तात्या विंचू आठवतोय? तोच तो तात्या विंचू तुफान गाजलेल्या ‘झपाटलेला’ या चित्रपटातील एक अतरंगी व्यक्तिरेखा. महेश कोठारे यांच्या सिद्धहस्त दिग्दर्शनातून साकारलेल्या चित्रपटाने त्याकाळी धमाल केली होती. १९९३ साली आलेल्या चित्रपटामध्ये महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयासह रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांतील तात्या विंचू हा बाहुला वापरण्यात आला होता. मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा तऱ्हेने एका बोलक्या बाहुल्याचा वापर करण्यात आल्याने या चित्रपटाने अनेकांना खिळवून ठेवले होते. चित्रपटात ‘ओम भागा भुर्गे भागानी भगोदरी भस्मासे येवोला ओम फट स्वाहा..’ या चित्रविचित्र मंत्रानेही प्रेक्षकांची चांगलीच करमणूक झाली होती. आता तब्बल १९ वर्षांनी महेश कोठारे हे ‘झपाटलेला’ या चित्रपटाचा पुढचा भाग तयार करीत असून तो थ्रीडी स्वरूपात असल्याचे सांगण्यात आले. अलीकडेच कर्जतच्या एन. डी. स्टुडिओमध्ये ‘झपाटलेला-२’ या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे तसेच अप्सरा गर्ल सोनाली कुलकर्णी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मी या चित्रपटासाठी खूपच उत्सुक व आश्वासक असून त्याला माझ्या वडिलांचा परिसस्पर्श लाभणार असल्याचे यानिमित्ताने बोलताना आदिनाथ याने सांगितले, तर सोनाली कुलकर्णी हिनेसुद्धा आपण या चित्रपटासाठी खूप आश्वासक असल्याचे नमूद केले. ‘नटरंग’नंतर सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर हिच्या मार्गदर्शनाखाली या चित्रपटामध्ये फक्कड लावणी करणार आहे. त्यामुळे सोनाली याबाबत खूपच एक्साइट असल्याचे तिच्याशी बोलताना जाणवले. लोकांना हा चित्रपट आवडेलच असा विश्वास महेश कोठारे यांनी व्यक्त केला.
थ्रीडीमध्ये झपाटलेला भाग-२’
तब्बल १९ वर्षांनी महेश कोठारे हे ‘झपाटलेला’ या चित्रपटाचा पुढचा भाग तयार करीत असून तो थ्रीडी स्वरूपात असल्याचे सांगण्यात आले. अलीकडेच कर्जतच्या एन. डी. स्टुडिओमध्ये ‘झपाटलेला-२’ या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला.
आणखी वाचा
First published on: 15-10-2012 at 03:29 IST
मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cut it zapatlela tatya vinchu mahesh kothare adinath kothare sonali kulkarni marathi movie