अरबी समुद्रात निर्माण झालेले तौते चक्रीवादळाचा गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातला फटका बसत आहे. हे वादळ मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. मुंबईच्या समांतर समुद्रातून हे चक्रीवादळ पुढे जाणार असून, त्याचा परिणाम मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह राज्याच्या किनारपट्टी भागात बघायला मिळत आहे. देशात करोनाचे मोठे संकट आहे. संपुर्ण देश याचा सामना करत आहे. मात्र आता पुन्हा एकदा संकटात वाढ झाली आहे.  या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून राज्यात चक्रीवादळाला सामोरे जाण्याच्या तयारीची माहिती घेतली.

राज्याच्या सद्य स्थितीव्यतिरिक्त, शहा यांनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी उपलब्ध संसाधने आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तैनात केंद्र व राज्य सरकारच्या एजन्सीजची माहिती घेतली. गोवा व्यतिरिक्त, गुजरात, महाराष्ट्र आणि दमण आणि दीव यांनी चक्रीवादळाशी सामना करण्याच्या तयारीचा आढावा गृहमंत्र्यांनी घेतला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गावांमध्ये चक्रीवादळामुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर शेकडो घरांचे नुकसान झाले आहे आणि विजेचे खांब व झाडे कोसळले आहेत. हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले आहे की, ‘तौते’ हे अतिशय तीव्र चक्रीवादळ येत्या २४  तासात आणखी तीव्र होऊ शकते आणि ते गुजरातच्या किनारपट्टीकडे जात आहे.

गुजरातच्या किनारपट्टी भागात पोहचत असलेल्या चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत केले असून मालमत्तेचे नुकसान केले आहे. यामुळे कर्नाटकात एकाचा आणि गोव्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. येत्या २४ तासांत चक्रीवादळ तीव्र स्वरुपाचे रूप धारण करू शकेल आणि त्याचा परिणाम गुजरातच्या किनारपट्टी भागात दिसून येईल. भारत हवामान खात्याने (आयएमडी) रविवारी हा इशारा दिला आहे. दरम्यान, करोना रूग्णांना गुजरात आणि महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातील विविध रुग्णालयांमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

Story img Loader