‘डर्टी पिक्चर’ दक्षिणेची वादळी अभिनेत्री सिल्क स्मिता (तिकडचा उच्चार स्मिथा) हिच्या आयुष्यावर आहे, असे दिग्दर्शक मिलन लुथरिया याने मुहूर्तापासूनच सुस्पष्ट केल्याने त्या चित्रपटाकडे ‘पाहण्याची’ दृष्टी तयार झाली.. ‘हिरॉईन’ असा एकाच अभिनेत्रीच्या जीवनावर आहे असे दिग्दर्शक मधुर भांडारकरने म्हटलेले नाही. त्यामुळे त्यात अनेक अभिनेत्रींच्या वाटेला येणाऱ्या बऱ्या-वाईट अनुभवांची सरमिसळ पाहायला मिळेल. ते चांगले की वाईट हे चित्रपट पाहिल्यावर ठरवता येईल.
अभिनेत्रीच्या आयुष्यावर चित्रपट हा प्रकार ‘रंगीला’, ‘मस्त’ इत्यादीत मसालेदार रूपात दिसला. श्याम बेनेगल यांचा ‘भूमिका’ हंसा वाडकरच्या जीवनावर होता. यापुढेही काही अभिनेत्रींच्या आयुष्यावर चित्रपट निर्माण होऊ शकतो. अर्थात तो माहितीपट होऊ न देता त्यात रंगत आणण्याची काळजी घ्यावी लागेल. कारण कोणताही चित्रपट तीन गोष्टींवर चालतो, मनोरंजन, मनोरंजन व फक्त मनोरंजन. नर्गिस दत्तच्या आयुष्यात खूप वळणे व नाटय़. दिग्दर्शक राज कपूरने तिच्यातील गुणवत्ता खुलवली, त्या सहवासात त्यांचे एकमेकांकडे आकर्षित होणे. त्यात तो विवाहित, तीन मुलांचा पिता. तर ‘मदर इंडिया’च्या चित्रीकरणाच्या वेळी सेटला लागलेल्या आगीतून धाडसाने वाचवल्याने सुनील दत्तचा तिने पती म्हणून स्वीकार केला. चित्रपटात ते माँ व पुत्र अशा भूमिकेत होते. काही वर्षांने वयात आलेल्या मुलाचा, संजय दत्तचा पहिला चित्रपट ‘रॉकी’ प्रदर्शित व्हायच्या पाच दिवसांपूर्वी नर्गिसचे कर्करोगाने निधन झाले. म्हणून गंगा थिएटरमधील ‘रॉकी’च्या प्रीमियरला सुनील व संजय या दत्त पिता-पुत्रांच्या मधली खुर्ची रिकामी ठेवली गेली.. मधुबालाचेही आयुष्य विलक्षण नाटय़मय. दिलीपकुमार व प्रेमनाथ हे जिवलग मित्र एकाच वेळी तिच्या प्रेमात पडले. ‘ती आपलीच व्हावी’ म्हणून दोघेही एकमेकांबाबत तिच्याकडे भलतं-सलतं बोलत. पण ती त्या दोघांचीही झाली नाही. दिलीपशी तिने अबोला धरला तरी ‘मुगल-ए-आझम’ पूर्ण झाला. ती किशोरकुमारची पत्नी झाली, पण तिचेही कर्करोगाने निधन झाले. परवीन बाबीच्या सहवासाचा फायदा घेणाऱ्यात अमिताभ, डॅनी, कबीर बेदी, महेश भट्ट अशी बरीच नावे आहेत. पण ती कोणाचीच झाली नाही. काही वर्षे ‘गायब’ होती. परतल्यावर जुहूच्या कालुमल इस्टेटमधील आपल्या निवासस्थानी तिने काही पत्रकारांना भेटीसाठी बोलावले असता तिची वैफल्यग्रस्तता पाहावत नव्हती. तिचा मृत्यू झाल्याचेही दोन दिवसांनी समजले. दिव्या भारती वेगाने चाहत्यांना ‘दिवाना’ करीत लोकप्रिय झाली. ‘बलवान’च्या सेटवर ती बिनदिक्कत सिगारेट ओढताना दिसे, तेव्हा ते तिला शोभत नाही असे वाटे. तिचा मृत्यू हत्या की आत्महत्या हे रहस्य आजही कायम आहे…
अभिनेत्री कथा केवढ्या तरी
‘डर्टी पिक्चर’ दक्षिणेची वादळी अभिनेत्री सिल्क स्मिता (तिकडचा उच्चार स्मिथा) हिच्या आयुष्यावर आहे, असे दिग्दर्शक मिलन लुथरिया याने मुहूर्तापासूनच सुस्पष्ट केल्याने त्या चित्रपटाकडे ‘पाहण्याची’ दृष्टी तयार झाली..
आणखी वाचा
First published on: 11-09-2012 at 12:58 IST
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood heroine cinema movie hindi movie hindi cinema dirty picture