देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू असून यंदा लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान देशभरात पार पडत आहे. राज्यातील पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातही आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच पुण्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. यंदा नागरिकांमध्ये मतदान करताना प्रचंड उत्साह दिसत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील अहिल्यादेवी शाळेतील मतदार केंद्रावर दोन भावांनी आईचा दशक्रिया विधी करण्यापुर्वी मतदानाचा हक्क बजावला.

सरपोतदार बंधूंनी आईच्या दशक्रिया विधीआधी मतदानाला प्राधान्य दिले. या बाबत विवेक सरपोतदार म्हणाले की, माझ्या आईचे १४ तारखेला निधन झाले. आज आमच्या आईचा दशक्रिया विधी आहे. आज पुण्यामध्ये मतदानही आहे. त्यामुळेच आम्ही प्रथम मतदान करण्याचा निर्णय घेतला. मतदान करुन झाल्यानंतर आम्ही दशक्रिया विधी करणार आहोत. प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजवला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

दरम्यान तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे. मतदान होत असलेल्या मतदारसंघांपैकी सध्या १० जागा युतीकडे तर चार जागा राष्ट्रवादीकडे असल्याने युतीचा वरचष्मा कायम राहणार की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी बाजी मारणार याची उत्सुकता आहे. या टप्प्यात नेत्यांच्या मुलांचे मतदारसंघ असल्याने या नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सुप्रिया सुळे, सुजय विखे-पाटील, नीलेश राणे, रक्षा खडसे, विशाल पाटील या नेतेमंडळींच्या मुलासुनांचे भवितव्य आजच ठरणार आहे.

राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये आतापर्यंत मतदान पार पडले आहे. आजच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. गत निवडणुकीत या मतदारसंघांमध्ये भाजपचे सहा, शिवसेना तीन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक असे युतीचे १० खासदार निवडून आले होते. राष्ट्रवादीला तेव्हा चार जागा मिळाल्या होत्या. गतवेळप्रमाणेच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात चांगले यश मिळविण्याचा युतीचा प्रयत्न आहे.

 

Story img Loader