युपिटर रुग्णालय.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 39 year old patient heart transplant successful for the first time in thane district zws