‘बीएमएम सारेगम २०१३’ ही भव्य संगीतस्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोचली आहे. या स्पर्धेची उपांत्य फेरी नुकतीच बॉस्टन इथं पार पडली आणि अंतिम फेरीतल्या सहा स्पर्धकांच्या नावांची यावेळी घोषणा करण्यात आली. प्रतिभा दामले (रिचमंड), समिधा जोगळेकर (टोरांटो), रवी दातार (टोरांटो), प्रसन्न गणपुले (सिअ‍ॅटल), श्रेयस बेडेकर (ह्यूस्टन), आणि अक्षय अणावकर (न्यूजर्सी) या गायक-गायिकांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपस्थित प्रेक्षकांनी एसएमए. द्वारा दिलेल्या मतांवर अक्षय अणावकर यांना ‘ऑडियन्स चॉइस अ‍ॅवॉर्ड’ देण्यात आला. 
अमेरिका आणि कॅनडातून ३९ स्पर्धक उपांत्यफेरीसाठी बॉस्टनला एकत्र आले होते. एकूण १३ ठिकाणी स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली होती. संगीतक्षेत्रातले तज्ज्ञ मोहन भिडे, मोहिनी जोशी आणि रामचंद्र जोशी हे उपांत्यफेरीचे परीक्षक होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्यफेरीचे दोन टप्पे होते. पहिल्या टप्प्यातून १५ स्पर्धकांनी दुसर्‍या टप्प्यात प्रवेश केल्यावर, परीक्षकांच्या पसंतीचे गाणे सादर केले. या दोन्ही टप्प्यांतल्या कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीसाठीचे स्पर्धक निवडण्यात आले. किराणा घराण्याचे विख्यात गायक कैवल्यकुमार गुरव यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी ‘भारतातील कोणत्याही मोठ्या संगीतस्पर्धेत गाण्याइतकी या सर्वच स्पर्धकांची तयारी आहे,’ या शब्दात बीएमएम सारेगम २०१३च्या उपांत्य फेरीतल्या सर्व गायक-गायिकांचे कौतुक केले.
आता ५-७ जुलै २०१३ दरम्यान होणार्‍या १६ व्या बीएमएम अधिवेशनात या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा रंगणार आहे. प्रसिद्ध संगीतसंयोजक कमलेश भडकमकर यांचा वाद्यवृंद अंतिम फेरीतल्या गायकांना स्वरसाथ करेल, प्रशांत दामले आणि प्रिया बापट या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहेत. तर सुप्रसिध्द गायक पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर आणि राहुल देशपांडे अंतिम फेरीचे परीक्षक असतील. याशिवाय उमेश कामत, भार्गवी चिरमुले, उर्मिला कानेटकर, वैभव मांगले आणि अतिशा नाईक यावेळी रंगतदार कार्यक्रम सादर करणार आहेत. अंतिम फेरीतल्या विजेत्यांची बक्षिसे ‘पीएनजी ज्वेलर्स’ आणि ‘रागरंग’ यांनी प्रायोजित केली आहेत.
अंतिम विजेता-निवडीत, परीक्षकांकडून मिळणार्‍या गुणांसह, रसिक प्रेक्षकांनी केलेल्या मतदानाचाही सहभाग असेल. हे मतदान जुलै २०१३ पूर्वी ऑनलाईन तर प्रत्यक्ष अधिवेशनात एसएमएसद्वारा करता येणार आहे. याविषयी अधिक माहिती http://saregama.bmm2013.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे. बीएमएम २०१३ च्या https://www.facebook.com/bmm2013 या फेसबुक पेजद्वारेही , रसिकांना अंतिम फेरीतल्या सर्व स्पर्धकांचं दर्जेदार गाणं ऐकता येईल, अशी माहिती अधिवेशनाच्या सह-निमंत्रक अदिती टेलर यांनी दिली आहे. उत्तर अमेरिकेत पहिल्यांदाच होणार्‍या या संगीतस्पर्धेबरोबरच, बी.एम.एम. २०१३ मधे इतर अनेक मनोरंजक कार्यक्रम आणि उपयुक्त उपक्रम होणार आहेत. उत्तर अमेरिकेतल्या आणि जगभरातल्या मराठीप्रेमींनी आवर्जून या अधिवेशनाला उपस्थित रहावं असं आवाहन, अधिवेशनाचे निमंत्रक बाळ महाले यांनी केलं आहे.

Story img Loader