|| सुधीर जोशी
करोनाचे वाढते संकट हाताबाहेर जाऊन परत संपूर्ण टाळेबंदीच्या भीतीचा परिणाम बाजारावर गेल्या सप्ताहात पाहायला मिळाला. सप्ताहाची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. नंतर रिझर्व्ह बँकेच्या उद्योगस्नेही धोरणाने बाजारात परत आशावादी वातावरण तयार झाले. परंतु ते अल्प काळच टिकले. बाजाराचे प्रमुख निर्देशांक जरी नुकसानीत बंद झाले तरी धातू, माहिती तंत्रज्ञान, औषधे आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील समभागांनी दमदार कामगिरी केली व या क्षेत्रांचे निर्देशांक पाच टक्क्यांहून जास्त वाढले.
टाटा स्टीलच्या समभागांनी गेल्या चौदा वर्षांतील उच्चांक साधला. त्याचबरोबर जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल व सरकारी मालकीच्या सेल कंपनीचे समभागही तेजीत होते. ‘सायक्लिकल’ समजले जाणारे हे समभाग पाच ते सात वर्षांत एकदा मोठी झेप घेतात. सध्याच्या खनिज व पोलादाच्या वाढत्या किमती व मागणीचा फायदा कंपन्यांना होत आहे. टाटा स्टील व सेलच्या स्वत:च्या खाणी असल्यामुळे त्यांना सर्वात मोठा लाभ होईल. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे सध्या जरा जोखमीचे पण अल्प काळात नफा मिळवून देणारे आहे.
रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक आढाव्यात व्याज दरात कुठलाही बदल न करता विकासाला चालना देणारे लवचीक धोरण कायम ठेवले. बाजाराने त्याचे स्वागत केले. व्याज दरांबाबत संवेदनशील असणाऱ्या वित्तीय व गृह कर्ज देणाऱ्या संस्था, वाहने, ग्राहकोपयोगी वस्तू अशा क्षेत्रातील कंपन्यांना त्याचा फायदा होईल. बजाज फायनान्स व एचडीएफसी लिमिटेड या दोन बड्या कंपन्यांचा पोर्टफोलिओत समावेश करता येईल. बजाज फायनान्सचे एकूण दीड कोटी ग्राहक आहेत तर सव्वा लाख दुकानांमधे कंपनीची कर्ज वितरण सुविधा आहे. कमी पातळीवरील व्याज दर व सरकारतर्फे घरबांधणी योजनांना मिळणारे प्रोत्साहन यामुळे एचडीएफसी लिमिटेड या सर्वात मोठ्या गृह कर्ज कंपनीकडे कर्जाची वाढती मागणी आहे.
अदानी पोर्ट्स या मागील वर्षभर चर्चेत असलेल्या कंपनीने गंगावरम पोर्टवर संपूर्ण ताबा मिळविण्याचा करार केला आहे. याआधी गेल्या वर्षी कृष्णापट्टम व दिघी बंदरे कंपनीने ताब्यात घेतली होती. श्रीलंकेतील बंदर विकास करण्याचेही कंपनीला कंत्राट मिळाले आहे. पोर्ट चालविणाऱ्या कंपन्यांनी इतर लॉजिस्टिक कंपन्यांशी करार करून ग्राहकाला सर्वंकष सेवा देण्याच्या कल सध्या जगात सर्वत्र दिसतो. अदानी पोर्टदेखील याला अपवाद नाही. सरकारी मालकीच्या कंटेनर कॉर्पोरेशन (कॉनकॉर) कंपनीवर ताबा मिळविण्याचा कंपनीचा मनसुबा आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या समभागात शंभर टक्के वाढ झाली असली तरी घसरणीची संधी साधून कंपनीच्या समभागात गुंतवणूक करण्यास वाव आहे.
करोना संकट गडद होण्याची भीती व मार्च अखेरच्या आर्थिक वर्षाच्या निकालांचे या सप्ताहात सुरू होणारे पर्व या दोन विरोधी शक्तींच्या कचाट्यात बाजार सापडला आहे. डिसेंबरनंतर सुधारलेले औद्योगिक उत्पादनांचे आकडे, घरांची व वाहनांची वाढती मागणी व त्यामुळे पोलाद, सीमेंटसारख्या कच्च्या मालाची वाढलेली मागणी, माहिती तंत्रज्ञान व रासायनिक उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांकडून वाढलेल्या अपेक्षा तसेच सरकार व रिझर्व्ह बँकेची उद्योगांना गतिमान ठेवण्याची धोरणे यामुळे बाजारात असलेल्या तेजीवर बँकांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण वाढण्याच्या भीतीचे सावट आहे. तसेच करोनाच्या दुसऱ्या लाटेवर काबू मिळविण्यात यश येताना दिसत नाही. त्यामुळे बाजाराची स्थिती ही दोलायमानच राहील. कंपन्यांच्या वार्षिक निकालांनंतर बाजारातील सहभाग कायम ठेवून थोडी नफावसुली मात्र करावयास हवी.
sudhirjoshi23@gmail.com