चाकण परिसरातील खराबवाडी येथे गॅसगळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मांगीलाल चौधरी (वय-३५) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर ओमप्रकाश लोहा (वय-२४) हा गंभीर जखमी झाला असून ८० टक्के भाजल्याचं पोलिसांनी सांगितलं. पहाटे भाजी आणण्यासाठी ते दोघे जाणार होते. तेव्हा, शेजारी राहाणारा मयत मांगीलाल जखमी ओमप्रकाशकडे आला होता. त्याच वेळी ओमप्रकाश याने सिगारेट पेटवली आणि स्फोट झाला. बाहेर थांबलेल्या मांगीलाल चा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मांगीलाल चौधरी वय-३५ आणि जखमी ओमप्रकाश लोहा वय-२४ हे दोघे शेजारी रहात होते. ओमप्रकाश हा एकटा राहात असून त्याचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे. तर मयत मांगीलाल कुटुंबासह वास्तव्यास होता, त्यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. दोघे ही एक दिवसाआड भाजी आणण्यासाठी सोबत जायचे.
बुधवारी रात्री ओमप्रकाशने गॅसवर स्वयंपाक केला जेवण करून तो झोपी गेला, रात्रभर गॅस गळती झाली. पहाटे भाजी आणण्यासाठी जायची असल्याने मांगीलाल त्याला बोलवण्यास आला. तो दरवाजात थांबला, तेव्हा ओमप्रकाश ने सिगारेट पेटवली तेवढ्यात भीषण स्फोट झाला. यात बाहेर थाम्बलेल्या मांगीलाल याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला तर ओमप्रकाश हा गंभीर जखमी झाला आहे. या स्फोटात खिडक्या आणि दरवाजेही फुटले आहेत.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत.