मर्सिडीज इंडियाने १ जानेवारीपासून तिच्या सर्व प्रकारच्या गाडय़ांच्या एक्स शोरूम किमतीत दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मर्सिडीज इंडियाचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोलँड फॉगर यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली. ते म्हणाले, ‘मर्सिडीजने कायमच आपल्या ग्राहकांचे हित जपले आहे. प्रत्येक गाडीच्या निर्मितीत ग्राहकांच्या हिताचा प्राधान्याने विचार करण्यात आला. त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाडय़ांच्या निर्मिती खर्चात वाढ झाली आहे. या निर्मिती खर्चाचा ताळमेळ जमवण्यासाठी कंपनीने प्रत्येक मॉडेलच्या एक्स शोरूम किमतीत दोन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे’. कंपनीने गाडय़ांच्या किमतीत वाढ केली असली तरी ग्राहकांसाठी मर्सिडीजने खास फायनान्शिअल सोल्युशन्स आणले आहेत. मर्सिडीजच्या शोरूम्समध्ये याची माहिती मिळू शकणार आहे. मात्र, नव्या वर्षांत मर्सिडीज महाग होणार हे नक्की.

 

पुराचा फटका वाहननिर्मात्यांना
नवी दिल्ली : भारतातील डेट्रॉइट असे संबोधल्या जाणाऱ्या चेन्नईला सध्या पुराने वेढले आहे. आठवडाभर संततधार पडणाऱ्या पावसाने चेन्नईत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका वाहननिर्मात्या कंपन्यांना बसला आहे. चेन्नई व परिसरात अनेक नामांकित वाहननिर्मात्या कंपन्यांचे कारखाने आहेत. रॉयल एनफिल्ड व अपोलो टायर्स हेही त्याला अपवाद नाहीत. रॉयल एनफिल्डच्या प्लांटमध्येच पाणी शिरल्याने येथील उत्पादन ठप्प पडले आहे. तब्बल चार हजार गाडय़ा या ठिकाणी तयार केल्या जातात. तर अपोलो टायर्सनेही उत्पादन थांबवल्याने एकूणच नजीकच्या भविष्यात गाडय़ांच्या निर्मितीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

Story img Loader