भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी पाक व्याप्त काश्मीर (पीओके) व गिलगीटमध्ये लोकसभेच्या जागेची मागणी केली असून सरकारने याबाबत लोकसभेत एक विधेयक सादर करावे असेही त्यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना म्हटले. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर बोलताना पाकव्याप्त काश्मीरमधील बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता. तोच धागा पकडून खासदार दुबे यांनी ही मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वीही केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी पीओके, गिलगीट आणि बलुचिस्तान येथील नागरिकांचा स्वातंत्र्यासाठी कौल घेण्याची मागणी केली होती. तसेच जम्मू काश्मीर ते सांबा या तिरंगा यात्रेच्या शुभारंभवेळी पीओकेमध्येही भारताचा तिरंगा फडकावण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पाकिस्तान जर जम्मू-काश्मीर आणि भारतात दहशतवादाला खतपाणी घालून अस्थैर्य निर्माण करणे बंद करणार नसेल तर भारतालाही पाकमधील बलुचिस्तान प्रांतातील दडपल्या गेलेल्या जनतेच्या स्वातंत्र्यकांक्षांना फुंकर घालण्याचा पर्याय अवलंबावा लागेल, असा गर्भित इशारा दिला होता. भारताच्या पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरच्या पाकव्याप्त प्रदेशांविषयी आणि बलुचिस्तानविषयी अशा रीतीने जाहीरपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय उपखंडातील भू-राजकीय घडामोडींमध्ये त्याला विशेष महत्त्व आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणावर बलुचिस्तान येथील राजकीय नेत्यांनी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला होता. पंतप्रधान मोदींच्या भाषणावर पाकस्तानचा तीळपापड झाला आहे. भारत बलुचिस्तानातील दहशतवादी कारवायांना खतपाणी घालत असल्याचा आरोप पाकने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा