रुचकर आणि शॉपिंग विशेष
स्वप्निल जोशी – response.lokprabha@expressindia.com
घर, गाडी, सोनं, टीव्ही, फ्रिज, एसी.. ही झाली सणासुदीचा मुहूर्त साधून केली जाणारी खरेदी. त्यासाठी खास बजेट ठरवलं जातं, अभ्यास केला जातो, परिचितांचे सल्ले घेतले जातात, १०० रिव्ह्य़ूज वाचले जातात, यूटय़ूब पालथं घातलं जातं आणि त्यानंतरच हजारो पर्यायांतून नेमका आपल्या गरजा भागवणारा पर्याय हुडकून काढला जातो. पण याव्यतिरिक्तही अनेक लहान-मोठी उपकरणं कधी उत्साहाच्या भरात, तर कधी आधीच्या वस्तू बिघडल्यामुळे घरात प्रवेश करतात. अशी उपकरणं खरेदी करताना फारसं ‘संशोधन’ झालेलं नसतं आणि नेमकी तिथेच फसगत होते. त्यामुळे लहान वाटणाऱ्या पण दैनंदिन जीवनात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या वस्तू खरेदी करताना लक्षात ठेवण्याचे निकष जाणून घेऊ या..

वॉटर प्युरिफायर

आजकाल वॉटर प्युरिफायर सर्रास खरेदी केला जातो. या उपकरणाची निर्मिती करणाऱ्या कंपन्या नवनवीन तांत्रिक संज्ञांचा भडिमार करून आपले उत्पादन अधिक दर्जेदार आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. थेट बाजारात जाऊन वॉटर प्युरिफायर खरेदी करण्याआधी घरात येणारे पाणी किती स्वच्छ आहे, हे तपासावे. पाण्यातील बॅक्टेरिया, टीडीएस, पीएच स्केल अशा विविध गोष्टींची माहिती घ्यावी आणि त्याआधारे आरओ, यूव्ही आणि यूएफमधील कोणते तंत्र असलेला वॉटर प्युरिफायर तुमच्यासाठी आवश्यक हे ठरवावे. पाण्याच टीडीएस म्हणजे मिनरल्सचे प्रमाण हे  ३०० पेक्षा अधिक असेल तर आरओ टेक्नॉलॉजी असणाऱ्या प्युरिफायरचा विचार करावा, अन्यथा यूव्ही किंवा यूएफची निवड करावी. यूव्ही प्युरिफायर हे व्हायरस आणि बॅक्टेरिया पाण्यामध्येच नष्ट करतात तर यूएफ प्युरिफायर व्हायरस आणि बॅक्टेरिया गाळून वेगळे करतात. आरओ प्युरिफायरमध्ये १० लिटर पाण्यातून तीन ते चार लिटरच पाणी स्वच्छ निघते व बाकी पाणी पिण्यायोग्य नसते, त्यामुळे टँकच्या क्षमतेचाही विचार करावा. बाजारात साधारण पाच हजार रुपयांपासूनचे प्युरिफायर उपलब्ध आहेत.

अवन (ओव्हन)

अवन खरेदी करताना त्याचा प्रकार खूप महत्त्वाचा ठरतो. बाजारात ओटीजी, मायक्रोव्हेव आणि मायक्रोव्हेव विथ कन्व्हेन्शन या प्रकारचे अवन उपलब्ध आहेत. ओटीजी म्हणजे ओव्हन टोस्टर ग्रिल. याचा वापर नावाप्रमाणे बेकिंग किंवा ग्रिल करण्यासाठी केला जातो. आपल्याला केक, कुकीज किंवा तंदूरसाठीच अवन हवा असेल तर ओटीजी हा योग्य पर्याय आहे. परंतु यावर सर्वसामान्य पदार्थ शिजवण्याचे किंवा गरम करण्याचे पर्याय उपलब्ध नसतात. मायक्रोवेव्ह या प्रकारात आपल्याला ओटीजीप्रमाणे बेकिंग किंवा ग्रिल करता येत नाही तर फक्त कुकिंग म्हणजे पदार्थ शिजवणे किंवा गरम करणे एवढाच वापर होऊ शकतो. आपल्याला बेकिंग आणि कुकिंग असे दोन्ही पर्याय आवश्यक असल्यास आपण मायक्रोव्हेव विथ कन्व्हेन्शन हा पर्याय निवडावा ज्यात दोन्ही कामे एकाच उपकरणाद्वारे केली जाऊ शकतात. ओटीजी प्रकारचे अवन हे साधारणपणे १० हजार रुपयांपासून, तर इतर दोन प्रकार साधारण १२ हजारांपासून उपलब्ध आहेत.

स्पीकर्स

स्पीकर्स खरेदी करताना आपली गरज ओळखून योग्य उत्पादनाची निवड करावी. आपल्याला जर अधिक बेस किंवा साउंड डेप्थ अपेक्षित असेल, तर तर स्पीकर्स विथ सबवुफरची निवड करावी. आपल्याला सामान्य टीव्हीला किंवा म्युझिक सिस्टीमला केवळ अधिक आवाजाची जोड द्यायची असेल, तर बाजारात साऊंडबारचे पर्याय उपलब्ध आहेत त्यांचा विचार करू शकता. याचबरोबर ब्लूटूथ स्पीकर्समध्येसुद्धा आजकाल दर्जेदार पर्याय अनेक नामांकित कंपन्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. ब्लूटूथ स्पीकर्स हे आपण आपल्याबरोबर कुठेही सहज घेऊन जाता येतात. त्यामुळे त्यांना सध्या जास्त मागणी आहे. ब्लूटूथ स्पीकर्स  बॅटरी आणि आवाजाची क्षमता तपासून मगच खरेदी करावेत. चांगल्या दर्जाचे स्टिरिओ स्पीकर्स बाजारात साधारणपणे तीन हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत.

हेडफोन

हेडफोन्समध्ये टीडब्ल्यूएस, इन-इअर, ओव्हर-द-इअर आणि ब्लूटूथ असे प्रकार उपलब्ध आहेत. यात टीडब्ल्यूएसम्हणजे ट्रूली वायरलेस स्टिरिओ आणि ब्लूटूथ हे दोन पर्याय सध्या जास्त चर्चेत आहेत आणि त्यांना मागणीसुद्धा जास्त आहे. यात मुख्य फरक म्हणजे टीडब्ल्यूएस प्रकारात दोन्ही इअरबड्स जोडण्यासाठीही केबलचा उपयोग केला जात नाही, तर ब्लूटूथ प्रकारात इअरबड्सना जोडण्यासाठी केबलचा वापर केलेला असतो. या दोन्ही वायरलेस प्रकारांतील हेडफोन्स खरेदी करताना जर आपण कॉलिंग अधिक करत असू तर आजुबाजूचे आवाज दूर ठेवण्याची क्षमता जरूर विचारात घ्यावी; अन्यथा कॉलवर बोलताना समोरच्या व्यक्तीला बरेचदा आपल्या आजूबाजूचेच आवाज आपल्या आवाजापेक्षा अधिक ऐकू जातात. इन-इअर आणि ओव्हर-द-इअर या प्रकारातील हेडफोन्स आपल्या आवडीनुसार घ्यावेत. यातही जर आपल्याला प्रवासात किंवा ‘रफ-टफ’ वापरासाठी हेडफोन्स हवे असल्यास ब्रॅण्डेड केबल असणाऱ्या हेडफोन्सचा विचार करावा.

एअर प्युरिफायर

सध्या हवेतील प्रदूषण आणि त्यामुळे बळावणारे श्वसनाचे आजार यावरील इलाज म्हणून घरातसुद्धा एअर प्युरिफायर बसवले जातात. एअर प्युरिफायर हे काहीसे महागडे उपकरण असल्यामुळे ते खरेदी करताना काही तांत्रिक बाबी समजून घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण ज्या उद्देशाने उपकरण घेतले आहे, तो साध्य होऊ शकतो. प्युरिफायर घेताना त्याचे सीएडीआर म्हणजेच क्लीन एअर डिलिव्हरी रेटिंग जरूर तपासून घ्यावे. हे रेटिंग जेवढे जास्त तेवढी हवा शुद्ध करण्याची क्षमता जास्त असते. हे रेटिंग साधारणपणे धूळ, धूर आणि धूलिकण यावर ठरवले जाते. एअर प्युरिफायर घेताना फिल्टर्सचासुद्धा विचार करायला हवा. सर्वसाधारण घरांमध्ये हेपा फिल्टर असणारा प्युरिफायर पुरेसा ठरतो. क्षेत्रफळाचासुद्धा विचार करावा आणि गरज असल्यास एकापेक्षा अधिक प्युरिफायर घ्यावेत. साधारणपणे ३०० चौरस फूट जागेत १४० सीएडीआरचा प्युरिफायर पुरेसा ठरतो.

Story img Loader