देशाच्या दक्षिणेतील एका राज्याच्या राज्यपालांवर गैरवर्तनाचा आरोप असून एका महिलेने यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. गृहमंत्रालयानेही या तक्रारीची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, राज्यपालांचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.

दक्षिणेतील एका राज्यापालांविरोधात गृहमंत्रालयात तक्रार दाखल झाली आहे. पीडित महिला ही राजभवनात कार्यरत असून राज्यपालांनी गैरवर्तन केल्याचा तिचा आरोप आहे. राज्यपालांनी माझ्याकडे लैंगिक सुखाची मागणी केली, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

केंद्रीय गृहखात्याने या तक्रारीची दखल घेत चौकशीला सुरुवात केली आहे. राज्यपालाची ओळख उघड करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी अधिकृत प्रतिक्रिया देण्यासही नकार दिला आहे. केंद्र सरकारने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी तपास यंत्रणांना या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तक्रारीत तथ्य आढळले तर राज्यपालांना तात्काळ राजीनामा द्यावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. पण या तक्रारीमागे राजकीय हेतू देखील असू शकतो, अशी शक्यताही काही जण वर्तवत आहे. त्यामुळेच गृहखात्याने तक्रारीबाबतचा तपशील अद्याप उघड केलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी मेघालयचे तत्कालीन राज्यपाल व्ही. षणमुगनाथन यांना जानेवारी २०१७ मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप होता. राजभवनातील १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी षणमुगनाथन यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपतींना पाठवले होते. षणमुगनाथन यांनी राजभवनास यंग लेडिज क्लब बनवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.