देशांतर्गत नकारात्मकतेचा अव्हेर करीत विदेशातील सकारात्मक घडामोडींवर प्रतिक्रिया देण्याचे धोरण गुरुवारी भांडवली बाजाराने अनुसरले. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हचा रोखे खरेदीचा स्थिर निर्णय व चीनमधील समाधानकारक निर्मिती क्षेत्राची वाटचाल याच्या जोरावर सेन्सेक्ससह निफ्टीतील गेल्या पाच दिवसांतील घसरणीला विराम मिळाला, इतकेच नव्हे तर या निर्देशांकांनी सुमारे दोन टक्क्यांची उसळीही घेतली.
दिवसभरात डॉलरच्या तुलनेत ६५च्याही खाली गेलेल्या रुपयाकडे दुर्लक्ष करत ४०७.०३ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक पुन्हा १८ हजारापल्याड १८,३१२.९४ पर्यंत पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत शतकी, १०५.९० अंश वाढ होत तो ५४०८.४५ वर गेला.
रोखे खरेदीचा कार्यक्रम गुंडाळण्याबाबत अमेरिकेच्या फेडरलने कोणतेही वक्तव्य केले नाही. तसेच शेजारच्या चीनमधील निर्मिती क्षेत्राची वाढही समाधानकारक राहिल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स दिवसभरात १८,३४९.८२ पर्यंत झेपावला. या आधी बुधवारी सलग पाचव्या सत्रात तब्बल १५०० अंशाच्या घसरणीने सेन्सेक्स १८ हजाराखाली रोडावला होता.  परिणामी बुधवारी सेन्सेक्स ११ महिन्यांच्या नीचांकाला येऊन ठेपला होता. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी यावेळी ७९२.११ कोटी रुपयांची विक्री केली होती.
गुरुवारच्या ४०० अंशांची उसळी ही सेन्सेक्सची गेल्या दोन महिन्यांतील सर्वात मोठी उडी ठरली आहे. (यापूर्वी एकाच सत्रातील सर्वाधिक ५१९.८६ अंश वाढ २८ जून रोजी नोंदली गेली होती.) यामुळे गुंतवणूकदारांची मालमत्तादेखील १.१७ लाख कोटी रुपयांनी वाढली.
बाजाराला गुरुवारी पोलाद निर्देशांकाने ८.२३ टक्क्यांसह भरीव साथ दिली. त्याला या धातूचे सर्वात मोठा ग्राहक देश असलेल्या चीनच्या ऑगस्टमधील निर्मिती वाढल्याचे निमित्त मिळाले. पोलाद निर्देशांकातील हिंदाल्कोचे समभाग मूल्य ११ टक्क्यांनी उंचावले. त्याचबरोबर स्टरलाइट, टाटा स्टील या समभागांना चांगली मागणी राहिली. सेन्सेक्समधील २८ समभाग वधारले. केवळ एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांनाच आजच्या व्यवहारात नुकसान सोसावे लागले.

अमेरिकी फेडचे ‘जैसे थे’
भांडवली बाजारासह चलन व्यासपीठावरही अस्थिरतेचे कारण बनलेल्या अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या ताजा पवित्र्याबाबत अखेर भांडवली बाजाराला तरी स्वस्थता गुरुवारी मिळवून दिली.  फेडचे प्रमुख बेन बर्नान्के यांनी भारतीय वेळेनुसार बुधवारी मध्यरात्री येत्या महिन्यापासून रोखे खरेदी थांबविण्याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य केले नाही. परिणामी अमेरिकेतील भांडवली बाजारात किरकोळ घसरण नोंदली गेली. अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत दर महिन्याला ८५ अब्ज डॉलरच्या रोख्यांची खरेदी होत आहे. जागतिक महासत्तेची अर्थस्थिती सुधारत असल्याने या रोखे खरेदीला सप्टेंबरपासून विराम देण्याच्या साशंकता व्यक्त केल्या गेल्या होत्या. यामुळे भारतासह अन्य उदयोन्मुख देशांच्या वित्त व्यवस्थेतील विदेशी गुंतवणूकदारांमार्फत निधी काढून घेण्याचा क्रम सुरू झाला, ज्या परिणामी या देशांच्या भांडवली बाजारांसह स्थानिक चलनही रोडावत चालले आहेत.

Story img Loader