लिरिल साबणाच्या जाहिरातीतल्या धबधब्याचा प्रपात आणि त्यातल्या मुलीची उत्फुल्लता या दोहोंना न्याय देणारी शब्दहीन ‘जिंगल’ वनराज भाटियांचीच आणि पंडित नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित हिंदी दूरदर्शन मालिकेमध्ये भारतीय तत्त्वज्ञान सांगणाऱ्या ऋग्वेदाच्या ऋचांचा धीरगंभीर साजही भाटियांचाच. या दोन्हींसाठी सिंथेसायझरसारख्या नव्या वाद्याचा वापर भाटिया लीलया करू शकले, याचे कारण पियानोवर त्यांची असलेली हुकमत. ऑक्सफर्ड वा केम्ब्रिज विद्यापीठात शिकण्याचा नातेवाईकांचा आग्रह असतानाही केवळ वडिलांच्या पाठिंब्यावर भाटिया लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये शिकले आणि तेथे नादिया बूलांजेर (बूलॉजे) यांची तालीम त्यांना मिळाली. पियानोचे भारतीयीकरण शंकर जयकिशनपासून अनेकांनी केलेच होते; पण ते प्रेमगीते/ विरहगीते यांपुरते. भाटियांनी पियानोची दुहेरी स्वरयोजनाच आपल्या संगीताचा प्राण बनवली. म्हणूनच, ‘तुम्हारे बिन जी ना लागे घरमें’ (‘भूमिका’) या गीताची लावणीसदृश चाल असो की ‘मेरो गाम कथा परे’ (‘मंथन’) हे काठियावाडी चालीतील गीत असो, पियानो जणू नसानसांत भिनलेल्या भाटियांनी या पारंपरिक चालींमध्ये गायिकेच्या गळ्यातच दुहेरी स्वरयोजनेची गंमत आणली. सतारीचा पियानोऐवजी आणि पियानोसारखा वापर ताकदीने करणारे भास्कर चंदावरकरांनंतर वनराज भाटियाच, हेही ‘तुम्हारे बिन’च्या दोन कडव्यांमधील संगीत जेथे थांबते, तेथे चटकन समजते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा