देह म्हणजेच ‘मी’ या भावनेनं जीव जगत असतो आणि म्हणूनच या देहाला सुखी ठेवण्यानंच ‘मी’ सुखी होईन, असं मानू लागतो. यातून तो जी जी र्कम करतो त्यांनी धर्म आणि अधर्म निपजत असतो, असं अंतरीक्ष सांगत आहे. तो म्हणतो, ‘‘मनीं धरोनि विषयकाम। कर्मेद्रियीं करितां कर्म। तेथें निपजती धर्माधर्म। बाधक परम पुरुषातें॥१३६॥’’ आता कर्मानं धर्म वा अधर्म निपजतो म्हणजे काय? तर समजा ‘नोकरी लागली तर अन्नदान करीन’ असा कुणी संकल्प सोडला (मनीं धरोनि विषयकाम) आणि त्या इच्छापूर्तीनंतर अन्नदान केलं तर त्यानं धर्माचं काम केलं, सत्कर्म केलं, असं जग मानील. पण ते करत असताना अहंकार मनात शिरला; आपल्यामुळे या लोकांना दोन घास खायला मिळताहेत, हा ताठा मनात शिरला, तर तेच कर्म अधर्मात, विपरीत कर्मात रूपांतरित होतं! आपलं चांगलं व्हावं, म्हणून संकल्प सोडला तर सत्कर्माला वाव मिळतो हे खरं. पण इतर कुणाचं हित साधलं जाऊ नये, असा विचारही द्वेष आणि मत्सरातून मनात शिरू शकतो. त्यासाठी होणारं आणि वरकरणी चांगलं भासणारं कर्मही मग अधर्मात, दुष्कर्मातच रूपांतरित होतं. मग प्रारब्धाचा आणि संकल्पशक्तीचा मोठा सिद्धांत अंतरीक्ष सांगतो. तो म्हणतो, ‘‘कल्पिला फळभोग घडे। त्यासारिखें देह धरणें पडे। देहें देहाची खाणी उघडे। मरणही वाढे तसेंचि॥१३७॥’’ म्हणजे इच्छिलेलं फळ प्राप्त झालं, त्या फळप्राप्तीचा योग आला की ते फळ भोगण्यासाठी अनुरूप असा देहही धारण करणं भाग पडतं! त्या देहातही नवनव्या इच्छा प्रसवतात आणि त्यातून नवनव्या जन्मांची आणि मृत्यूची साखळीही तयार होते. शारदा माता म्हणत की, ‘‘मिठाईचा अर्धा तुकडा खाण्याची इच्छा जरी अपूर्ण राहिली तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो!’’ मग आपल्या मनात अनंत जन्मांत किती अनंत इच्छा अपूर्ण राहिल्या असतील, विचार करा! साधं उदाहरण घ्या, ‘पक्ष्यासारखं उडता यायला हवं,’ असा विचार मनात येऊ शकतो. तो तीव्र असेल तर सनातन तत्त्वज्ञानानुसार, पक्षीजन्म मिळतोच! (कल्पिला फळभोग घडे। त्यासारिखें देह धरणें पडे।). प्रत्येक जीव हा परमात्म शक्तीच्याच आधारे वावरतो. परमात्मा हा सत्यसंकल्पी; त्याचा संकल्प सत्यात उतरल्यावाचून राहात नाही. त्यामुळे त्याचाच अंश असलेल्या जीवाचा संकल्पही पूर्णतेस गेल्यावाचून राहात नाही. फक्त तो संकल्प वास्तवात उतरण्यासाठी योग्य काळ आणि योग्य परिस्थितीची जोड लागते. तोवर त्याच्या कर्मातून वा संकल्पातून निर्माण झालेलं प्रारब्ध नष्ट होत नाही. एकदा धृतराष्ट्रानं श्रीकृष्णाला विचारलं की, ‘‘माझे शंभर पुत्र मारले गेले, असं कोणतं घोर पापकर्म माझ्याकडून घडलं होतं ?’’ कृष्णानं अनेक जन्मांपूर्वी त्याच्या हातून घडलेलं कर्म उघड केलं. त्याजन्मी धृतराष्ट्र हा शिकारीवर जगणारा एक वनचर होता. एकदा त्यानं एक झाड पेटवून दिलं. त्या झाडावर पक्ष्यांची शंभर पिल्लं होती. ती मृत्यूच्या खाईत लोटली गेली. ते कर्मप्रारब्ध भोगण्यासाठी शंभर पुत्रांना नांदवता येईल, अशा राजाचा जन्म लाभण्याची गरज होती. तो लाभेपर्यंत कर्मप्रारब्ध कायम होतं! मग, ‘‘देहें देहाची खाणी उघडे। मरणही वाढे तसेंचि॥’’ हेदेखील लागू होतं. नव्या जन्मी नवं कर्म घडतं, नवे मोहसंकल्प प्रसवत जातात आणि नवं प्रारब्धही निर्माण होत जातं. म्हणून अंतरीक्ष सांगतो, ‘‘फळाशा कर्म अतिदारुण। अमरां आणी अमित मरण। अजन्म्या अंगीं जन्म पूर्ण। पुन: पुन: जाण आदळती ।।१३८।।’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

– चैतन्य प्रेम