गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजपा पक्ष वाढला, मात्र सूडाचं राजकारण करुन त्यांच्याच मुलीचा पराभव केला. पक्ष वाढवणाऱ्यांचेच पंख छाटले जात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला आहे. या सल्ल्यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी मिटकरींवर निशाणा साधला आहे.
नितेश राणेंचा अमोल मिटकरींना सल्ला
“अमोल मिटकरींनी दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा आपल्या पक्षात विरोधी पक्ष नेत्यावरुन काय सुरु आहे हे पहावं. अशाच प्रकारचा सल्ला आम्ही जयंत पाटील यांना द्यायचा का? असा प्रतिप्रश्नही नितेश राणे यांनी मिटकरींना विचारला आहे. स्वत: ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे अमोल मिटकरींनी करु नये”, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंना टोला
शिंदे गटाचे १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य नुकतचं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. यावरुनही नितेश राणेंनी निशाणा साधला आहे. खैरेंना जे बोलायचं आहे ते बोलू द्या. भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्रात ताकदीने काम करत आहे. पावसाळी अधिवेशनही आम्ही यशस्वी पद्धतीने सांभाळलं २०२४ पर्यंत महाराष्ट्रात हेच सरकार राहणार आहे. तुमचे उर्वरीत १२-१५ आमदार तुमच्याबरोबर राहतात का खैरेंनी याची काळजी घ्यावी, असा खोचक टोलाही राणेंनी लगावला आहे.