इस्लामिक वास्तुशैलीचे हाजी अली दर्गा हे प्रार्थनास्थळ मुंबई महानगरीचे प्रमुख आकर्षण आहे. या दग्र्याचे बांधकाम पांढऱ्याशुभ्र ‘मक्करा’ संगमरवरांनी केले आहे. या जुन्या प्रार्थनास्थळावर मुघल व इंडो-इस्लामिक बांधकाम शैलीचा प्रभाव आहेच. दग्र्याच्या बांधकामाने सुमारे ४,५०० चौ. मीटर इतकी जागा व्यापलेली असून हे बांधकाम सुमारे ८५ फूट उंचीचे आहे. दग्र्यामध्ये प्रवेश केल्यावर व बाहेरील बाजूस नजर टाकल्यावर या वास्तूच्या भव्यतेची कल्पना येते.
जागतिक कीर्तीच्या मुंबई महानगरीची शान, ऐट वाढविण्यात ज्या अनेक वारसावास्तू आहेत त्यात हिंदू, ख्रिश्चन, पारसी, ज्यू समाजाच्या धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या वास्तूंच्या पंक्तीत ‘हाजी अली दर्गा’ ही वारसावास्तू समुद्राच्या एका छोटय़ा बेटावर उभी आहे. ही वास्तू जरी मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असली तरी सर्व धर्मीय भाविक, पर्यटक, अभ्यासकांचे आकर्षण आहे. ‘हाजी अली दर्गा’ ही वास्तू भर समुद्रात दिमाखात उभी आहे. आपल्या देशात भर समुद्रात उभारलेली ही एकमेव वारसावास्तू आहे. इतकेच नव्हे तर भारताचे प्रवेशद्वार ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या आकर्षक वास्तूप्रमाणे ही वास्तू म्हणजे मुंबई शहराची ओळखच झाली आहे. म्हणूनच मुंबई स्थलदर्शनात या अजब वास्तुदर्शनाचा समावेश आहेच.
पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकास उतरून पश्चिमेकडील रेसकोर्सच्या दिशेने आल्यावर चारस्त्ये एकत्र आलेला एक चौक लागतो. येथूनच ‘हाजी अली दर्गा’कडे जाता येते. प्रत्यक्ष दग्र्याकडे जाण्यासाठी सुमारे ५०० मीटर लांबीचा काँक्रीटचा भक्कम रस्ता आहेच. हा रस्ता स्वातंत्र्यपूर्वकाळात १९४४ साली बांधला गेला. मात्र या पायवाटेनी जाण्यासाठी समुद्राच्या भरती-ओहोटीचे वेळापत्रक सांभाळावे लागते, कारण भरतीच्या वेळी हा मार्ग पाण्याखाली जातो.
आपल्याकडील कोणत्याही धार्मिक स्थळी भाविकांना आवश्यक असलेल्या वस्तूंची विक्री करणारे असतात तसे विक्रेते येथेही आहेतच. दग्र्याची छायाचित्रे, दग्र्यासंबंधी सविस्तर माहिती सांगणाऱ्या सीडी, पुस्तके, फुलविक्रेत्यांचा त्यात समावेश आहे.
प्रत्यक्ष दग्र्याकडे जाताना मार्गस्थ होत दग्र्याच्या नजीक आपण पोहोचतो तेव्हा बाहेरील अखंड वाहत्या रस्त्यावरच्या वाहनांचा आवाज येईनासा होतो. डावीकडील महालक्ष्मी मंदिराची वास्तू येथून दिसते. अथांग सागराचे रूप न्याहाळत काही मिनिटांत आपण दर्गा इमारतीशी पोहोचतो तेव्हा प्रथम प्रवेशद्वाराशी आकर्षक कमान लागते. त्यावरील उर्दू भाषेत दग्र्याचे नाव लिहिलेले आहे.
प्रवेशद्वार ओलांडून एका प्रांगणात आपण येतो तेव्हा तेथील पांढऱ्याशुभ्र फरशांचे अंगण लागते. येथे सभोवतालच्या शोभेच्या झाडांमुळे दर्गा परिसराचे वातावरण अधिकच प्रसन्न वाटते. प्रथमत: अंतर्गत भागात चौकोनी आकाराचा दर्गा आपल्याला दिसतो. दग्र्यात प्रवेश करण्यासाठी स्त्री-पुरुषांना वेगवेगळे मार्ग आहेत. दग्र्याच्या बाहेरील बाजूस छोटेसे कारंजेही आहे. प्रमुख दग्र्याच्या मागील बाजूस दोन प्रशस्त प्रार्थना मंडप असून बाहेरील उंच मीनार, दग्र्याच्या मध्य बाजूस चित्ताकर्षक घुमट दिसतात. या घुमटाच्या आतील बाजूस रंगीत आरसेकाम, काचेचे झुंबर यातून इस्लामिक वास्तुशैलीची ओळख होते, तर दर्गा भिंतीवरील विविधरंगी पाना-फुलांच्या नक्षीकामाच्या पाश्र्वभूमीवर ‘आयाती’ (मंत्र) ठळकपणे चितारलेले आहेत.
दग्र्याच्या मध्यभागी पीर हाजी अली शहा बुखारी यांची कबर आहे. या कबरीवर आकर्षक कलाकुसर आहे. अनेक प्राचीन वास्तू, प्रार्थनास्थळे निर्मितीला दंतकथांची जोड आहे. ही हाजी अली कबर यांच्याबद्दल अनेक दंतकथा आजही सांगितल्या जातात. प्रारंभी ही कबर साधेपणाने उभारली गेली; परंतु कालांतराने ती कलात्मकरीत्या आकर्षक करण्यात आली. या दग्र्याला भेट दिल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मुंबईतील वांद्रे येथील मतमाऊलीच्या प्रार्थना स्थळाप्रमाणे या कबरीच्या दर्शनासाठी सर्व धर्मीयांची नेहमीच गर्दी असते, हे विशेष.
इस्लामिक वास्तुशैलीचे हे प्रार्थनास्थळ मुंबई महानगरीचे प्रमुख आकर्षण आहे. हाजी अली दग्र्याचे बांधकाम पांढऱ्याशुभ्र ‘मक्करा’ संगमरवरांनी केले आहे. या जुन्या प्रार्थनास्थळावर मुघल व इंडो-इस्लामिक बांधकाम शैलीचा प्रभाव आहेच. दग्र्याच्या बांधकामाने सुमारे ४,५०० चौ. मीटर इतकी जागा व्यापलेली असून हे बांधकाम सुमारे ८५ फूट उंचीचे आहे. दग्र्यामध्ये प्रवेश केल्यावर व बाहेरील बाजूस नजर टाकल्यावर या वास्तूच्या भव्यतेची कल्पना येते. समुद्रात बांधलेले हे दर्गा बांधकाम ज्यांनी निर्माण केले ते कारागीर तसे उपेक्षित आहेत. सागराचे बदलते स्वरूप आणि निसर्गराजाच्या बदलत्या वातावरणातही ही वास्तू आपले अस्तित्व टिकवून आहे. यातून वास्तुविशारदांच्या दूरदृष्टीसह त्यांचा बांधकामातील अभ्यास जाणवतो.
समुद्रावरील भलेभक्कम खडकावर हे बांधकाम उभारले आहे. मूळच्या बांधकामाचे पावित्र्य राखून त्याला आकर्षक चेहरा देण्यासाठी १९१६ मध्ये स्थापन झालेल्या विश्वस्तांची कल्पकता जाणवते.
दर दिवशी सुमारे १० ते १५ हजार भाविक पर्यटक या प्रार्थनास्थळाला भेट देत असतात, तर रमझान, ईद तसेच रविवार या सुट्टीच्या दिवशी ही संख्या लाखांच्या घरात जाते.
या दर्गा प्रार्थनास्थळाचे विश्वस्त संचालित येथील दैनंदिन काम चाललेले असते. त्याचप्रमाणे सढळ हातांनी आर्थिक मदत करणाऱ्या भाविकांच्या देणगीतून वास्तुसंवर्धन आणि दैनंदिन कामकाज चाललेले आहे.
शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराप्रमाणेच हाजी अली दर्गा सर्व धर्मीयांसाठी खुला आहे. सर्व धर्मीयांना येथे प्रवेश असल्याने त्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशही दिला जातो.
साईबाबा आणि पीर हाजी अली शहा बुखारी या अवतारी पुरुषांना धर्माभिमानापेक्षा धर्माचरण करण्यातच स्वारस्य होते हेच त्यांच्या जीवनप्रवासातून दिसते.
सागरातील अलौकिक स्मारक
हाजी अली दग्र्याचे बांधकाम पांढऱ्याशुभ्र ‘मक्करा’ संगमरवरांनी केले आहे.
Written by अरुण मळेकर
आणखी वाचा
First published on: 26-12-2015 at 01:02 IST
Web Title: About haji ali dargah construction