पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर काँग्रेसकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत. आजही काँग्रेसने मोदींवर टीका करताना त्यांना आपल्या आश्वासनांची आठवण करुन देत संसदेबाहेर चक्क १५ लाख रुपयांच्या नकली चेकचे वाटप केले. या प्रकारामुळे त्याक्षणी बरीच चर्चा रंगली होती.

१५ लाख रुपयांचे नकली चेक वाटताना काँग्रेसचे खासदार म्हणाले, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारु पाहतोय की, आता अर्थसंकल्पही सादर झाला मात्र, त्यांची फेकू बँक कुठे आहे. लोकांना अद्याप १५ लाख रुपये मिळालेले नाहीत. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी जनतेला सर्वांच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याचीच आठवण त्यांना करुन देण्यात येत आहे.

काँग्रेसच्या खासदारांनी १५ लाख रुपयांची नकली चेक संसद भवन परिसरात दाखवले. तसेच यावेळी त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत म्हटले की भाजपाने खोटं बोलून देशाला लुटले आहे. त्यामुळे आम्ही फेकू बँकेचा चेक घेऊन लोकांना त्याची आठवण करुन देत आहोत. हे नकली चेक खऱ्या चेक प्रमाणेच हुबेहुब बनवण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यावर पतंप्रधान मोदींची स्वाक्षरीही मुद्रीत करण्यात आली आहे. तसेच त्यावर फेकू बँक असे लिहिण्यात आले आहे.

काँग्रेस खासदारांनी शेजारून जाणाऱ्या भाजपाच्या खासदारांनाही हे चेक देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे चेक न घेताच भाजपा खासदार तिथून निघून गेले. दरम्यान, काँग्रेसच्या खासदारांनी संयुक्त संसदीय समितीचीही मागणी केली. सरकारच्यावतीने सर्व खोटे आरोप करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Story img Loader