रोज मांसाहार, बर्गर सँडविज चीजकेक यांसारखे फास्टफूड, धूम्रपान व मद्यपानाचा अतिरेक व त्या जोडीला शरीराला कष्ट होणार नाही असा बठा व्यवसाय असणाऱ्या जर्मनीतील जॉनला १९९८मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी पाठीवर गाठ जाणवू लागली. गाठीची बायॉप्सी केली असता मॅलिग्नण्ट मेलॅनोमा म्हणजे त्वचेचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. १ वर्षांने अशाच प्रकारची गाठ डाव्या काखेत आल्याने व त्याच्या बायॉप्सीत मेटॅस्टेटिक कॅन्सर असे निदान झाल्याने डॉक्टरांनी केमोथेरपी घेण्याचा सल्ला दिला. मात्र इतक्या लहान वयात केमोथेरपीने शरीराची प्रतिकारशक्ती दुर्बल करण्याची इच्छा नसल्याने जॉनने व आयुर्वेदाचा अभ्यास केलेल्या त्याच्या सुविद्य पत्नीने- ज्यूलीने आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा घेण्याचा व पूर्वीची चुकीची जीवनशैली व आहारपद्धती आमूलाग्र बदलण्याचा निर्णय घेतला. आमच्या रुग्णालयात वमन-विरेचन-बस्ति हे शरीरशुद्धी करणारे पंचकर्म उपचार, शमन व रसायन औषधे, सात्त्विक आहार-विहार व सदाचार यांच्या बळावर जॉन व ज्यूली गेली १६ वर्षे निरामय कौटुंबिक व सामाजिक जीवन जगत आहेत.
त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण गौर व कृष्णवर्णीयांपेक्षा श्वेतवर्णीयांमध्ये अधिक आढळत असल्याने आपल्या देशात या कॅन्सरचे रुग्ण तुलनेने कमी आहेत. त्वचा हा आपल्या संपूर्ण शरीरास आवृत्त करणारा शरीर घटक असून सौंदर्य व शरीररक्षण या दोनही दृष्टीने शरीरातील त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शरीरातील अवयवांचे आघात, जिवाणू, ऊन-पाऊस-थंडी यापासून रक्षण करणे; शरीराचा ठरावीक उष्मा राखणे; शरीरातील जलीय अंशाचे नियंत्रण करणे; प्रखर सूर्यकिरणांमधील अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून शरीराचे रक्षण करणे व सूर्यकिरणांमधील व्हिटॅमिन डीचे शरीरात शोषण करणे अशी महत्त्वपूर्ण कामे त्वचेमार्फत केली जातात. आधुनिक वैद्यकशास्त्राने त्वचेचे एपिडर्मिस, डर्मिस व सबक्युटिस असे ३ प्रमुख स्तर सांगितले असून त्यापकी एपिडर्मिस या सर्वात बाहेरच्या स्तरात स्क्व्ॉमस पेशी, बेसल पेशी व रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या मेलॅनोसाइटस् या प्रकारच्या पेशी असतात. या तीन प्रकारच्या पेशींच्या विकृत अनियंत्रित वाढीमुळे तीन प्रकारचे त्वचेचे कॅन्सर निर्माण होतात. डर्मिस या स्तरात स्वेदग्रंथी, रक्तवाहिन्या, लोमकूप व वातवाही नाडय़ा असून सबक्युटिस या स्तरात प्रामुख्याने मेदाच्या पेशींचे जाळे असते. कॅन्सर बळावल्यास कॅन्सरग्रस्त पेशी एपिडर्मिस हा स्तर ओलांडून डर्मिस व सबक्युटिस या स्तरात अनुक्रमे पसरतो.
आयुर्वेदाने त्वचा हे स्पर्शाचे ज्ञान ग्रहण करणारे व संपूर्ण शरीरास व्यापून असलेले ज्ञानेंद्रिय सांगितले आहे. तसेच ते वातदोष, त्वचेस वर्ण-कांती देणारे भ्राजक पित्त, त्वचेची व अंतर्गत अवयवांची आद्र्रता नियंत्रित करणारा रसधातू यांचे प्रमुख स्थान आहे. गर्भावस्थेत स्त्रीबीज व पुरुषबीज यांपासून फलित बीजाण्ड तयार होत असतानाच ज्याप्रमाणे दुधावर साय जमावी त्याप्रमाणे शरीरावर त्वचेची निर्मिती होते असे सुश्रुताचार्यानी त्वचेचे समर्पक वर्णन केले आहे. आजच्या वैज्ञानिक युगासारखी सूक्ष्मदर्शक यंत्रे उपलब्ध नसतानाही सुश्रुताचार्यानी त्वचेचे अधिक सूक्ष्मतेने अनुक्रमे अवभासिनी, लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी व मांसधरा असे बाहेरून आत सात स्तर सांगितले आहेत. व या सात स्तरांपकी रोहिणी या स्तरांत ग्रंथी अर्बुदांची निर्मिती होते असाही स्पष्ट उल्लेख केला आहे.
आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार अधिक काळ विशेषत: बाल्यावस्थेत सूर्यकिरणांच्या संपर्कात राहणे, श्वेतवर्णीय असल्याने त्वचेत मेलॅनोसाइटस् या रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींचे प्रमाण स्वभावत:च कमी असणे, शरीरावर तीळ, वांग यांची संख्या अधिक असणे, प्रतिकारशक्ती कमी असणे व कुटुंबात त्वचेच्या कॅन्सरचा इतिहास असणे ही या कॅन्सरची संभाव्य कारणे आहेत. त्वचेवर निर्माण होणारे सर्वच प्रकारचे तीळ, वांग कॅन्सरचे नसले तरी सर्वसामान्यत: नवीन निर्माण होणारे; आकार-स्वरूप व रंग यांत सतत बदल राहणारे; लाल-काळपण-निळ्या रंगाचे, खपल्या धरणारे स्राव किंवा रक्त स्रवणारे, खाज-वेदना असलेले, कडांपासून बाजूला पसरणारे आकाराने मोठे असे मस; लवकर भरून न येणारे त्वचेवरील व्रण ही त्वचेच्या कॅन्सरची लक्षणे आहेत. सामान्यत: वैद्यकीय प्रत्यक्ष परीक्षण, त्वचेची बायॉफ्सी, लसिका ग्रंथीची बायॉफ्सी यांच्या साहाय्याने त्वचेच्या कॅन्सरचे निदान निश्चित होते. त्वचेचा कॅन्सर लसिकाग्रंथी, यकृत-फुफ्फुस यासारख्या अवयवांत पसरला असल्याची संभावना असल्यास एल्.डी.एच्. ही रक्ततपासणी, सी.टी.स्कॅन, एम्.आर.आय, पेट स्कॅन यांच्या साहाय्याने मेटास्टेसिसचे निदान निश्चित होते.
ल्ल शस्त्रकर्माने त्वचेचा किंवा लसिकाग्रंथीचा कॅन्सरग्रस्त भाग काढून टाकणे, केमोथेरपी, रेडिओथेरपी, इम्युनोथेरपी या त्वचेच्या कॅन्सरसाठी उपलब्ध चिकित्सापद्धती आहेत. त्वचेच्या कॅन्सरच्या बहुतांशी रुग्णांत कॅन्सर त्वचेपुरताच मर्यादित राहत असल्याने रुग्णांचे शारीरिक बल चांगले असते. त्यामुळे रसधातुगत दोषांचे शोधन करण्यासाठी वमन, भ्राजक पित्ताची दुष्टी नष्ट करण्यासाठी विरेचन व रक्तमोक्षण आणि त्वचेच्या आश्रयाने राहणाऱ्या दूषित वातदोषाचे शोधन करण्यासाठी बस्ति अशी पंचकर्म चिकित्सा रुग्णबलाचा विचार करून वारंवार करणे योग्य ठरते. यासह मंजिष्ठा, सारिवा (अनंतमूळ), ज्येष्ठमध, कुमारी (कोरफड), आमलकी, शतावरी, गुडूची, त्रिफळा, चंदन, वाळा, दूर्वा, गंधक रसायन, पंचतिक्त घृत यासारखी रस रक्त प्रसादक, पित्त वातशामक, रसायन व कोष्ठशुद्धी करणारी औषधे उपयुक्त ठरतात.
रसधातुला व पर्यायाने त्वचेला बल, कांती देणारा गाईचे दूध, तूप, लोणी, केशर, साठेसाळीचा भात, मसूर डाळीचे किंवा अख्ख्या मसुराचे कढण, पडवळ दोडका-मेथी-कारले अशा कडवट चवीच्या भाज्या, धणे-कोथिंबीर-सुंठ, तिळाची चटणी, शेवया, रव्याचे पदार्थ, कोहोळा-दुधीच्या वडय़ा किंवा हलवा, चंदन-वाळ्याने सिद्ध केलेले पाणी असा आहार असावा. त्वचा हा आपल्या शारीरिक व मानसिक स्थितीचा वारसा असल्याने संपूर्ण शरीरास आठवडय़ातून एकदा तरी तीळतेलाने अभ्यंग करणे, औषधी द्रव्यांचे उटणे लावणे व त्यानंतर कोमट पाण्याने स्नान करणे, रोमकूपे मोकळी होऊन स्वेदप्रवर्तन व्हावे यासाठी सकाळी मोकळ्या हवेत फिरण्याचा व्यायाम नियमित करणे तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी प्राणायाम करणे त्वचेच्या स्वास्थ्याठी हितकर ठरते. या सर्व आधिभौतिक कारणे व उपायांशिवाय आयुर्वेदाने पूर्वजन्म व या जन्मातील पापकम्रे, गुरू वडीलधाऱ्या व्यक्तींचा अवमान करणे अशी आध्यात्मिक कारणेही त्वचारोगांच्या निर्मितीस हेतुभूत सांगितली आहेत. त्यामुळे धर्मसम्मत सदाचरण हाही त्वचाविकारांच्या चिकित्सेतील एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा