शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती. त्यामुळं अघळपघळ खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेलीच असे. या जाड कापडी चड्डीला दोन बाजूला दोन खिसे. जणू छोटे गोदामच. या खिशात तिरपा हात घालावा लागे. रिकाम्या खिशात हात घालून चाललं तरी ऐट वाटायची. खिशात चांगली ऐसपैस जागा होती. बऱ्याचदा उपयोगी खजिना या खिशांत कोंबलेला असे. तुरीच्या शेंगा, पेरू, बोरं, कैऱ्या, चिंचा, रेवडय़ा, शंेगदाणे, फुटाणे, मुरमुरे, चिक्की, खोबरं, संत्री गोळ्या, बिस्किटं असं काय काय ठेवण्यासाठी या खिशांचा उपयोग होई. कधीतरी जांभळीखालची वेचलेली जांभळं या खिशात ठेवण्याचा प्रयत्न महागात पडला. जांभळांच्या डागामुळं खराब झालेली चड्डी आणि त्यापेक्षा भयंकर म्हणजे जांभळाऐवजी खाव्या लागलेल्या शिव्या अधिक तुरट होत्या. कधीही रिकाम्या नसणाऱ्या खिशाचे हे सर्वसाधारण उपयोग झाले. पण आम्ही बऱ्याचदा या खिशाचा उपयोग समोरच्याला चकित करण्यासाठी करत असू. म्हणजे खिशातून एखादी दुर्मीळ, वेगळी वस्तू बाहेर काढायची. ती वस्तू मित्रांना दाखवून चकित करायचे असा हेतू असे. काडय़ाच्या डबीवरचे नवनवे चित्र, सिगारेट पाकिटात मिळणारा चमकीचा कागद, शंख, शिंपले, गारगोटी, चिंचोके, सीताफळाच्या बिया, रेल्वेची जाड तिकिटं, सापडलेले मणी, जुनी नाणी, रंगीत पंख, रंगीत खडू, ढब्बू पेन असं काहीही जादूनं काढल्यासारखं खिशातून काढून मित्राला दाखवण्यात मौज होती. एकदा रानात सापडलेली मोरपिसं मी या खिशात कोंबली होती. शाळेच्या सहलीत नदीत सापडलेलं कासवाचं पिल्लू खिशात ठेवण्याचा अयशस्वी प्रयत्न आम्ही केला होता. एकाच्या खिशात कोंबडीचं पिल्लू गुदमरलं होतं. एका मित्राने खिशातून सापाची कात काढून आमच्यासमोर धरली होती. अशा विचित्र वस्तूंमुळं खिसा श्रीमंत व्हायचा. यात काही वेळा या वस्तूंची अदलाबदलही व्हायची. बऱ्याचदा या वस्तू रात्री अंथरुणात आमच्यासोबत झोपही घेत. त्यामुळं सकाळी कपडे धुताना आई कपडय़ांची तपासणी करे. खिशात सापडलेल्या अद्भुत वस्तू नहाणीच्या कोनाडय़ात काढून ठेवत असे. दरम्यान, आमच्या खिशात नवीन वस्तू आलेली असे.
काळ बदलला. स्वाभाविकपणेच माहोलही बदलला. शाळा, गणवेश आणि त्यापेक्षाही मानसिकता बदलली. खाकी चड्डी गेली. आताच्या बर्मुडाला लहान-मोठे खूप खिसे आहेत. पण हे खिसे भरलेले नाहीत, रिकामे आहेत. मग आजची मुलं-मुली एकमेकांना चकित करीत नाहीत का? तर आजही चकित केलं जातं. फक्त त्याचं स्वरूप बदललंय. गेल्या महिन्यात आठ-दहा दिवस घरात मुलं-मुली म्हणजे भाचे-भाच्या, पुतणे-पुतण्या असे जमले होते. ते एकमेकांना त्यांच्या मोबाइलमधले गेम, व्हिडीओ क्लिपिंग्ज दाखवत होते. मोठय़ा उत्सुकतेनं एकमेकांना व्हिडीओ दाखवायचे. या काळातलं हे चकित करणंच होतं. कुणाजवळ किती अद्भुत व्हिडीओज् आहेत, व्हॉटस्अॅपवर कुणाजवळ वेगळं काय आलंय याची चढाओढ लागायची. चड्डीला खिसा असतोच, तसा मुलांजवळ मोबाइल होताच. मग एकमेकांत व्हिडीओची, क्लिपिंगची अदलाबदल व्हायची. या व्हिडीओ, व्हॉटस्अॅप प्रकरणात मीही जरा रस दाखवला. खरंच अद्भुत व्हिडीओज् होते. माकडिणीला मारून तिच्या पिलाला सांभाळणारा बिबटय़ा, जमिनीतल्या घरात पिलांना लपवून ठेवणारा ससा, चेहऱ्याला हवं तसं वाकवणारा माणूस असे कितीतरी चकित करणारे व्हिडीओज् होते. माझीही उत्सुकता वाढत गेली. साहसी, विनोदी, अद्भुत व्हिडीओ पाहताना मजा येऊ लागली. पण भाचीच्या मोबाइलमधला एक नऊ सेकंदाचा व्हिडीओ पाहून थबकलो. एखादी ब्लॅक कॉमेडी पाहताना हसत हसत अंतर्मुख होतो तसं झालं. तसं पाहिलं तर हा एक मजेशीर दृश्याचा तुकडा होता. पण मला मजा वाटली नाही; उलट आतून हललोच. मोबाइलमध्ये असे दुर्मीळ क्षण कुणीतरी पकडतं. हा क्षण पकडणाऱ्याला त्याचं श्रेय बहुधा मिळतच नाही. कारण मेसेज, व्हिडीओ पुढं पाठवणाऱ्याचा स्वत:च निर्माता असल्यासारखा आविर्भाव असतो. व्हॉटस्अॅपमुळं हे सर्व कुठल्या कुठं पोचतं. मोबाइलमध्ये चित्रित केलेला हा इटुकला व्हिडीओ होता पिटुकल्या म्हणजे दोन-तीन वर्षांच्या मुलीचा. सहज स्वाभाविकपणे नऊ सेकंदात क्षण पकडला गेलेला आहे. पाहण्यासाठी व्हिडीओ सुरू केला की ताबडतोब संपूनही जातो. पण त्याची परिणामकारकता खूपच आहे. प्रथम गंमत म्हणून माझ्या मुलीनं हा व्हिडीओ मला दाखवला. पण गंमत वाटण्यापेक्षा काहीतरी मनात हललं. दोनदा, चारदा, पुन: पुन्हा तो व्हिडीओ मी पाहत गेलो.
व्हिडीओ सुरू होतो.. शहरातला एक डांबरी रस्ता. बहुधा या रस्त्याचं काही काम सुरू असल्यामुळं रहदारी नाहीए. डोक्यावर सूर्य तापलाय. दोन-तीन वर्षांची एक मुलगी. (रस्त्याचं काम करणाऱ्या कामगाराची ही मुलगी असावी.) रस्त्यावर पांढरे पट्टे मारलेले आहेत. त्या पांढऱ्या पट्टय़ाकडं पाहत ही चिमुरडी डांबरी रस्त्यावरून चालतेय. फ्रेममध्ये ती एकटीच आहे. तेवढय़ात तिला शेजारी काहीतरी हलल्यासारखं दिसतं. गडद काळ्या रंगाची आकृती तिचा पाठलाग करतेय. ती छोटी त्या काळ्या आकृतीला पाहून घाबरते. चिरकते. तापलेल्या रस्त्यावरून पळायला लागते. तर ती काळी आकृती तिचा पाठलाग करतेय. मुलगी ओरडायला लागते. रडायला लागते. कशीतरी रस्त्याच्या कडेला येऊन थांबते. आता पाठलाग करणारी काळी आकृती मागे नसते. तिला क्षणभर हायसं वाटतं. समोर पाहिलं तर तीच काळी आकृती आता समोरच्या बाजूला तिला खेटून उभी आहे. मुलगी पुन्हा जिवाच्या आकांतानं ओरडते. भीतीनं मागे मागे सरकायला लागते आणि रस्त्यावर जोरात पडते. इथं व्हिडीओ संपतो. पाठलाग करणारी काळी आकृती म्हणजे त्या चिमुरडीचीच पडलेली सावली आहे. स्वत:च्याच सावलीला घाबरलेली मुलगी पाहून गंमत वाटणं शक्य आहे. पण मुलीच्या निरागसतेमुळं घडलेली ही गंमत गमतीदार वाटली नाही. हा दृश्यखंड मी पुन: पुन्हा पाहिला. मला हसू येईना. उलट, ही छोटीशी घटना मोठी अर्थपूर्ण वाटली. ही दृश्यफीत ज्यांनी कोणी चित्रित केली आहे त्यांचा हेतू नेमका काय होता, ते माहीत नाही. पण त्यातील सहज स्वाभाविक चित्रीकरणातून आजच्या जगण्यातलं एक कटु सत्य अधोरेखित झालं आहे.
त्या चिमुरडय़ा मुलीला अजून ‘सावली’ हा प्रकार कळलेला नाहीए. मोठय़ा माणसांनाही कालपर्यंत सावलीचा खेळ कळलेला नव्हता. म्हणून तर चंद्रग्रहण म्हटलं की राहू आणि केतू नावाचे राक्षस चंद्राला गिळायला यायचे. या राक्षसांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक दानधर्म करायचे. गंगेत आंघोळी करायचे. आत्ता लोकांना कळलंय, की ग्रहण म्हणजे सावलीचा खेळ आहे. इथं तर ही चिमुरडी मुलगी आहे. तिला अजून सावलीचं आकलन झालेलं नाही. ही चिमुरडी इतर कुणाच्या सावलीला घाबरली असती तर ठीक होतं, पण ती स्वत:च्याच सावलीला घाबरते. स्वत:च्या सावलीपासून लांब पळण्याचा प्रयत्न करते. स्वत:च्या सावलीपासून लांब पळणं ही कल्पना गमतीदारच आहे. म्हणून हा इटुकला व्हिडीओ सर्वाचं लक्ष वेधून घेतो. सावली म्हणजे त्या चिमुरडय़ा मुलीचं अस्तित्वच. अज्ञानामुळं का होईना, ती चिमुरडी स्वत:च्या अस्तित्वापासून दूर जाऊ पाहतेय. सुरुवातीला स्वत:च्या सावलीला घाबरणाऱ्या मुलीला पाहून मौज वाटते. पण जेव्हा स्वत:च्या अस्तित्वापासून दूर पळू पाहणारी मुलगी असा अर्थ डोक्यात येतो तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं.
एका नाटककाराने एक भन्नाट प्रयोग केलेला होता. (बहुधा ते नाटककार बादल सरकार असावेत?) हे नाटककार अफलातून प्रयोग करायचे. त्यामुळं लोकांमध्ये त्यांच्या प्रयोगांबद्दल उत्सुकता होतीच. नव्या नाटय़प्रयोगाचं निमंत्रण रसिकांना मिळालं. लोक नेहमीप्रमाणे उत्सुकतेनं रंगमंदिरात गोळा झाले. पण आजचा प्रयोग नेहमीच्या रंगमंचावर होणार नव्हता. रंगमंदिराच्या शेजारी पडद्याची एक खोली तयार करण्यात आलेली होती. या खोलीत एकेकटय़ाने हा प्रयोग बघायचा होता. लोक बुचकळ्यात पडले. एकजण प्रयोग पाहण्यासाठी आत गेल्यावर खोलीबाहेर रांगेत उभ्या लोकांनी काय करायचं? नेमकं किती वेळ रांगेत उभं राहायचं? खोलीत गेलेला नेमका किती वेळ प्रयोग पाहणार? या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळं लोक गोंधळून गेले होते. काही लोक या कल्पनेची टिंगल करायला लागले. चौकटीला झुगारून देणारी खोडकर प्रायोगिकता मुळात ठामच असते. इथंही आपल्या निर्णयावर नाटककार ठाम होते. विनासायास सगळ्यांना या खोलीतला नाटय़प्रयोग पाहायला मिळेल याबाबत नाटककाराच्या मनात शंका नव्हती. लोकही गंमत म्हणून थांबले. या खोलीत नाटय़प्रयोग पाहायला गेलेला मागच्या दाराने बाहेर जात होता. त्यामुळं नेमका आत कसला प्रयोग आहे हे कळायला मार्ग नव्हता. एकजण आत गेला की दुसऱ्या मिनिटालाच दुसऱ्याला आत सोडलं गेलं. म्हणजे मिनिटाच्या आतच आतला प्रयोग पाहून होत होता. नंतर नंतर तर काही सेकंदांतच हा प्रयोग पाहून होऊ लागला. पाहता पाहता सर्व लोकांचा प्रयोग पाहूनही झाला. बरेच लोक प्रयोगाची टर उडवीत निघूनही गेले.
बंद खोलीत एकेकटय़ाने काही सेकंदात पाहून होणारा हा नेमका काय प्रयोग होता? तर- त्या बंद खोलीत आत गेल्याबरोबर समोर मोठ्ठा आरसा लावलेला होता. भरपूर प्रकाश होता. तिथं उभं राहिल्यावर समोरच्या आरशात स्वत:चं मोठं प्रतिबिंब दिसायचं. खोलीत दुसरं काहीच नव्हतं. फक्त आणि फक्त आरसा आणि त्यात दिसणारं स्वत:चं प्रतिबिंब. आरशात स्वत:लाच बघून प्रत्येकजण आल्या पावली बाहेर जायचा. त्या एकमेव आरशात नेमकं काय बघायचं, हे लोकांना कळलंच नाही. स्वत:कडेच काय बघायचं, म्हणून कोणी नीट बघितलंच नाही. उलट, बऱ्याचजणांना हा वेडेपणा वाटला. पण नाटककाराची भूमिका स्पष्ट होती. दरवेळी नाटक पाहताना आपण दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून पाहतो. कधीतरी स्वत:ला स्वत:च्या आत डोकवायला हवं. निदान स्वत:ला निरखून पाहायला तरी हवं.
ती चिमुरडी मुलगी अज्ञानामुळं स्वत:च्या सावलीपासून दूर पळू पाहतेय. पण ज्ञानी असणारी मोठी माणसं तरी काय करताहेत? स्वत:पासून दूरच पळताहेत. खूप माणसं एकटं राहायला घाबरतात. कारण एकटं असलं की आपण खरे असतो. हे आपलं खरं रूप आपल्याला त्रास देणारं आहे. मला भाषणात खोटं बोलता येतं; पण स्वत:शी खोटं बोलणं शक्य नसतं म्हणून मी स्वत:शी बोलतच नाही. स्वत:शीच खोटं वागता येत नाही. त्यामुळं मी स्वत:लाच टाळतो. सगळ्या जगाकडे नजर रोखून मी पाहू शकतो; पण स्वत:च्या नजरेला नजर मिळवू शकत नाही. मी सगळीकडे असतो; पण स्वत:जवळच नसतो. स्वत:मध्ये नसणं हेसुद्धा स्वत:पासून पळण्यासारखंच आहे. अशावेळी भौतिक सुखांच्या कितीही दाट सावलीत बसलं तरी थंडावा मिळत नाही. उलट, या सावल्या पोळू लागतात. म्हणून त्या चिमुरडय़ा मुलीसारखे आपणही आपल्याच सावलीला घाबरतो आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा