सुप्रिया शिरीष, बर्मिंगहॅम, इंग्लड
गेले वर्षभर मी ‘अॅस्टन बिझनेस स्कूल ऑफ अॅस्टन युनिव्हर्सिटी’मध्ये स्ट्रॅटेजिक मार्केटिंग शिकते आहे. मास्टर्सचा हा कोर्स पूर्ण होत आला असून ऑक्टोबरपासून इन्टर्नशिप सुरू होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाचा अनुभव, ज्ञान आणि माहितीमुळे बरंच काही शिकायला मिळतं. आपण विविध स्तरांवरच्या आणि स्वभावाच्या लोकांना भेटतो, त्यांच्याकडून चार चांगल्या गोष्टी शिकतो, हा अनुभव मला घ्यायचा होता. स्वत:ला दिलेल्या या संधीमुळे आत्मविश्वास चांगल्या रीतीने वाढतो. गेल्या वर्षी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेशासाठी अर्ज भरले, तेव्हा नोकरीही सुरू होती. त्यामुळे शिक्षण की नोकरी अशी द्विधा मन:स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, ‘अॅस्टन बिझनेस स्कूल’कडून स्कॉलरशिप ऑफर केली गेली त्यामुळे इथे यायचा निर्णय पक्का झाला. इथल्या तयारीचे ते दोन महिने आत्ताही आठवत आहेत. जाम धावपळ आणि तारेवरची कसरत झाली होती. बाकी सगळी तयारी होते, पण मनाचं काय?.. विमान उतरताना माझे डोळे भरून आले होते.. सगळं कसं निभावेल, वगैरे प्रश्नांची मनात एकच गर्दी झाली होती. मला घ्यायला युनिव्हर्सिटीचे लोक आले होते. त्यांनी मला युनिव्हर्सिटीत सोडलं आणि त्या नव्या रूममध्ये दोन सूटकेससह मी राहायला लागले. खोटं वाटेल, पण दोन दिवस फारसं सामान उघडलंच नव्हतं. मनाला समजावत होते, स्वत:ला सांभाळत होते..
यशावकाश लेक्चर्स सुरू झाली. सगळे विद्यार्थी एकदम हुशार आणि चुणचुणीत. त्यांच्यासोबत राहून या प्रवाहात छान पोहायचंच, हे मनाशी पक्कं केलं. इथे आपले विषय आपण निवडू शकतो. त्याच्याशी संबंधित अभ्यासासह, संशोधनाचं काम दिलं जातं. त्या विषयांच्या प्रकल्पांसह चर्चासत्र, नेटवर्किंग इव्हेंट्स वगैरेंना उपस्थित राहावं लागतं. माझा विषय अतिशय सविस्तर आणि सखोल शिकायची संधी मला मिळाली. माझ्या आजवरच्या ग्रेड्स आणि अनुभवामुळे इथली स्कॉलरशिप मिळाली. इथे कायमच गुणवत्तेला प्राधान्य दिलं जातं. प्रत्येक जण प्रचंड मेहनत घेतो. जीवनशैली कितीही व्यग्र असली तरी तितकीच शांतताही आहे आजूबाजूला. त्यामुळे आपल्यालाही अभ्यासात पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येतं. आपल्या ध्येयाच्या वाटचालीचा आडाखा बांधता येतो. मी स्वत: खूप शांत असल्यानं हे वातावरण मला लगेचच भावलं. मुळात युनिव्हर्सिटीचा हा कॅम्पस बघूनच अर्ज केला होता. इथे आजूबाजूला तलाव आहेत, मैदानं आहेत. त्यामुळे बाहेर अभ्यास केला तरी शांतता मिळते. एखादी रांगोळी काढताना कसे एकेक बिंदू जोडले जातात, अगदी तसं झालं..
सध्या मी कॅम्पस अकोमोडेशनमध्ये राहाते आहे. इथल्या खाद्यजीवनाशी अॅडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. उदाहरणार्थ, आईच्या हातचे साबुदाणे वडे, रगडा-पॅटिस वगैरे पदार्थ अजिबात मिळत नाहीत इथे. ते खाण्यासाठी वेळ काढून दूरच्या भारतीय रेस्तराँमध्ये जावं लागतं. आपले पदार्थ प्रचंड मिस करते. मी बहुतांशी वेळा घरीच करते सगळं. बाहेरच्या पॅक्ड फूडपेक्षा मी वरणभात करते. आम्ही पाच फ्लॅटमेट्स राहतो आहोत. आमचं किचन कॉमन आहे. शिवाय भारतातून आई काही ना काही कोरडय़ा पदार्थाचं पार्सल पाठवते. जवळच्या ग्रोसरी स्टोअरमधून भाज्या वगैरे विकत घेते. माझे फ्लॅटमेट्स जर्मन, अमेरिकन, चायनीज-मलेशियन आणि व्हिएतनामी आहेत.
आमच्या इंडक्शनच्या वेळी प्रत्येकाने आपापल्या देशाविषयी काहीतरी बोलायचं होतं. आमचे ग्रुप्स करण्यात आले होते. माझ्या ग्रुपमध्ये मुख्यत्वे अमेरिकन आणि चायनीज होते. प्रत्येक जण स्वत:च्या देशाविषयी सांगत होता. मी ‘ॐ’ या शब्दाची महती सांगितली. त्यांच्यासाठी ते खूप नवीन होतं. त्यांना ते पचनी पडायला खूप वेळ लागला. त्यानंतर प्रत्येक ग्रुपमधून वेगळा विषय असणाऱ्यांनी पूर्ण वर्गासमोर बोलायचं होतं. आमच्या ग्रुपमधून माझी निवड झाली. जवळपास ५०० लोकांनी तो सेमिनार हॉल भरला होता. त्या स्टेजवर उभं राहून मी सगळ्यांना ‘ॐ’ म्हणायला लावलं. अगदी अविस्मरणीय प्रसंग होता तो.. वर्कग्रुपमध्ये काम सुरू करण्याआधी एकमेकांच्या काम करण्याच्या पद्धती समजून घ्याव्या लागतात. माझ्या ग्रुपमधल्या सगळ्यांची बौद्धिक झेप विस्मयकारक होती. सगळेच मेहनती होते. काम करताना प्रत्येकाच्या विभिन्न विचारशक्ती आणि संस्कृती यामुळे आपल्या अनुभवांतही भर पडते. चायनीज आणि भारतीय संस्कृतीत खूप साम्य आहे, असं मला जाणवलं. तिथेही ‘अतिथी देवो भव’ मानलं जातं. डिनर, हाऊ सपार्टीच्या वेळी या मित्रमंडळींनी माझ्यासाठी कायम लक्षात ठेवून शाकाहारी पदार्थ केले. चायनीज एकमेकांना ग्रीट करताना त्यांचा पहिला प्रश्न असतो की, ‘तुम्ही काही खाल्लंत का?’, हे मला प्रचंड आवडलं. या सगळ्यामुळे एकमेकांच्या संस्कृतीविषयी बोलणं आणि विचारांची देवाणघेवाण होते. एकमेकांना सांस्कृतिक प्रतीक ठरणाऱ्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात.
आमची युनिव्हर्सिटी शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. सभोवताल सुनियोजित आहे. मनोरंजन आणि विरंगुळ्यासाठीचे पर्याय वेगवेगळ्या जागी आहेत. माझे दोन फ्लॅटमेट्स पार्टी अॅनिमल्स आहेत. त्यांना पार्टी कल्चर प्रचंड आवडतं. वीकएण्डला मी वाचनाला किंवा नवीन ठिकाणी फिरण्याला प्राधान्य देते. त्यामुळे आमच्याकडे होणाऱ्या हाऊसपार्टीच्या वेळी मी घरी नसते. बाहेरच्या मित्रमंडळींकडून पार्टीचं निमंत्रण आल्यावर मी गेले, पण ते कल्चर तितकंसं नाही पटलं मला. आसपास ट्रेकिंगसाठी बरीच ठिकाणं आहेत. पहिल्या सेमिस्टरमध्ये दर रविवारी कुठंतरी बाहेर जायचो. मी राहाते, त्या भागात उंच इमारती नाहीत. नजर पोहोचेल तिथवर आकाश दिसतं छानसं.
इथले लोक जास्त बोलके नसले तरी मदतीस तत्पर असतात. हवामान फारच बेभरवशाचं आहे. मी आले, त्या सुमारास युनिव्हर्सिटीत सहा इंच बर्फ साठला होता. आम्ही बाहेर पडू शकत नव्हतो. सगळेच व्यवहार बंद पडले होते. आमचा एक पेपर पुढे ढकलला गेल्याने नंतर एका दिवसात दोन पेपर्स लिहिले. या वर्षभरात अनेक मस्त किस्से घडलेत. आम्हा फ्लॅटमेट्सचा मिळून एकच फ्रीज आहे. आमचा बेन हा मलेशियन-चायनीज मित्र सगळं खातो. एकदा सकाळी लेक्चरला जाताना ज्या पॅनवर मी ऑम्लेट करते, तो बाहेरच ठेवला होता. त्या पठ्ठय़ाने त्यावर त्याचं हॅम कूक केलं नि ते तसंच ठेवलं होतं दिवसभर. आल्यावर माझ्या ते लक्षात आलं, तेव्हा डोक्याला हात लावून हसण्यापलीकडे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. एकदा आमचा फ्रीज चुकून उघडाच राहिला आणि आतल्या वस्तू मेल्ट झाल्या. तो नजारा पाहून आम्ही एकमेकांवर चिडण्यापेक्षा हसतच बसलो. फ्लॅटभर पाणी झाल्याने सगळी निस्तरपट्टी करावी लागली होती.
इथे पिअर टय़ुटोरिंग असतात. इंडियन पिअर टय़ुटर म्हणून मला नॉमिनेट केलं गेलं. त्यानंतर वर्षभरात अपकमिंग स्टुण्डंट्सना मी शिकवलं. मी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमधला एक दुवा झाले. या कामाचं मला खूप मानसिक समाधान मिळालं. आमच्या अॅस्टनव्हिला फुटबॉल क्लबसह प्रत्येक खेळाचे क्लब असून मी बॅडमिंटन क्लबची सभासद आहे.
आवडते खेळ खेळून आम्ही मस्त रिलॅक्स होतो. हवामान ठीक असेल तर मी जॉगिंग करते. सकाळी बरेच जण जॉगिंगला जातात. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यग्र असतो. पहिल्यांदा संवाद साधताना थोडासा अडथळा येतो, पण नंतर सवय होते. ते बघून आपणही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला शिकतो. इथले वर्कएथिक्स खूप हाय आहेत. वक्तशीरपणाला महत्त्व आहे. प्रत्येकाच्या मताला कायम मान दिला जातो. इथली तरुणाई पाच दिवस प्रचंड काम आणि वीकएण्डला तितकीच मज्जा करते.
इथल्या ओपन थिएटरमधल्या चित्रपट महोत्सवाला मी हजेरी लावली होती. तिथल्या बीन बॅग्जवर बसून चित्रपट पाहण्याचा अनुभव एकदम सहीच होता. मी लहानपणापासून रंगभूमीशी निगडित आहे. इथल्या ड्रामा क्लबमध्ये सामील झाले. इथल्या रंगकर्मींची नाटकं बसवतानाची प्रक्रिया आपल्यापेक्षा खूप वेगळी आहे. पहिल्या टर्ममध्ये मला नाटक दिग्दर्शित करायची संधी मिळाली. तो खूप छान अनुभव होता. माझ्या सुपरवायझरला हा सांस्कृतिक आदान-प्रदानाचा प्रयोग खूप भावला होता. मी चेहऱ्याचे आणि अन्य एक्सरसाईज घ्यायचे, ते अजूनही फॉलो करत आहेत. भारतातून इथे येताना खूप मानसिक त्रास झाला होता. आता वर्षभर वास्तव्य केलेलं इथलं घर सोडून जातानाही त्रास होतो आहे.. हे असं असलं, तरीही ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’..
शब्दांकन : राधिका कुंटे
viva@expressindia.com