ताई शिकवायला लागल्या की काही क्षणांमध्ये त्या रागाशी एकरूप व्हायच्या. मग कधी त्या यमन व्हायच्या, तर कधी मालकंस! हळूहळू आम्हालाही यमन झाल्यासारखे वाटायचे. मीरेला जशी कृष्णाची आस होती, तशीच ताईंना स्वराची ओढ होती. त्यांच्या संपूर्ण आयुष्यालाच सौंदर्याचा परीसस्पर्श लाभला होता. त्यांना मृत्यू आला तोदेखील असाच- त्यांनी स्वत: सौंदर्याने रेखाटल्यासारखा..
बैठकीच्या खोलीत व्यवस्थित सुरात लावलेले तानपुरे.. ते छेडत बसलेले आम्ही तीन-चार शिष्य.. जुळवून ठेवलेले स्वरमंडल.. तानपुऱ्यांच्या सुरांनी भारलेली खोली.. आज इतक्या वर्षांनीही सगळे काही अगदी लख्ख दिसते. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भक्त थांबलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्या तानपुऱ्यांच्या सुरांनी भारलेल्या खोलीत बसलेल्या आम्हा शिष्यांच्या चेहऱ्यावरील भाव एकच! देवपूजा आटपून ताई कधी येतात, याचीच आस आम्हाला लागलेली असायची. तानपुऱ्यांच्या गुंजनाने आम्ही आधीच ध्यानाच्या अवस्थेत पोहोचलेलो असायचो. मग ताई देवपूजा करून त्या खोलीत येत त्यावेळी तर साक्षात् देवी सरस्वती आल्यासारखेच वाटे.
मग तालीम सुरू व्हायची. त्या शिकवायला सुरुवात करायच्या. त्या नेहमी म्हणायच्या की, ‘तुम्ही रागाला शरण जा, गुरूला शरण जा!’ पण गुरूला शरण जाणे म्हणजे काय, हेही ताईंसारख्याच व्यक्तिमत्त्वामुळे आम्हाला अनुभवता आले. आमचा गुरू एवढा थोर होता, की ज्याच्याकडे पाहण्यासाठी नजर वर करावी तर नजर ठरत नसे. त्यांच्या याच मोठेपणामुळे आम्हाला शरणभाव कळला. संगीतविषयकच नाहीत, तर जीवनविषयक अनेक बारीक बारीक संवेदना आम्हाला त्यांच्यामुळे.. त्यांच्या सान्निध्यात अनुभवता आल्या.
ताई राग शिकवायला घ्यायच्या त्यावेळी मला आठवते की त्या थोडय़ाशा बेचैन, अस्वस्थ असत. हळूहळू दोन-चार आवर्तने झाली की त्या रागाशी एकरूप होत असत. त्यानंतर मग एक-दोन आवर्तने मी गात असे. एक-दोन आवर्तने रघु (रघुनंदन पणशीकर) गायचा. ताईंच्या सान्निध्यात वातावरण असे तयार व्हायचे, की आमचे देहभान हरपायचे. यमन शिकवत असल्या तर काही वेळाने ताईच यमन झाल्यासारखे वाटत असे. हळूहळू तो राग आम्हा सगळ्यांनाच कवेत घेऊ लागायचा. यमन रागाच्या अवकाशाचा विस्तार व्हायचा आणि संपूर्ण जगच यमन झाल्यासारखे वाटायचे. ही मनोवस्था विलक्षण आणि विस्मयचकित करणारी असते. ताईंनी त्या अवस्थेशी आमची ओळख करून दिली. आणि हीच ताईंनी आम्हाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट आहे. मला ताई साक्षात् परीस असल्यासारख्या भासतात. देवी सरस्वती भासतात. त्या यमन वाटतात. संपूर्ण मालकंस वाटतात. ताईंसारखी विदुषी ना कधी झाली आणि ना कधी होईल!
माझ्यासाठी ताई म्हणजे विचारांचा अविरत वाहणारा नायगारा होत्या. तो कधीच संपत नाही. कधीच आटत नाही. अगदी मन नेईल तिथे घेऊन जाणारा गळा त्यांना लाभला होता. पाण्यासारखा प्रवाही गळा! त्यांच्या असामान्य प्रतिभेला पंख देणाऱ्या दैवी गळ्याची जोड त्यांना लाभली होती. त्या जोडीला अंगी असलेली अभ्यासू वृत्ती! आमची ही शिकवणी चालायची, त्यावेळीही अधेमधे ‘संगीत रत्नाकर’सारखे अनेक ग्रंथ घेऊन त्यांचे संशोधन चाललेले असायचे. आयुष्यभर त्यांनी सुरांचा ध्यास घेतला होता. म्हणूनच मला त्या मीराबाईंसारख्या वाटतात. मीरेला जसा कृष्ण, तसाच ताईंना स्वर! जन्मभर त्यांनी त्या स्वराचीच आराधना केली. ताई योगिनी होत्या. त्या तळमळीने शिकवणाऱ्या गुरूमाऊली होत्या. इतर कुठल्याही गायकाकडून कधीही न ऐकलेल्या असंख्य जागा आम्हाला ताईंच्या गळ्यातून लीलया ऐकायला मिळाल्या आहेत. माझ्याच नाही, तर लाखो मनांच्या अंधाऱ्या कोपऱ्यांना स्पर्श करणाऱ्या, आर्ततेने आणि उत्कटपणे गाणाऱ्या ताईंची गातानाची ती आत्ममग्न मुद्रा कायमची माझ्या- आणि मला खात्री आहे की, लाखोंच्या मनावर कोरली गेली आहे.
ताईंच्या स्वभावातील मला भावणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्या खऱ्या होत्या. सच्च्या होत्या. त्यांच्या गळ्यातून निघणाऱ्या स्वरांइतक्याच सच्च्या! आपल्या विचारांशी, आदर्शाशी अतिशय इमानदार असलेल्या ताई कधीच कोणत्याही प्रलोभनांना भुलल्या नाहीत. मग ती रसिकानुनयाची प्रलोभने असोत, वा इतर कोणतीही! मला आठवते, एका मोठय़ा समारंभात सांगीतिक पुरस्कार दिले जाणार होते. तो पुरस्कार एका मोठय़ा संगीतज्ञाला मिळणार होता. रंगमंचावर राजकारण्यांची मांदियाळी होती. आणि त्या संगीतज्ञाला कोपऱ्यातली खुर्ची देण्यात आली होती. संगीतावर निरतिशय प्रेम करणाऱ्या ताईंना संगीताचा हा अपमान सहन होणे शक्यच नव्हते. तिथे जमलेल्या दिग्गज राजकीय नेत्यांची पर्वा न करता ताई तडक त्या कार्यक्रमातून उठून निघून गेल्या. त्या तेवढय़ावर थांबल्या नाहीत, तर दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि राजकीय नेत्यांच्या या वागण्यावर मनसोक्तपणे झोड उठवली. त्या अजिबात डगमगल्या नाहीत. संगीताचा पुरस्कार सोहळा होता तर संगीतज्ञांना प्राधान्य द्यायला हवे, हा त्यांचा आग्रह होता. प्रत्येकजण आपली पोळी भाजून घेतो असा हा जमाना आहे. अशा जमान्यात संगीताला प्रतिष्ठा मिळवून देण्याबाबत आग्रही असणारा आणि प्रसंगी सत्ताधाऱ्यांचा रोष पत्करायला तयार असलेला असा कलाकार आता सापडणे शक्य नाही.
ताईंच्या अक्षरश: शेकडो मैफिली मी ऐकल्या. प्रत्येक मैफिलीत आवर्जून जाणवलेली एक गोष्ट म्हणजे- त्या आपल्या अटींवर गायच्या. श्रोत्यांकडून फर्माईश आली आणि ताईंनी ती पूर्ण केली, असे होणे शक्यच नाही. त्यांना स्वत:ला जे गायचे आहे, तेच त्या गायच्या. त्या निर्भीड होत्या. त्यांनी त्यांची गायकी निर्माण केली. पण हे केवळ गायकीपुरतेच मर्यादित नव्हते. संपूर्ण जीवनच त्या स्वत:च्या अटींवर जगल्या. या जगण्यात सौंदर्याची आसक्ती होती. असुंदर, बेसूर असे त्यांना काहीच मान्य नव्हते. ख्यालाचे संपूर्ण अवकाश व्यापताना त्यांनी कुठेही पोकळी सोडली नाही. विलंबित लयीतून द्रुत लयीत थेट आल्यामुळे श्रोत्यांना मिळणाऱ्या रागाच्या अनुभूतीत व्यत्यय येऊ नये, श्रोते त्या रागात तरंगत असताना त्या तरंगण्याला कुठेही धक्का लागू नये, यासाठी त्यांनी मध्य लयीच्या अध्ध्या तालातील बंदिश बांधली. विलंबित लयीतून द्रुत लयीत जातानाची ही मध्य लय! गाण्याच्या सौंदर्याला कुठेही बाधा येऊ नये, यासाठी! त्यांच्या आयुष्यातही ही सौंदर्याची आसक्ती नेहमीच दिसून यायची. त्यांचे आयुष्य रेखाटताना त्यांनी हे सौंदर्यच हाताशी घेतले. त्या असामान्य होत्या. मोगुबाईंसारख्या आईच्या पोटी जन्माला येण्यापासून ते अगदी शांतपणे जगाचा निरोप घेण्यापर्यंत त्यांचे जीवन असामान्य होते. आईसारख्या महान गुरूच्या तालमीतून त्या शिकून परिपक्व झाल्या आणि त्यानंतर त्या नेहमीच सवरेत्कृष्ट आणि एकमेवाद्वितीय राहिल्या. गेल्या, तेदेखील कोणालाही धक्का न लावता! आपला स्वत:चा मृत्यूही त्यांनी सौंदर्य हाताशी घेऊन रेखाटला की काय असे वाटावे, असा हा मृत्यू!
ताईंच्या एक-एक गोष्टी आठवताना मनात अनेक प्रश्नांची गर्दी होते. एवढा सच्चा कलाकार निसर्ग पुन्हा आपल्याला देऊ शकेल काय? संगीताबद्दल एवढी तळमळ असणारी विदुषी आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल काय? राजकारण्यांना न जुमानणारी आणि आपल्या विचारांशी पक्की असणारी योगिनी परत आपल्याला मिळेल काय? सामान्यांपासून विद्वानांपर्यंत प्रत्येक श्रोत्याला देहभान हरपायला लावणारी तपस्विनी परत होईल काय? रागरूपाकडून रागाच्या भावाकडे, रागाच्या वातावरणाकडे नेणारी देवी सरस्वती पुन्हा लाभेल काय? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळते. आणि शेवटी मी ताईंच्याच सुरांना शरण जाते..
‘हे श्यामसुंदर, राजसा..’
आरती अंकलीकर-टिकेकर