arth06काही कंपन्यांचे शेअर हे आपल्याला कायम महाग वाटत राहतात; मात्र ते कायम वाढतच राहिल्याने नंतर आपण ते आधीच का नाही घेतले, अशी चुटपुट लागून राहते. एमआरएफ, आयशर मोटर्स, बॉश, टाईड वॉटर ऑइल, जिलेट अशा काही कंपन्यांच्या मांदियाळीत ३एम इंडिया या कंपनीच्या शेअरचादेखील समावेश व्हायला हवा. एखाद्या कंपनीच्या शेअरचा बाजार भाव जास्त असला याचा अर्थ तो शेअर महाग आहे असे नव्हे तसेच बाजारभाव कमी असलेले सगळेच शेअर स्वस्त असतात असेही नव्हे. या साठीच शेअरचे बाजार भाव आणि मूल्य यातला फरक कळायला हवा.

खरे तर या कंपनीचे नाव गुंतवणूकदारांना माहितीचे असले तरीही सामान्य जनतेला कदाचित माहिती नसेल मात्र या कंपनीची उत्पादने पाहिल्यावर तुम्हाला ही कंपनी नक्की कळेल. आपण प्रत्येक जण ३एम  कंपनीचे एक तरी उत्पादन वापरत असू. मग ते स्कॉच ब्राइट असेल, ग्लू स्टिक असेल किंवा सेलो टेप असेल, पोस्ट— इट नोट पॅड असेल किंवा कदाचित तुमच्या डेंटिस्टनेदेखील तुम्हाला त्याचे एखादे उत्पादन उपचारा दरम्यान दिले असेल.

३एम या अमेरिकन कंपनीची उप-कंपनी असलेल्या ३एम इंडियाची विविध प्रकारची सुमारे ४,००० उत्पादने आहेत. या सर्व उत्पादनांचे वर्गीकरण करायचे झाल्यास त्यांचे औद्योगिक, आरोग्यनिगा, ऊर्जा, ग्राहकोपयोगी आणि सुरक्षा (सेफ्टी) असे करता येईल.

कंपनीची असंख्य उत्पादने रोजच्या व्यवहारातील असल्याने तसेच विविध क्षेत्रात वापरात असल्याने नोटाबंदीचा विशेष परिणाम कंपंनीच्या कामकाजावर होणार नाही. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ३एम इंडियाची कामगिरी कायमच सरस राहिली आहे.

गेल्या तीन वर्षांंचा इतिहास पाहता कंपनीने नफ्यात सरासरी ५६.४६% वाढ साध्य करून दाखवली आहे. कर्जाचा भार नसलेली आणि केवळ १३.०८ % शेअर्स सामान्य जाणतेकडे असणारी ही कंपनी तुमच्या पोर्टफोलियोची गुणवत्ता वाढवेल हे नक्की.

समग्र पी/ई गुणोत्तर काय?

या स्तंभात वाचकांच्या माहितीसाठी शेअर निवडण्याचे महत्त्वाचे निकष दिले जातात. हे निकष अभ्यासून वाचक गुंतवणूकदार गुंतवणुकीचा निर्णय घेतात. आवश्यक ते बहुतांशी महत्त्वाचे निकष आणि गुणोत्तरे दिलेली असली तरीही यंदा अजून एक निकष ‘उद्योग क्षेत्राचा समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर’ (Composite P/E Ratio) समाविष्ट करीत आहे. समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर म्हणजे एकाच क्षेत्रातील सर्व कंपन्यांच्या किंमत उत्पन्न गुणोत्तराची सरासरी. या सरासरीच्या तुलनेत निवडलेल्या कंपनीचे किंमत उत्पन्न गुणोत्तर किती आहे ते तपासून निवडलेला शेअर त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत महाग आहे की स्वस्त ते यामुळे पडताळता येते.

सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader