केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामाच्या वेगासाठी आणि वेगवेगळ्या कल्पनांसाठी प्रसिद्ध आहेत. प्रशासनाकडून काम करून घेण्यामध्ये नितीन गडकरींचा हातखंडा मानला जातो. पण ही अशी कामं प्रशासनाकडून गडकरी कशी करून घेतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचंच उत्तर गडकरींनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना दिलं आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन आज नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी गडकरींनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. प्रशासनाकडून मोठमोठी कामं वेगाने कशी करून घ्यायची, याविषयी गडकरींनी यावेळी बोलताना टिप्पणी केली!
नदी विकास प्रकल्पाचं काम..
पुण्यातील नदी विकास प्रकल्पाच्या कामाबद्दल एक आठवण यावेळी गडकरींनी सांगितली. “पुण्यातील नदी विकास प्रकल्प जवळपास १४०० कोटींचा आहे. त्या प्रकल्पावर दिल्लीत चर्चा झाली. पण तो अडकून पडला होता. तेव्हा शेतकरी जसा बैलांच्या मागे तुतारी घेऊन लागतात, तसं सरकारमध्ये प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन राहिलं, तर त्याचंच काम होतं, बाकीच्यांचं होत नाही. त्या वेळी मी सचिवांना या कामाची तातडीनं कंत्राटं काढण्याचे निर्देश दिले. आता जायकाचे १४०० कोटींचे टेंडर निघाले आहेत आणि काम देखील सुरू झालं आहे”, असं गडकरी यावेळी म्हणाले.
…तेव्हा पुण्यातल्या लोकांनी माझ्यावर बरीच टीका केली
दरम्यान, यावेळी पुणेकरांनी आपल्यावर आणि देवेंद्र फडणवीसांवर बरीच टीका केल्याची एक आठवण नितीन गडकरींनी सांगितली. “पुणे मेट्रोचं काम सुरू झालं नाही आणि नागपूरचं काम बरंच पुढे गेलं, तेव्हा पुण्यातल्या लोकांनी माझ्यावर आणि देवेंद्रवर बरीच टीका केली. त्यावेळी मी पुण्यात आलो होतो. शरद पवारांसोबत मीटिंग झाली. पुण्यात मेट्रो अंडरग्राऊंड किंवा वरून करायची यावर चर्चा झाली. तेव्हा मी म्हटलं जेवढा खर्च जास्त करू तेवढे तिकिटाचे दर वाढतील. त्यामुळे मेट्रो वरूनच करण्याचा निर्णय झाला”, असं ते म्हणाले.
“मी मंत्री होतो तेव्हाही माझा जवळचा संबंध होता. राज्याचा अॅम्बॅसिडर म्हणून मी दिल्लीत आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसारख्या सर्वच विभागांच्या कामात जी मदत करता येईल, ती करण्याचा प्रयत्न करत असतो”, असंही गडकरींनी यावेळी सांगितलं.