अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या कमाईवर कर लावण्याची घोषणा केली. त्यामुळे आता क्रिप्टोकरन्सी किंवा कोणत्याही आभासी मालमत्तेच्या हस्तांतरणावरील उत्पन्नावर ३० टक्के कर आकारला जाणार आहे. त्याचबरोबर एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांवर टीडीएसही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता क्रिप्टो करन्सीच्या व्यवहाराबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी सोमवारी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याबाबात प्रतिक्रिया देत हे पाँझी स्कीमपेक्षा वाईट आहे असे म्हटले आहे. यामुळे देशाच्या आर्थिक सार्वभौमत्वाला धोका असल्याचेही ते म्हणाले. क्रिप्टो-तंत्रज्ञान हे सरकारी नियंत्रण टाळण्याच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे, ते विशेषतः विनियमित आर्थिक व्यवस्थेला नजरअंदाज करण्यासाठी विकसित केले गेले आहे, असे रविशंकर म्हणाले.
पॉन्झी स्कीमशी क्रिप्टोकरन्सीची तुलना करताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर टी रवीशंकर म्हणाले की, “क्रिप्टो मालमत्तेवर बंदी घालणे भारतासाठी सर्वात योग्य आहे. क्रिप्टोचे कोणतेही आंतरिक मूल्य नाही आणि खरे तर ते जुगाराच्या करारासारखे कार्य करते.” रवीशंकर यांनी सोमवारी एका कार्यक्रमात याबाबत भाष्य केले. क्रिप्टो हे चलन, मालमत्ता किंवा कमोडिटी नाही असे म्हणत त्यांनी क्रिप्टोच्या समर्थकांनी तयार केलेल्या विविध व्याख्यांवर भाष्य केले.
“बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीने आतापर्यंत मोठा परतावा दिला आहे. पण १७व्या शतकातील नेदरलँड्समध्ये ट्यूलिपनेही असेच केले आहे. क्रिप्टोकरन्सी हे पॉन्झी स्कीमप्रमाणे काम करणाऱ्या सट्टा किंवा जुगाराच्या करारासारखे असते. तसेच असा युक्तिवाद केला गेला आहे की १९२० मध्ये चार्ल्स पॉन्झी यांनी तयार केलेली मूळ योजना सामाजिक दृष्टीकोनातून क्रिप्टोकरन्सीपेक्षा चांगली आहे. अगदी पॉन्झी स्कीमही उत्पन्न मिळवणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करते,” असे रवीशंकर म्हणाले.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी क्रिप्टो गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा इशारा दिल्यानंतर डेप्युटी गव्हर्नर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे हे ट्यूलिपमॅनियापेक्षाही वाईट आहे, कारण त्याचे मूळ मूल्यही नाही. १७व्या शतकातील टुलिपमॅनिया हा त्यापैकी एक सर्वात कुप्रसिद्ध बुडबुडा होता. त्यावेळी ट्यूलिप बल्बच्या किमती कुशल कामगारांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त वाढल्या होत्या.
“क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे शून्य शाश्वत गुंतवणूक करण्यासारखे आहे आणि अशा योजनेतील गुंतवणूकदाराला व्याज किंवा मूळ रक्कम मिळणार नाही. समान रोख प्रवाह असलेल्या बाँडचे मूल्य शून्य असेल, जे खरेतर, क्रिप्टोकरन्सीचे मूलभूत मूल्य म्हणून तर्क केले जाऊ शकते,” असे डेप्युटी गव्हर्नर रबी शंकर म्हणाले.
पाँझी स्कीम काय आहे?
पाँझी स्कीम हा एक फसवा गुंतवणूक घोटाळा आहे, जो गुंतवणूकदारांना कमी जोखमीसह उच्च दराने परतावा देण्याचे आश्वासन देते. पाँझी स्कीम हा एक फसवा गुंतवणूक घोटाळा आहे जो दुसऱ्या गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन पूर्वीच्या गुंतवणूकदारांना परतावा मिळवून देते. यामध्ये मागील गुंतवणूकदारांची परतफेड करण्यासाठी नवीन गुंतवणूकदारांच्या निधीच्या वापर केला जातो. नवीन गुंतवणूकदारांचा ओघ संपल्यावर पाँझी स्कीम हळूहळू नष्ट होते आणि त्यांच्याकडे द्यायला पैसे नसतात. त्यावेळी अशा स्कीम उघड होतात.