उत्तर अमेरिकेतील मराठीजनांचा परमोच्च आनंदाचा, परस्परांतील ऋणानुबंध दृढ करण्याचा सोहळा म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळाचं द्वैवार्षिक अधिवेशन. यंदा हे अधिवेशन पाच ते सात जुलैमध्ये बोस्टनजवळील प्रॉव्हिडन्स, र्होड आयलंड इथं होतंय. अमेरिकेतील सिटीग्रुपचे उपाध्यक्ष आशिष चौघुले या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. मुळचे मुंबईकर असलेले आशिष चौघुले गेल्या २३ वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झालेत. नोकरीच्या निमित्तानं १९९१ मध्ये अमेरिकेत गेलेल्या आशिष चौघुले यांचा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास हे मराठी माणसानं सातासमुद्रापार मिळवलेल्या यशाचं प्रातिनिधक उदाहरण म्हणावं लागेल. अधिवेशनाच्या निमित्तानं ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या टीमनं त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद…
उत्तर अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळ आणि बृहन्महाराष्ट्र मंडळातील आतापर्यंतच्या तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? काय आठवणी आहेत?
१९९१ साली मी अमेरिकेत आलो. अभियांत्रिकीची पदवी घेतली होती आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नोकरीच्या निमित्ताने इकडे आलो. मुळात लहानपणापासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याकडं माझा कल होता. माझं लहानपण पार्ल्यात गेलं. घरच्यांचे आणि शाळेचे संस्कार होतेच. शाळेत असताना विविध नाटकांत काम करायला मी सुरुवात केली होती. आंतरशालेय स्पर्धेत भागही घेत होतो. महाविद्यालयातील मराठी वाड्:मय मंडळातही माझा सहभाग असायचाच.
ही सगळी पार्श्वभूमी असताना इकडे अमेरिकेत आल्यावर स्थिरस्थावर होणं, याला माझं पहिलं प्राधान्य होतं. चांगली नोकरी मिळवून लवकरात लवकर घर घ्यायचं पक्कं केलं होतं. स्थिरस्थावर झाल्यावर मग पुन्हा एकदा सास्कृंतिक गोष्टींकडं माझं मन आपोआप ओढलं जाऊ लागलं. त्यातून परत परदेशात असल्यामुळे मायभूमीची ओढ होतीच. मी जिथं राहतो, त्या डेलावेअरमध्ये त्याकाळी मराठी मंडळ नव्हतं. त्यावेळी विविध सणांची जबाबदारी आम्ही वाटून घेतली होती. प्रत्येकजण उत्साहाने सर्व सणांमध्ये सहभाग घ्यायचा. मग २००२ साली आम्हीच मराठी मंडळ स्थापन केलं. महाराष्ट्रातील विविध सण दसरा, दिवाळी, पाडवा, गणपती आम्ही मंडळातर्फे साजरे करायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या उत्स्फूर्त सहभागाने सुरेखपणे विविध कार्यक्रम आमच्या मंडळात होऊ लागले. मंडळाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मग मी नाटक लिहायला सुरुवात केली. काही नाटकांमध्ये कामही केलं. वक्तृत्त्व स्पर्धांमध्ये लहानपणापासून भाग घेत असल्यामुळं कार्यक्रमाचं निवेदन करण्याची आवड होतीच. त्यामुळंच मग अमेरिकेतील विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. याच निमित्तानं खरंतर खूप माणसं जोडली गेली. माझा अमेरिकेतील मित्रपरिवार वाढत गेला.
२००४ साली आम्ही अमेरिकेत ‘मायमराठी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केला. कार्यक्रमात मराठी लोकसंगीत, पोवाडा, लावणी अशा विविध लोककलांचे सादरीकरण केलं जायचं. या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी माझ्याकडेच होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे लेखन आणि बांधणी मीच केली होती. अमेरिकेतील प्रत्येक मंडळात हा कार्यक्रम झाला. लोककला सगळीकडे पोहोचावी, हाच केवळ आमचा उद्देश होता. फक्त अमेरिकेतच नाही, तर ‘सुयोग’च्या माध्यमातून मुंबईतही आठ ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही सादर केला.
मायमराठीनंतरही विविध कार्यक्रमांसाठीचे लेखन आणि त्याची बांधणी मी करतच होतो. घर आणि नोकरी सांभाळून वेगवेगळ्या संकल्पनेवर वेगवेगळे कार्यक्रम आम्ही सादर करत होतो. २००५ साली बीएमएमच्या अधिवेशनात मी स्टॅण्डअप कॉमेडी सादर केली. बघायला खूप मजा येते, पण प्रत्यक्षात करायला हा खूप अवघड प्रकार आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यावेळी पहिल्यांदा माझा बृहन्महाराष्ट्र मंडळाशी संबंध आला.
त्याचवर्षी ‘लोकसत्ता’साठी मी या अधिवेशनाचे वार्तांकनही केलं होतं. ‘लोकसत्ता’चे माजी संपादक माधव गडकरी यांनी मला त्यावेळी मार्गदर्शन केले. दिवसभर अधिवेशनातील विविध कार्यक्रम बघायचे आणि रात्री त्याचं वार्तापत्र फॅक्सने मुंबईला पाठवायचो. पत्रकारितेचा हा माझा पहिलाच अनुभव होता. त्यातूनही मी खूप शिकलो. २००५ मध्ये मी बीएमएमच्या कार्यकारी समितीवर निवडून आलो. त्यावेळीच आम्ही बीएमएमचा बोधचिन्हं बदललं. नव्या पिढीचा विचार करून नवीन विचारसरणीचं बोधचिन्हं आम्ही तयार केलं. २००७ साली बीएमएमच्या खजिनदार समितीचा मी सदस्य झालो. त्यानंतर एमबीए करायचं असल्यानं दोन वर्षे बीएमएमच्या कामातून स्वतःला बाजूला काढलं. इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एमबीए केल्यावर २०११ मध्ये मी पुन्हा एकदा बीएमएमच्या कामाकाजात सक्रिय झालो.
बीएमएमचे अध्यक्षपद स्वीकारताना तुमच्या मनात काय योजना होत्या. त्या यशस्वी झाल्या का?
अध्यक्षपद स्वीकारताना माझ्या मनात जी उद्दिष्ट होती, त्यापेक्षा जास्तच गोष्टी मी साकार करू शकलोय. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. बीएमएमच्या अध्यक्षाकडं नियोजनाची आणि समन्वयाची सर्वाधिक जबाबदारी असते. त्याचबरोबर नवीन काही करू शकतो का, याचाही विचार करायला लागतो. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मी अमेरिकेतील १८ मंडळांना भेटी दिल्या. दोन वर्षांमध्ये तिथं झालेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाना मी आवर्जून गेलो. तिथल्या मंडळातील सभासदांशी विविध विषयांवर चर्चा झाल्या. त्यांच्या नवीन उपक्रमांना प्रोत्साहन दिलं. याबरोबर आम्ही या दोन वर्षांत विविध कार्यक्रमांचे पॉडकास्टिंग सुरू केलं. कार्यक्रमांसाठी कॉर्पोरेट स्पॉन्सरशिपही आम्ही आणली. बीएमएमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ५५ पेक्षा जास्त कम्युनिटी आहेत. त्यांची डिरेक्टरी बनवण्याचे काम सध्या सुरू आहे.
अमेरिकेतील कार्यक्रमांबरोबरच इतर देशांतील मराठी मंडळाच्या कार्यक्रमांनाही मी गेलो. जागतिक मराठी परिषदेतर्फे दरवर्षी ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये भरवले जाते. या कार्यक्रमाला मला कायम निमंत्रित केलं जातं आणि मी आवर्जून तिथं जातोच. टोरांटोतील साहित्य संमेलनात मी सहभागी झालो होतो. ‘मिफ्टा’ अवॉर्डचे निमंत्रणही मी स्वीकारले आणि तिथेही जाऊन आलो. गेल्या दोन वर्षांच्या काळात आलेला प्रत्येक क्षण मी उत्साहानं आणि आवडीनं जगलोय. ‘बृहन्महाराष्ट्र वृत्ता’मधील माझ्या अध्यक्षीय सदराचा आता ‘फॅन क्लब’ तयार झालाय.
अमेरिकेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘उत्तररंग’ नावाची कम्युनिटीही आम्ही सुरू केलीये. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची अमेरिकेमध्ये प्रसिद्धी कशी करता येईल, यासाठी माझं महाराष्ट्र सरकारसोबत बोलणी झाली आहेत. त्यावरही काम सध्या सुरू आहे. कॉर्पोरेट भाषेत ज्याला ‘नेटवर्किंग’ म्हणतात, ते गेल्या दोन वर्षांच्या काळात अतिशय उत्तमपणे पार पडलं, असं मला वाटतं.
उत्तर अमेरिकेतील मराठी शाळांच्या प्रकल्पाबद्दल काय सांगाल?
अमेरिकेतील मराठी कुटुंबीयांना आपल्या मुलांना, नातवंडांना मराठी कसं शिकवायचं, याबद्दल खूप चिंता होती. एकूणच या विषयावर खूप संभ्रमाचं वातावरण होतं. या सगळ्याचा विचार करून आम्ही २००९ साली मराठी शाळा सुरू करायचा निर्णय घेतला. त्यावेळी मी बीएमएमच्या समितीवर होतो. अमेरिकेत वाढणाऱया मराठी कुटुंबातील मुलांचा विचार करून आम्ही अभ्यासक्रम तयार करायचं ठरवलं. टोरांटोमध्ये मराठी शाळा होती. तिथल्या शिक्षकांना आम्ही बोलावून घेतलं, त्यांच्याकडून आम्ही तिथं मराठी शाळा कशी चालते, हे समजून घेतलं. खूप विचार करून आम्ही मराठी शाळांसाठीचा अभ्यासक्रम तयार केला. हा अभ्यासक्रम आम्ही भारती विद्यापीठाकडे नेला आणि त्यांच्याबरोबर करार केला. सध्या अमेरिकेतील २७ मंडळांत मराठी शाळा सुरू असून, १५०० हून अधिक मुलं इथं मराठी शिकताहेत. दरवर्षी २५० ते ३०० मुले अभ्याक्रमाच्या परीक्षेला बसतात. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांना आम्ही प्रमाणपत्र देतो. या उपक्रमाला अमेरिकेतील मराठी लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अमेरिकेत जन्मलेली आणि वाढलेली बहुसंख्य मराठी मुलं या उपक्रमामुळं आपल्या आजी-आजोबांबरोबर तसेच घरच्यांबरोबर आता मराठीमध्ये बोलू शकतात, मराठीत लिहू शकतात तसंच मराठीत विचारही करू शकतात.
यंदाच्या बीएमएम अधिवेशनाची काय वैशिष्ट्ये आहेत?
बीएमएमचं हे सोळावं अधिवेशन आहे. प्रत्येक अधिवेशनाचे स्वतंत्र वैशिष्ट्य असतंच. पहिल्या अधिवेशनाला अवघी २५० लोकं आली होती. मात्र, अमेरिकेतील मराठी लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमाला उत्तरोत्तर मोठा प्रतिसाद मिळत गेला. अनेक मान्यवर या प्रवासामध्ये सहभागी झाले होते. पु.लं. देशपांडे, रघुनाथ माशेलकर, जब्बार पटेल, लता मंगेशकर, जयंत नारळीकर ही आणि इतरही अनेक मान्यवर बीएमएमच्या अधिवेशनाला येऊन गेले आहेत. मराठी लोकांनी परदेशात मिळवलेल्या यशाचा आनंदसोहळा या अधिवेशनाच्या निमित्तानं साजरा केला जातो, असं मला वाटतं.
मराठी माणूस हा पाहुणचारासाठी प्रसिद्धच आहे. आपण भारतात अतिथी देवो भव म्हणतो. अमेरिकेतील प्रत्येक मंडळाला आपल्याकडं बीएमएमचं अधिवेशन व्हावं असं वाटतं. अधिवेशनाला सुमारे चार हजार लोकं येत असतात. त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी १५० ते २०० स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेतात.
यंदा प्रॉव्हिडन्स, र्होड आयलंड इथं हे अधिवेशन होणार आहे. तिथून अगदी जवळच असलेलं बोस्टन हे शहर अमेरिकेतील शिक्षणाची पंढरी. तिथेच हे अधिवेशन होणार असल्यानं आम्ही शैक्षणिक परिषद भरवतोय. भारती विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ, शिक्षण प्रसारक मंडळी, एमआयटी अशा महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्था या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.
अधिवेशनात आपली कला सादर करणाऱया कलाकारांचे व्हिसा आम्ही एक महिना अगोदरच तयार केले आहेत. दरवेळी काही कलाकारांना व्हिसा न मिळाल्यामुळं त्यांना अधिवेशनात यायला जमत नाही. यावेळी महाराष्ट्रातून आणि इतर ठिकाणांहून अमेरिकेत येणाऱया मान्यवरांचा व्हिसा एक महिना अगोदरच तयार ठेवण्याचे ठरवलं.
‘ऋणानुबंध’ या संकल्पनेवर यंदाचे अधिवेशन होणार आहे. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेश मांजरेकर या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे असतील आणि प्रसिद्ध विज्ञानलेखक तसंच विज्ञान-प्रचारक डॉ. बाळ फोंडके यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलंय. यंदा पहिल्यांदाच अजय-अतुल या संगीतकार जोडीचा कार्यक्रम अधिवेशनात होणार आहे. याशिवाय व्यावसायिक परिषदाही अधिवेशनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आल्या आहेत.
अधिवेशनाच्या नोंदणीसाठी कसा प्रतिसाद आहे?
आतापर्यंत ८० टक्के नोंदणी झालीये. अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून काम करण्यालाही अमेरिकेतील मराठीजनांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. खरंतर हे संपूर्ण अधिवेशन स्वयंसेवकांच्या मेहनतीवरच पार पडतं. अधिवेशनस्थळी आलेल्या चार हजार लोकांची काळजी घेण्याचं काम स्वयंसेवकच करत असतात. त्यामुळं सगळ्या स्वयंसेवकांचे मला विशेष आभार मानावेसे वाटतात. एक गोष्ट मी त्यांना अगोदरच सांगितलीये. अधिवेशनात मतभेद होऊ शकतात. मात्र, कोणत्याही स्थितीत मनभेद होऊ देऊ नका.
महाराष्ट्र सरकारकडून अधिवेशनाला काही मदत मिळते का?
आम्हाला फक्त महाराष्ट्र सरकारचा आशीर्वाद हवाय. अमेरिकेमध्ये महाराष्ट्राचे एखादे दालन उभारण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही सरकारशी चर्चा करीत आहोत.
अध्यक्षपद संपुष्टात आल्यानंतर पुढे काय करण्याची योजना आहे?
अध्यक्षपद हे नाममात्र आहे. कागदी घोडे नाचवण्यात मला रस नाही. कोणत्याही पदाने मी हुरळून गेलो नाही किंवा पदाची हवा माझ्या डोक्यात गेलेली नाही. स्वयंसेवक म्हणून काम करत राहण्याचीच माझी इच्छा आहे. संस्था ही स्वयंसेवकांमुळेच वाढते, यावर माझा विश्वास आहे. पद असेल किंवा नसेल मला त्यानं फरक पडत नाही. मी अतिशय समाधानी माणूस आहे. पदाचा हव्यास मी कधीच केला नाही.
पुढील काळात मला महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळांकडे परदेशी नागरिकांना आकृष्ठ करण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, कोकणचा समृद्ध निसर्ग याकडे जास्तीत जास्त परदेशी पर्यटक कसे येतील, या प्रेक्षणीय स्थळांचे परदेशामध्ये प्रतिमानिर्मिती कशी करता येईल, त्यावर काम करण्याचे मी ठरवतोय. परदेशांमध्ये अतिशय छोट्या, छोट्या गोष्टींचेही खूप छान पद्धतीनं जतन केलं जातं. आपल्याकडं रत्नागिरीत जाऊन लोकमान्य टिळकांचं घर बघा आणि इंग्लंडमध्ये जाऊन शेक्सपिअरचं घर बघा. दोन्हींतील फरक तुम्हाला लगेच जाणवेल. परदेशामध्ये पुरातन वास्तूंचे फार प्रेमानं जतन केलं जातं. यादृष्टीने महाराष्ट्र सरकारबरोबर जागतिक सल्लागार मंडळ स्थापन करण्याचाही आमचा मानस आहे. त्यादृष्टीने बोलणी सुरू आहेत.
बीएमएमला अजून उत्तर अमेरिकेमध्ये कोणकोणत्या क्षेत्रात काम करण्याला वाव आहे?
सामाजिक कारणांसाठी सुरू झालेल्या संस्थांना उत्तर अमेरिकेतील बीएमएम कायम मदत करते. आता जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये असलेली मराठी मंडळं, भारतातील विविध राज्यांमध्ये असलेला मराठी भाषक समाज यांना एकत्र आणून काही करता येईल का, यावर विचार करायला हवा. जगभरातील मराठी बांधव एकत्र आल्यास भरीव कामगिरी करणं शक्य आहे. परदेशामध्ये महाराष्ट्राची प्रतिमानिर्मिती करणंही यामुळं शक्य होऊ शकेल.