पिंपरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत गोंधळ घालणार असल्याच्या संशयावरुन मराठा क्रांती मोर्चाच्या २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिंपरी- चिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमानाने चिंचवड गावात क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे. या संग्रहालयाच्या इमारतीचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यात काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यात मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात विठ्ठल पूजा करु दिली जाणार नाही, असा इशाराही काही संघटनांनी दिला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या चिंचवड दौऱ्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मराठा मोर्चाचे कार्यकर्ते गोंधळ घालण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून २० ते २५ जणांना ताब्यात घेतले आहे.