हैदराबादमधील ऐतिहासिक मक्का मशिदीतील बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने अखेर ११ वर्षानंतर निकाल दिला आहे. सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने स्वामी असीमानंदसह पाचही आरोपींना दोषमुक्त केले आहे.

हैदराबादमधील मक्का मशिदीत १८ मे २००७ रोजी नमाज सुरु असताना बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५८ जण जखमी झाले होते. या स्फोटानंतर आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. यात आणखी ५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण १६० साक्षीदार होते.

हैदराबाद बॉम्बस्फोटांमध्ये १० आरोपी होते. हे सर्व जण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहेत. स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा उर्फ अजय तिवारी, भरत मोहनलाल रतेश्वर, राजेंद्र चौधरी व अन्य पाच जण या प्रकरणात आरोपी होते. तपास यंत्रणांनी स्वामी असीमानंदसह पाच जणांना अटक केली होती. यातील स्वामी असीमानंद व भरत भाई या दोघांची जामिनावर सुटका झाली होती. तर उर्वरित तीन आरोपी हैदराबादमधील कारागृहात आहेत. आरोपी रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे दोघे अजूनही फरार आहेत. आणखी एक आरोपी सुनील जोशीचा गोळीबारात मृत्यू झाला होता. तसेच तेजराम परमार आणि अमित चौहान या दोघांविरोधात अजूनही तपास सुरु आहे.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. ६८ प्रत्यक्षदर्शींचा जबाब सीबीआयने नोंदवला होता. यातील ५४ साक्षीदारांनी जबाब फिरवला आहे. सीबीआयने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर एप्रिल २०११ मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता.

Story img Loader