एकाच वेळी तब्बल चार कलाकारांनी गाणे गायले असून मराठीमध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच झाल्याचे सांगण्यात येते. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी अलीकडेच एका धमाल गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या या गीताला स्वरबद्ध केले आहे ते मिलिंद इंगळे यांनी. यावेळी चित्रपटातीलच कलाकारांनी हे गाणे गायले.
त्यामध्ये मृणाल कुलकर्णी, सुनील बर्वे, सचिन खेडेकर आणि पल्लवी जोशी यांचा समावेश आहे.
या गाण्याबद्दल बोलताना मृणाल म्हणाली की अत्यंत वेगळ्या पद्धतीने हे गाणे चित्रित करण्यात आले असून आम्ही चौघांनी हे गाणे म्हणताना खूपच धमाल केली. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेले हे गाणे ‘रॅप’ पद्धतीचे असल्याने ते अनोखे असल्याचेही मृणालने सांगितले. या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच तो सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Story img Loader