सध्या आपण मंगळाची आणि आणि मंगळ मोहिमांची चर्चा करत असताना एक अशी बातमी आली आहे जी येत्या दोन वर्षांत महत्वाची आणि चर्चेचा विषय ठरण्याची खूप शक्यता आहे.
गेल्या ३ जानेवारी रोजी रॉब मॅकनॉट हे ऑस्ट्रेलियातील सायडींग िस्प्रग या वेध शाळेतून निरीक्षणे घेत असताना त्यांना एका नव्या धूमकेतूचा शोध लागला. या धूमकेतूला क्रमांक देण्यात आला २०१३ अ १, याचा अर्थ २०१३ मधील जानेवारीच्या पहिल्या पंधरवडय़ातील (म्हणजे अ) पहिला धूमकेतू या अर्थाने धूमकेतूला नाव देण्यात आले. Siding Spring – या धूमकेतूला Comet २०१३ अ १ म्हणून ओळखण्यात येतं.
पहिल्या निरिक्षणातून हा धूमकेतू ऑक्टोबर २०१४ मध्ये मंगळाच्या खूप निकट म्हणजे फक्त ५० हजार कि.मी अंतरावरून जाईल हे लक्षात आल होतं. पण जेव्हा या धूमकेतूची आणखी निरिक्षणे मिळू लागली तेव्हा हा धूमकेतू आधी वाटला होता तितका मंगळाच्या जवळून जाणार नाही असे दिसून आले, तरीही तो मंगळाच्या किती जवळून जाईल याची नक्की कल्पना आपल्या आणखी निरीक्षणांनंतरच मिळेल.
सध्याची निरीक्षणे आपल्याला सांगतात की भारतीय वेळे प्रमाणे १९ ऑक्टोबर २०१४ च्या मध्य रात्री नंतर १५ मिनिटांनी म्हणजेच २० ऑक्टोबर २०१४ रोजी रात्री सव्वाबारा वाजता धूमकेतू आणि मंगळ यांच्यातील अंतर कमीत कमी १ लाख १७ हजार कि.मी. असेल. ज्यावेळी धूमकेतू आणि मंगळ याच्यातील अंतर किमान असेल तेव्हा हा मंगळ आणि सूर्य या दोघांच्यामधे असेल. त्यावेळी हा धूमकेतू मंगळावर दिवसाच्या आकाशात दिसेल. मंगळावर विरळ वातावरण असल्याने मंगळाच्या भर दिवसा सुद्धा तो दिसण्याची शक्यता आहे. याची शेपूट बऱ्यापकी मोठी दिसण्याची शक्यता असल्याने या धूमकेतूचा गाभा किंवा शीर्ष मंगळावरून दिसले नाही तरी मंगळाच्या क्षितिजावर तिन्हीसांजच्या आकाशात मोठी शेपूट दिसेल. पृथ्वीवर स्थानिक वेळेप्रमाणे मंगळाचा क्षितिजावर उदय दिवसा सुमारे ११ वाजता होईल आणि त्याचा अस्त रात्री सुमारे १० वाजता होईल त्यामुळे जर आणखी निरिक्षणांनंतर असे लक्षात आले की हा धूमकेतू मंगळाला धडक मारणार आहे तर या घटनेचे निरिक्षण आपल्याला पृथ्वीवरून करता येणार नाही.
मंगळ आपल्या कक्षेत एका सेकंदात सरासरी सुमारे २४ किमी अंतर कापतो. म्हणजे १ लाख १७ हजार कि.मी. हे अंतर मंगळ सुमारे १ तास २१ मिनिटात कापेल. आता हे अंतर जरी खूप असले तरी या धूमकेतूचे मंगळाच्या इतक्या जवळून जाण्याचे परिणाम होऊ शकतील किंवा त्याने जर मंगळाला धडक दिली तर काय होऊ शकेल याची चर्चा वैज्ञानिक करू लागले आहेत. कारण जेव्हा हा धूमकेतू मंगळाच्या सर्वात जवळ असेल तेव्हा याचा वेग दर सेकंदाला सुमारे ५६ कि.मी इतका असेल. या संदर्भात आपल्याला दोन गोष्टींची आठवण ठेवावी लागेल. एक म्हणजे उल्का वर्षांवांना धूमकेतूंचा धुराळा कारणीभूत असतो आणि दुसरे म्हणजे पृथ्वीवर डायनोसॉरच्या अंताला धूमकेतू किंवा लघुग्रह कारणीभूत होता हे आता सर्वमान्य झाले आहे. असे मानण्यात येत की ६ कोटी ५० लाख वर्षांपूर्वी एक धूमकेतू किंवा लघुग्रहाने पृथ्वीला टक्कर दिली. या टकरीचा परिणाम म्हणजे मोठय़ा प्रमाणात धूळ वातावरणात फेकली गेली आणि या धुलिकणांचे एक आच्छादन पृथ्वीभोवती तयार झाले. जेणे करून पृथ्वीवर येणारा सूर्य प्रकाश खूप कमी झाला आणि त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वनस्पतींचा आणि त्याचबरोबर इतर सजीवांचा नाश झाला. तर असा लाईह फ्लॅश बॅक आपल्याला बघायला मिळेल का?
आपल्याला उल्का का दिसतात तर एखादा धूलीकण अतिवेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो आणि त्याचे वातावरणातील घटकांच्या घर्षणामुळे इतकी उर्जा तयार होते की तो अक्षरश पेट घेतो आणि आपल्याला आकाशात काही क्षण ही प्रकाश शलाका दिसते. हा कण पृथ्वीच्या वातावरणात पूर्णपणे जळून जातो.
आता हा धूमकेतू जरी मंगळावर पडला नाही तरी त्यातील धूलीकण मात्र विखूरलेले असतील आणि त्यातील काही धूलीकण मंगळाच्या वातावरणात शिरू शकतील. पण मंगळाचे वातावरण खूपच विरळ असल्याने कदाचित पृथ्वीवर दिसतो तसा आकर्षक उल्कावर्षांव तिथे दिसणार नाही परंतु अति वेगाने प्रवास करणाऱ्या या कणांचा मारा मंगळाभोवती फिरणाऱ्या आणि मंगळावर कार्यरत असलेल्या कृत्रिम उपग्रहांना झेलावा लागेल आणि त्यांची हानी होण्याची शक्यता असू शकेल. त्याचवेळी भारतीय मंगलयान पण मंगळाभोवती फिरत असेल. मंगळा भोवती परिक्रमा करत असणाऱ्या या यानांना अवकाशात अशा भागात नेता येऊ शकेल की जिथे या धूलीकणांचा मारा नसेल किंवा खूपच कमी असेल. मंगळाच्या पृष्ठ भागावर असलेल्या रोव्हर्स ना खूप दूर पर्यंत हलवणे शक्य नसले तरी त्यांचे सोलर पॅनल्स दुमडता येतील.सध्या या बाबतीत वैज्ञानिक फार चिंताग्रस्त नाहीत. उलट त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधीच चालून आली आहे. जशी नवीन माहिती मिळेल, त्याप्रमाणे पुढील योजना आखण्यात येतील.
लेखक हे मुंबई येथील नेहरू तारांगणाचे संचालक आहेत
विज्ञान पानासाठी लेख पाठवण्याचा पत्ता- निवासी संपादक, लोकसत्ता एक्सप्रेस हाऊस प्लॉट नं. १२०५/२/६ शिरोळे रस्ता, शिवाजीनगर पुणे-४ अथवा rajendra.yeolekar@expressindia.com
जिज्ञासा : मंगळ भेटीस येणाऱ्या धूमकेतूची इष्टापत्ती
सध्या आपण मंगळाची आणि आणि मंगळ मोहिमांची चर्चा करत असताना एक अशी बातमी आली आहे जी येत्या दोन वर्षांत महत्वाची आणि चर्चेचा विषय ठरण्याची खूप शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-04-2013 at 03:21 IST
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiositycomet comming to meet mars