‘मशिदींतून दर शुक्रवारी मुल्लामौलवी विद्वेषच पसरवतात, तेव्हा कुठे जातो तुमचा विरोध?’ असा प्रतिप्रश्न कोणाही सच्च्या भारतीयाला अस्वस्थ करणाराच ठरतो. ‘ते आणि आपण’ ही विभागणी मान्य केल्याखेरीज असे प्रश्न विचारलेच जाऊ शकत नाहीत ही खात्री या अस्वस्थतेमागे जशी असते, तसाच- जर कोणी विद्वेष पसरविते आहे तर त्यांना कायद्याचा बडगा का दाखविला जात नाही, हा अनुत्तरित प्रश्नही असतो. तो अनुत्तरितच राहण्याचे मुख्य कारण म्हणजे विद्वेष पसरवणाऱ्यांना त्यांच्याभोवतीच्या लोकांचा मिळणारा पाठिंबा. ‘आपल्या माणसावर’ कारवाई होऊ द्यायची नाही, म्हणून ‘असे घडलेच नाही’ अशी खोटी साक्ष देण्यासही एरवी धार्मिक- म्हणून स्वत:ला आपोआपच नैतिक समजणारे- कोणाही धर्माचे लोक कचरत नाहीत. कदाचित सामाजिक दबाव असेल, कदाचित खरोखरीची दहशतदेखील असेल; पण विद्वेष पसरविणाऱ्याला पाठिंबा मिळत राहतो आणि कायदा केवळ पाहत राहतो. तसेच काही के. प्रभाकर भट यांच्यावर गुदरलेल्या तक्रारीचे झाले, तर नवल नाही. प्रभाकर भट यांच्या नावातील ‘के’ हा कल्लडक या त्यांच्या गावामुळे आलेला. कल्लडक हे मंगलोरजवळचे गाव दक्षिण कन्नडा (कारवार) जिल्ह्य़ातले. या जिल्ह्य़ात ‘श्रीराम सेने’, ‘हिंदु जागरण वेदिके’ या संस्था धर्माधारित हिंसाचार किंवा सनातनी आग्रहांच्या खुळचट प्रचारासाठी अधिक प्रसिद्ध असल्या तरी त्यांनाही ज्यांच्याबद्दल आदर आहे, ते के. प्रभाकर भट हे रा. स्व. संघ या सांस्कृतिक संघटनेचे मोठे कार्यकर्ते आणि या भागातील ‘श्रीराम विद्याकेंद्र’ या पाचमजली शाळेचे मालक. या प्रभाकर भट यांच्यासह चौघांवर आता, मोबाइलवरून सर्वदूर पसरलेल्या व्हिडीओमुळे ‘धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न तसेच धार्मिक भावना दुखावणे’ (भाारतीय दंडविधान कलम २९५ अ आणि २९८) असा गुन्हा दाखल झाला आहे. या व्हिडीओत ‘बाबरी मशीद पाडण्याचा खेळ खेळणारी मुले’ दिसतात. वर मोठय़ा पडद्यावर बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणाची दृश्ये दाखविली जात आहेत आणि क्रीडागारात, या मशिदीचे प्रचंड चित्र हलते आहे.. हे चित्र मुलांनी खाली पाडायचे, फाडायचे, त्याचे तुकडे-तुकडे करून ते होत्याचे नव्हते करायचे, असा एक ‘खेळ’ शाळेच्या ‘क्रीडोत्सवा’त सुरू होता, तोही पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी तसेच केंद्रीय खत व रसायनमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा या प्रमुख पाहुण्यांच्या साक्षीने. या मुलांनी दिलेल्या क्रमानुसार उभे राहून, मानवी आकारातून अयोध्येतील भव्य मंदिराचेही दर्शन घडविले. मंदिर होणार, याचा आनंद साजरा करणे ठीक असले तरी मशीद पाडण्याचा तो ‘क्रीडाप्रकार’ सुरू असताना, ‘हनुमानाचे वारस पाहा काय करताहेत, हनुमानासारखाच यांचा संताप आहे’ असे निवेदन होत होते, बजरंगबली, श्रीराम यांच्या घोषणा उन्मादाने दिल्या जात होत्या. आमचे बाकीचे कार्य पाहा, आमच्याबद्दल नकारात्मक प्रचार करू नका, असेही प्रत्युत्तर विद्वेष पसरविणारे मुल्लामौलवी किंवा विद्वेष पसविणारे सांस्कृतिक-शैक्षणिक कार्यकर्ते सहसा देत असतात. नेमके तसेच प्रभाकर भट यांनीही क्रीडोत्सवातील ‘बाबरी-क्रीडा’ उघड झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना ऐकविले होते. यापुढेही, बाबरी-खेळाचे समर्थन करण्यास प्रभाकर भट यांचे काही हजार समर्थक पुढे सरसावतीलच. किंबहुना समर्थन नसते तर ही कृती घडलीच नसती. सुमारे अडीच वर्षांपूर्वीच, ‘प्रभाकर भट यांना अटक झाल्यास कर्नाटक पेटेल,’ असा जाहीर इशारा देणारे तत्कालीन भाजप नेते बी. एस. येडियुराप्पा हे आता कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. प्रभाकर भट व त्यांचे साथीदार हेही प्रकरण ‘निभावून नेतील’. तसे झाल्यास विद्वेषाचा खेळ सुरूच राहिल्याचा विषाद कोणास वाटेल का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा