स्वयंपाकघर.. जिथे स्वयंपाक केला जातो ती जागा, ते घर. घराला वरती खालती कितीही खोल्या असू देत, स्वयंपाकघर एकच असतं. अगदी एका खोलीत राहाणारे असतील तरी ती एक खोली म्हणजे ‘स्वयंपाकघर’च असते. जोपर्यंत पोटाचा प्रश्न आहे, त्या वीतभर पोटातील जठराग्नी तेवत ठेवायला आहुतींची गरज आहे. तोपर्यंत स्वयंपाकघर हा घराचा अविभाज्य भाग असणारच आहे.

या स्वयंपाकघराशी अगदी घट्ट मैत्रीचं नातं आहे ते त्या घराच्या गृहलक्ष्मीचं खरं तर अगदी लहान असल्यापासूनच ती ही भूमिका जगत असते, रंगवत असते, रियाज करत असते. आणि तोही आपल्या आई-आजीच्या  मार्गदर्शनाखाली नकळत केलेल्या निरीक्षणातून. या भूमिकेची जबाबदारी तिच्या स्वत:च्या अंगावर पडते आणि ती सराईतपणे निभावतेही. त्यावेळी तिचं सर्वस्व असतं तिचा भातुकलीचा चिमुकला संसार. दिवसातून किती वेळा ‘ती’ घर मांडते आणि मोडते याला गणतीच नाही. घरातील सगळ्यांनाच तिच्या हातचा चहा प्लॅस्टिकच्या रंगीत कपबशीतून प्यावा लागतो. ‘गरम आहे’, ‘फू करून पी’ अशी तिची सावधगिरीची सूचना ही नुसतीच ऐकून चालत नाही, तिचं पालन केल्याचं नाटक करावं लागतं. तिने पोह्य़ात किंवा चुरमुऱ्यात पाणी घालून भात करताना चुर्र्र असा आवाज ऐकायला लागतो व तो भात गपचूप मिटक्या मारत खावा लागतो. शेंगदाण्याचे दोन भाग करून त्यात गुळाचा खडा ठेवून चिकटवलेला गोड लाडू खाऊन ढेकर द्यावी लागते. आणि तिच्या आग्रहावरून नीट हात खोटे खोटे धुवावेही लागतात. मग दुपारची वेळ आहे म्हणत गाढ झोपण्याची तिची आज्ञा पाळावी लागते. कारण तिथे तिचं राज्य असतं. तिचा शब्द महत्त्वाचा असतो.

Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती

पुढे तिचं स्वयंपाकघराशी तिचं नात दृढ होत जातं. सुरुवातीला ती गोंधळते, बावरते, इ. डाळ, उडदाची डाळ, मूग डाळ, तूर डाळ यातला फरक तिला ओळखता येत नाही. तूर डाळीच्या ऐवजी उडीद डाळ वापरल्यामुळे आमटी चिकट होते. कधी ती नको इतकी ‘पाणीदार’ होते. आणि डाळीची शोधाशोध करावी लागते. यातील ‘माहिती तंत्रज्ञानासाठी’ शेजारच्या काकूंकडे ती येर झारा  घालते. ‘आईसारखी झाली नाही’ असा अभिप्रायही तिला झेलावा लागतो. ‘भात केला कच्चा झाला, पोळी केली करपून गेली’ असं मेनूकार्ड रंगत. पोळ्यांच्या आकारानी तर हे ‘विश्वचि माझे घर’ ही कल्पना आकाराला येते. अंदाजपत्रक इतकं कोलमडतं की एकदा केलं की चार दिवस गॅसला विश्रांती मिळते. ‘घडलंय, बिघडलंय’ अशी आवर्तन निर्माण होतात. ‘साफसफाई’चे लाड तिच्या अंगाशी येतात. घरी येणारा प्रत्येकजण परीक्षकाच्या भूमिकेतून बघत असतो. घर बघता बघता हळूच स्वयंपाक घरांत डोकावतो. तर बघताना ‘जीव वेडावला’ इतकं प्रशस्तीपत्रक नको, पाठीवर कौतुकाची थाप पडावी एवढय़ाच अपेक्षेने ती स्वयंपकघरात सतत मायेने हात फिरवत राहाते. स्वयंपाकाचा, स्वयंपाकघराचा वाटणारा धसका थोडा कमी होतो. मैत्रीच्या धाग्यांचा गुंता सुटून चांगला ‘गोफ’ निर्माण होतो.

हळूहळू स्वयंपाकघरात ती चांगलीच रुळते. ‘सांडलवण तिच्या हाताबाहेर जात नाही. ऊतू जाऊन वेडावणाऱ्या दुधाला ती योग्य वळण लावते. मीठ, तिखटाबरोबर थोडं मनही टाक, हा अनुभवी सल्ला ती शिरोधाय मानते. स्वयंपाक घराची सुंदर आखणी करते. हव्या असलेल्या वस्तू सहज हाताशी ठेवते. नको असलेल्या, रोज न लागणाऱ्या ओटय़ाखाली किंवा मागे ढकलते. एकाच आकाराचे डबे, योग्य तोंडाच्या बरण्या, उतरत्या भाजणीप्रमाणे एकात एक बसणारी पातेली, त्यानुसार झाकण्या, वाटय़ा, भांडी, चमचे, डाव, क्रोकरी यांची आरास मांडते. अग्निदेवतेची ही लखलखणारी प्रभावळ, मनात मुरलेल्या इंदिरा संताच्या कवितेचं जणू मूर्तरूपच असतं. चिरणं, मळणं, उलतनं, लाटणं, भाजणं, उकळणं, मिसळणं, हलवणं, असडणं, पसरणं, कुटणं, गाळणं, पाखडणं, घोळणं, भरणं, वाफवणं, उकडणं, परतनं, चेचणं, कढवणं, ढवळणं, आटवणं, खरवडणं सगळ्या क्रिया नेमकेपणाने सातत्याने घडू लागतात. आणि तिच्या स्वयंपाकघरचं रूपच सर्वार्थाने बदलतं. तिची त्याच्याशी अगदी घट्ट, विश्वासाची मैत्री होते. एकमेकांच्या सहकार्यामुळे पोटातून जाणारा प्रेमाचा मार्ग आपलासा होतो. देवघराचा कोपरा तिच्या स्वयंपाकघराचं पावित्र्य जपतो.

आला गेला, पै पाहुणा, कुळधर्म, कुळाचार, लग्न, कार्य, श्राद्ध पक्ष करताना सगळ्याच बाबतीत स्वयंपाकघराची तिला उत्तम साथ मिळते. सुगरण ही पदवी ही तिच्या गळ्यात पडते.

उन्हाळा आला की तिला वाळवणाचे वेध लागतात. ‘साठवणी’ साठी स्वयंपाकघर आतुर असतं. कुरडय़ा, पापडय़ा, चिकोडय़ा, बटाटय़ाचा कीस, सांडगी, मिरच्या, पापड, हळद, तिखट अशा सगळ्या पदार्थानी ‘वाळून’ न जाता उलट स्वयंपाकघर श्रीमंत होतं. लोणचं, गुळंबा, मुरंबा जेवणाची लज्जत वाढवतात. गौरी गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी आली की गोड पदार्थाच्या  घमघमाटाने स्वयंपाघर भरून जात. उरलं, सुरलं, पुरलं याच्या नियोजनाने फ्रीज तिला अगदी गार करून टाकतो. घंटो का काम मिनिटो में करत मिक्सर केवढा तरी मदतीचा ‘हात’भार लावतो. गरम पदार्थाची चवच न्यारी. ही हौस पुरवण्यासाठी गरम डोक्याचा मायक्रोव्हेव चुटकी सरशी कामाचा उरका पाडतो. अ‍ॅक्वागार्ड शुद्धतेची खात्री देत तोंडचं पाणी पळवत नाही. डबे, बरण्या खाऊनी भरायच्या आणि रिकाम्या करायच्या, या छंदाचं व्यवस्थापन करण्यात, ती रमून जाते. तोंडात टाकायला, तो हलवायला, हातावर ठेवायला, अतिथीधर्म निभवायला ‘काहीतरी’ तयार ठेवण्यात ती स्वत:ला धन्य समजू लागते. दोनचार दिवसांपेक्षा स्वयंपाकघराचा जास्त विरह तिला सहन होत नाही. घरात पाऊल टाकल्या टाकल्या ती त्याच्याकडे धावते. साधं भात पिठलं सर्वाना खाऊ घातले तरी तो आनंद तिला पंचतारांकित भोजनापेक्षा सरस वाटतो. तेथील प्रत्येक घटकाशी तिची मैत्री असते. जिव्हाळ्याचं नातं असतं. आदर्श गृहिणीची भूमिका पार पाडण्यासाठी सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं असतं.

स्वयंपाकघराशी असलेल्या सख्यत्वामुळे घरचे, बाहेरचे सगळेच खूश होतात. साहजिकच गृहलक्ष्मीच्या चेहऱ्यावर तृप्ततेचं सौंदर्य, प्रसन्नता झळकते. वास्तुपुरुष ‘तथास्तु’ म्हणत राहातो.

फार पूर्वी चूल पोतेरं करून त्यावर रांगोळी काढून तिचा दिवस सुरू व्हायचा. काळानुरूप लाकडं, कोळसे, भुशाची शेगडी जाऊन गॅस आला. धुरकटलेलं, फू फू करून डोळ्यात पाणी आणणारं स्वयंपाकघर मोडय़ुलर किचनमध्ये रूपांतरित झालं. स्पर्धेचं युग आणि करियरचा आग्रह यामुळे या तिच्या ‘किचन’ मधल्या अस्तित्वाला थोडं ग्रहण लागलं असलं तरी ती बाहेरून सूत्र हलविण्यात चतुर आहे. त्या स्वयंपाकघराची इस्त्री कोणी विस्कटली, गोष्टी जागेवर ठेवल्या नाहीत, पसारा केला तर ती चिडते. या तिच्या जेण्डर बजेटमध्ये आजकाल पुरुषांची डोकावण्याची प्रवृत्ती दिसून येते. बदलत्या सामाजिक संदर्भामुळे स्वयंपाकघराशी असलेल्या तिच्या नितळ मैत्रीत आता वाटेकरी होऊ लागेल का? काळाच्या पोटात काय दडलंय कुणास ठाऊक? आपली भूमिका मात्र

मालिया जेऊते नेले। नेऊ ते निवांतचि गेले॥

पाणिया ऐसे। केले हो आवेजी।

अशीच वहात्या पाण्यासारखी राहाणार आहे.