‘चकमक’फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारून त्यांचे आमदार बनण्याचे स्वप्न राजकीय पक्षांनी धुळीस मिळविले आहे. शर्मा यांनी एकाचवेळी शिवसेना आणि भाजप तर वाझे यांनी सेनेतून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. परंतु या दोन्ही राजकीय पक्षांनी त्यांना ठेंगा दाखविला आहे.
लखनभय्याच्या खोटय़ा चकमकीप्रकरणी शर्मा यांना निर्दोष सोडण्यात आले होते. मात्र अन्य २२ जणांना शिक्षा ठोठावण्यात आली. शर्मा यांच्या विरोधात राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. या पाश्र्वभूमीवर शर्मा यांना उमेदवारी मिळते का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्याविरोधात लढण्यासाठी इच्छुक होते. शिवसेनेकडून आपल्याला हिरवा कंदील मिळाल्याचे ते सांगत होते. परंतु त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही त्यांनी भेट घेतली होती. परंतु प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांनी त्यांना उमेदवारी दिलेली नाही. शर्मा यांनी अंधेरी पूर्वेतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा मिळविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. परंतु भाजप व सेनेने आपापले उमेदवार घोषित केल्यामुळे आता हे उमेदवार शर्मा यांच्यासाठी माघार घेतात का, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
शिवसेनेतून उमेदवारी मिळेल, याबाबत वाझे आशावादी होते. परंतु त्यांनाही कुठूनही उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यांनी अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

Story img Loader