रुपगर्विता श्रीदेवी तब्बल १० वर्षांनी पुन्हा रुपेरी पडद्यावर आपले नशीब ‘हिंग्लीश विंग्लीश’ या चित्रपटाच्या माध्यमातून अजमावीत आहे. प्रख्यात दिग्दर्शक आर बाल्की यांची पत्नी गौरी शिंदे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला असल्याने श्रीदेवी तसेच गौरी शिंदे यांचे भवितव्यही पणाला लागले आहे. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे या शुक्रवारी हा चित्रपट वगळता अन्य कोणत्याही बॅनरचा हिंदी चित्रपट प्रदर्शित होत नाही. केवळ मराठीमध्ये ‘साद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हिंग्लिश विंग्लिश या चित्रपटाच्या ओपनिंगला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास निर्माते तसेच दिग्दर्शकांना वाटत आहे. श्रीदेवीने या चित्रपटामध्ये एका सामान्य महिलेची भूमिका साकारली असून अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तिला इंग्रजी येत नसल्याने सुरुवातीला किती अडचणी येतात व त्यावर तिने कशा प्रकारे मात केली आहे हे या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे. बोनी कपूर यांच्याशी विवाह केल्यानंतर काही काळ श्रीदेवीने रुपेरी पडद्यावरून एक्झिट घेतली होती; पण नंतर माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत तिनेही पुन्हा बॉलीवूडमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीदेवीने या चित्रपटामध्ये अत्यंत अप्रतिम भूमिका केली असून ती सर्व प्रेक्षकांना भावणारी असल्याचे यानिमित्ताने बोलताना गौरी शिंदे यांनी सांगितले. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित बसून हा चित्रपट पाहता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader