डॉ. चताली लड्ड श्वसनविकारतज्ज्ञ
दमा या आजाराच्या नावातच ‘दम लागणे’ ही क्रिया असल्यामुळे या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला थोडेसे काम केल्यासही दम लागतो. सतत खोकला येणे आणि कफ जमा होणे यामुळे रुग्ण त्रस्त होतो. त्यातच हिवाळ्यात कोरडे वातावरण असल्यामुळे दमा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढते आणि दम्याचा झटका येण्याच्या प्रमाणातही वाढ होते.
श्वसननलिकेवाटे शरीरात आलेल्या हवेतील ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचवण्याचे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडण्याचे काम फुप्फुसे करतात. मात्र दमा या आजारात श्वसनमार्गाला सूज आल्यामुळे ही वाहिनी आकुंचन पावते आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात फुप्फुसापर्यंत पोहोचण्यास आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडण्यास अडथळा येतो. श्वसनमार्गात कफ चिकटून राहिल्यामुळे श्वासोच्छ्वास करण्यास अडथळा निर्माण होतो. दमा या आजाराच्या नावातच ‘दम लागणे’ ही क्रिया असल्यामुळे या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला थोडेसे काम केल्यासही दम लागतो. सतत खोकला येणे आणि कफ जमा होणे यामुळे रुग्ण त्रस्त होतो. त्यातच हिवाळ्यात कोरडे वातावरण असल्यामुळे दमा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता वाढते आणि दम्याचा झटका येण्याच्या प्रमाणातही वाढ होते.
दमा होण्याची कारणे
- सामान्यपणे परागकण, सिगारेटचा धूर, धुळीचे कण, पाळीव प्राणी, झुरळे यांमुळे ही समस्या प्रामुख्याने उद्भवू शकते.
- लहान मुलांच्या श्वसननलिकांचा आकार अरुंद असल्यामुळे या समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.
- दम्याचा आजार आनुवंशिकदेखील असतो. वडील किंवा आई या दोघांपकी एका पालकांना दम्याचा आजार असेल तर मुलांमध्ये ही समस्या होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते.
- हार्मोन्सचे असंतुलन
- मानसिक तणावामुळे दम्याच्या रुग्णांना दम्याचा झटका येऊ शकतो.
- अतिपरिश्रम किंवा अतिव्यायामामुळे अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असते.
- प्रदूषणामुळे दम्याचा आजार अधिक बळावतो.
- हिवाळ्यात हवा कोरडी असते, कोरडय़ा हवेमुळे श्वास घेताना अडथळा निर्माण होतो. मुळात दम्याच्या रुग्णांना श्वसनमार्गात सूज आल्यामुळे फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास अडथळा येत असताना कोरडय़ा हवेमुळे हा त्रास बळावतो आणि दम्याचा झटका येण्याचे प्रमाण वाढते.
उपचारपद्धती
- दमा हा श्वसनमार्गातील दाह किंवा सूज यामुळे अधिक तीव्र होऊ शकतो. त्यामुळे त्याच्यावर उपचारासाठी योग्य ती औषधं तसेच तोंडाने ओढणारी औषधे (इनहेलर) किंवा गोळ्यांच्या स्वरूपातील औषधे घ्या. त्याचबरोबर घेत असलेल्या उपचारपद्धतींचा परिणाम वेळोवेळी अभ्यासला पाहिजे.
- तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या औषधांचा (इनहेलर) थेट परिणाम श्वसनमार्गातील सूज आलेल्या जागेवर होतो आणि रुग्णाला त्वरित आराम मिळतो.
- दम्याच्या औषधांचे सेवन करण्याबरोबरच शरीराला योग्य आराम मिळणे आवश्यक आहे.
- दम्यावरील उपचारात काही वेळा स्टिरॉइडचादेखील वापर होतो. याचा परिणाम दम्यावर नियंत्रण आणणे अधिक तीव्र व जलद गतीने होते. अनेकदा लहान मुलांना याची सवय लागते. हे इनहेलर प्रकारातील स्टिरॉइड असून त्याचे लहान मुलांना दिले जाणारे प्रमाण हे अत्यल्प असणे चांगले.
- कुठल्याही प्रकारचा दमा असला तरी त्याच्यावर योग्य प्रकारे उपचार केले तर तो निश्चितपणे कमी होण्यास तसेच नियंत्रित करण्यास यश मिळते. अगदी ६ वर्षांहून लहान असलेल्या मुलांच्या बाबतीतदेखील असे आशादायी चित्र आहे आणि हा आजार कायमस्वरूपी दूर करता येतो.
- एक डायरी तयार करून आपल्यासोबत ठेवावी. त्यानुसार निष्कर्ष निश्चित करावेत. त्याचा उपयोग उपचाराच्या वेळी होऊ शकतो.
- वैद्यकीय पाश्र्वभूमी विचारात घेऊनच आजाराचे निदान अथवा उपचार करावेत. कुठल्या औषधांना रुग्णाचे शरीर योग्य प्रतिसाद देत आहे, हे विचारात घेणे आवश्यक आहे.
- सीबीसी (कम्प्लीट ब्लड काउंट), छातीचा एक्सरे या प्राथमिक चाचण्या करून घ्याव्यात. त्यानंतर पिक फ्लोमेंटरी ही मोठय़ा मुलांसाठी उपयुक्त पद्धत आहे. पल्मनरी ही चाचणी किशोरवयीन मुलांमध्ये करता येते.
- रुग्णाला दम्याचा झटका आल्यावर तातडीने रुग्णालयात हलवले जाते. फुप्फुसात औषधे पोहोचवण्यासाठी नेब्युलायझर हे उपकरण वापरून त्याच्यावर उपचार होतात आणि बरे वाटल्यास रुग्णाला घरी सोडले जाते.
- दम्याचा त्रास होत नसतानाही त्यावरील उपचारपद्धती आणि औषधे घेत राहावीत.
दम्याची लक्षणे
- नाकात संसर्ग होणे किंवा नाक जड होणे.
- वरचेवर सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवणे.
- श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे
- छातीत धडधड किंवा श्वास अडकल्यावर घरघर आवाज येणे.
- कुटुंबातील कुणाला दम्याचा आजार किंवा अॅलर्जी असणे.
आहार
दम्याचा त्रास असलेल्या किंवा सातत्याने सर्दी, कफ, खोकला असणाऱ्यांनी थंड पदार्थ टाळावेत. या थंड पदार्थामुळे छातीत कफ तयार होतो. थंड दूध, दही, िलबूवर्गीय फळं आदी थंड पदार्थ अधिक प्रमाणात खाऊ नयेत. अनेक पदार्थामधील रंग तसेच घटक यांच्यामुळेही दमा वाढू शकतो. शरीराच्या वाढीसाठी तसेच विकासासाठी सर्वागीण संतुलित आहार आवश्यक आहे. त्यामुळे आजारानुसार आहार ठरवावा. तर ज्या पदार्थाची अॅलर्जी होते, असे पदार्थ खाणे टाळावे.
खेळ
दम्याच्या रुग्णांनी मैदानी खेळ जरूर खेळावेत. दमा आहे म्हणून व्यायामशाळेत पाठविणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ बंद करू नयेत. नियंत्रित दम्यामुळे रुग्ण आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व कामे योग्य प्रकारे करू शकतात. वेळच्या वेळी औषधं घेतल्यामुळे दमा नियंत्रित राहू शकतो. लहान मुलांच्या बाबतीत दीर्घकालीन उपचारासाठी पालक व डॉक्टर यांनी एकत्रितपणे लक्षणानुसार त्यांच्यावर उपचार, तसेच दमा नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात आणि त्यानुसार त्यांचा खेळ आणि खेळाची वेळ ठरवावी.