२६/११च्या मुंबईवरील हल्ल्याचे फिल्मी दर्शन घडवणारा ‘अशोकचक्र’ नावाचा चित्रपट कधी येऊन गेला हे समजलं नाही.रामूच्या ‘द अ‍ॅटॅक ऑफ २६/११’बद्दल तसे नक्की होणार नाही. कसाबला फाशी दिल्याच्या तिसऱ्याच दिवशी पत्रकार परिषदेत रामूने या चित्रपटाबाबत स्वत:चा जमेल तसा बचाव करत माहिती दिली.
याच वेळी त्याने दाखवलेली या चित्रपटाची पहिली पंधरा मिनिटे रोमहर्षक होती. (पुढचाही सिनेमा दर्जेदार असू देत. ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’ या वेळचा रामू पुन्हा ‘दिसू’ देत.)
रामू या वेळी म्हणाला, हा एक संवेदनशील सिनेमा आहे, २६/११ला जे घडले त्याची दाहकता दाखवणे माझा हेतू नव्हे. या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार, कसाबने पोलिसांसमोर दिलेली साक्ष व पोलिसांकडून मिळवलेली शक्य ती माहिती या साऱ्यातून हा चित्रपट लिहिला व मांडला आहे.
अशा प्रकारच्या घटनांना शेवट नसतो, त्यामुळे चित्रपटाचा शेवट काय हे कसे सांगणार?
या विषयावर आपण चित्रपट बनवू नये असे मला काही वर्षांपूर्वी वाटले होते. पण जसजसा या विषयाचा मी खोलात जाऊन विचार केला तेव्हा एकूणच जगासमोर काही गोष्टी याव्यात असे वाटले.
२६/११मध्ये संजीव जस्वाल अजमल कसाबची, तर नाना पाटेकरने राकेश मारियाची भूमिका साकारली आहे.
पण हा चित्रपट नक्की कधी झळकणार हे रामूने सांगितले नाही. पराग संघवी या चित्रपटाचा निर्माता असून, मंदार दळवी सहनिर्माता आहे.

Story img Loader