सुमित पाटील, कलादिग्दर्शक
चित्रपटसृष्टीत कार्यरत असल्याने सततच्या कामामुळे निर्माण होणारा ताण हा आयुष्याचा भागच झाला आहे. मी कलादिग्दर्शक आहे. चित्रपटांसह मालिका चित्रीकरण आणि नाटकांच्या प्रयोगस्थळी सर्वात प्रथम पोहोचणारी आणि सर्वात शेवटी निघणारी व्यक्ती म्हणजे कलादिग्दर्शक. कलादिग्दर्शकाने कमी कालावधीत भरपूर कलात्मक गोष्टी कराव्यात अशी निर्माता आणि दिग्दर्शकांची अपेक्षा असते. त्यामुळे ताण निर्माण होतोच.
नेपथ्य लावण्यापासून ते सांभाळणे आणि प्रयोगानंतर पुन्हा काढणे यामध्ये खूपच तारांबळ होते. यात व्यावहारिक ताणही असतो. बऱ्याचदा कलादिग्दर्शक स्वत:कडचे पसे घालून नेपथ्य उभारण्याचे काम करतो. मात्र ऐनवेळी कामानंतर ठरलेला मोबदला मिळतोच असे नाही. अशा वेळी प्रचंड मानसिक खच्चीकरण होते. आपसूकच ताण येतो.
चित्रकार असल्याने रंगांमध्ये आणि वेगवेगळ्या कल्पनात्मक विचारांमध्ये रमायला मला आवडते. शिवाय सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात वावरणाऱ्या खऱ्या माणसांना भेटण्याची संधी मिळत असल्याने मी तिथेही रमतो. त्यामुळे माझ्यासाठी ताणमुक्तीची हीच माध्यमे आहेत. नेपथ्यासाठी अपेक्षित असणारा मोबदला योग्य वेळी मिळाला नाही तर चिडचिड होते. याउलट सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून खिशातले चार पैसे गेले तरी मला समाधान मिळते. कारण यानिमित्ताने मी समाजासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या चांगल्या लोकांना भेटत असतो. अशा खऱ्या लोकांना भेटल्याने कामामुळे निर्माण झालेला ताण दूर होण्यासाठी नक्कीच मदत होते. मात्र त्या ठिकाणी काम करत असताना कधीच ताण येत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या सजावटीच्या कामाला मी सामाजिक उपक्रम म्हणून पाहतो. त्या माध्यमातून मला स्वत:ला समुद्ध करणारी माणसं भेटतात.
वेगवेगळ्या गोष्टींमध्ये निरनिराळे आकार शोधण्यास मला आवडते. एका ठिकाणी शांत बसून आकाशातील ढगांमध्ये निर्माण झालेल्या आणि भिंतीवर पडलेल्या भेगा जुळवून त्यातून निर्माण झालेल्या आकारांचा विचार करतो.
शब्दांकन – अक्षय मांडवकर