विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्दय़ावरून महायुती विस्कटली आणि शिवसेना की भाजप या प्रश्नावर रिपब्लिकन पक्षाचेही तुकडे झाले. रामदास आठवले यांनी भाजपबरोबर राहणे पसंत केले, तर त्यांच्याच पक्षातील एक ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे शिवसेनेला जाऊन मिळाले. पक्षातील फुटीबद्दल दोन्ही नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेतून रिपब्लिकन राजकारणाच्या केविलवाण्या अवस्थेला सत्तेची महत्त्वाकांक्षा कशी कारणीभूत ठरले, हे लपून राहिलेले नाही.
भाजपबरोबर जाण्याचा सर्वानुमते निर्णय झाला असताना आपण शिवसेनेकडे जाण्याची वेगळी वाट का धरली? तुमच्यावर रिपब्लिकन पक्षातील फुटीचे शिल्पकार असा आरोप केला जात आहे.
रिपब्लिकन पक्षाची मूळ युती शिवसेनेशी होती. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुसंवादी वातावरण आहे. भाजपबरोबर आमची फरपट होताना दिसत होती. खरे म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आमची भूमिका ठरवण्यासाठी बैठक घेण्याचे पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी आम्हाला सांगितले होते. परंतु भाजपमधील व आमच्या पक्षातील काही नेत्यांना इतकी घाई झाली होती की, राजकीय पेचप्रसंगात भाजपबरोबर जाण्याचा निर्णय फुटपाथवर जाहीर केला गेला. भाजपच्या कार्यालयाजवळ आम्ही सर्व होतो. अमित शहा व आठवले यांनी एकत्रितपणे हा निर्णय सांगायला हवा होता. परंतु तसे झाले नाही. मला हा आठवले यांचा आणि आंबेडकरी जनतेचाही अपमान वाटला. अशा पक्षाबरोबर जाणे मला योग्य वाटले नाही, म्हणून मी माझा वेगळा मार्ग पत्करला. मी पक्षात फूट पाडलेली नाही, मी वेगळा गट काढलेला नाही, फक्त शिवसेनेला मतदान करा, असे आवाहन आंबेडकरी जनतेला केले आहे.
सत्तेतील सहभागासाठी भाजपबरोबर युती करावी, असा सल्ला आपण दिला होता, असे रामदास आठवले यांचे म्हणणे आहे. मात्र शिवसेनेकडून तुम्हाला काही तरी आश्वासन मिळाले असेल, म्हणून तुम्ही पक्षाच्याविरोधात भूमिका घेतली का?
भाजपकडून कसली आश्वासने मिळाली आहेत, असा माझा सवाल आहे. त्या साऱ्या भूलथापा आहेत. विधानसभेच्या आठ जागा देण्याचे विचाराधीन असताना रिपब्लिकन पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या, हे जाहीर करावे. विशिष्ट जागा न सोडण्याबाबत काही वेगळी सौदेबाजी झाली का, याची पक्षनेतृत्वाने चौकशी करावी. आमची एकही जागा निवडून येणार नसेल तर तीन मंत्री कुठून करणार. तीन एमएलसी काय एकदम मिळणार आहेत का. बरे त्या फक्त रिपाइंलाच का, राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे हे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आग्रह धरणार नाहीत का? आठवले यांना केंद्रात मंत्री करण्याचे ठोस आश्वासन दिले नाही, देखेंगे या एका शब्दावर त्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला, ते मला मान्य झाले नाही. ५० वर्षे चळवळीत फक्त राबायचेच का? होय, शिवसेनेने सन्मानाने सत्तापद दिले तर ते मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे.  
पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला तुम्ही आव्हान दिले
नाही, रामदास आठवले यांचा मी कायम आदर करीत आलो आहे. मोठय़ा कष्टाने त्यांनी संघटना उभी केली आहे. ते प्रचंड मेहनत घेतात. रामदास आठवले हाच आंबेडकरी चळवळीचा चेहरा आहे. २५ वर्षे एकत्र असलेल्या युतीतील शिवसेना व भाजपला एकमेकांपसून वेगळे होण्याचा अधिकार आहे, मग मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे की नाही, मला विचारस्वातंत्र्य आहे की नाही? भाजपबरोबर होणारी फरपट मला मान्य नव्हती, म्हणून मी सेनेबरोबर गेलो. माझ्यावर पक्षात फूट पाडल्याचा आरोप करणाऱ्यांनी सत्तेसाठी कुणाबरोबरही फरफटत जावे, मानसन्मान झुगारून द्यावा, असे जाहीरपणे सांगावे, मी परत यायला तयार आहे.

Story img Loader