मी शाळेत शिकत असताना माझ्याकडे ब्लेझर नव्हता आणि मला थंडीत स्वेटर घालून शाळेत यायला लाज वाटत होती, अशी कबुली रिझव्र्ह बँकेचे डॉ. गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. दिल्ली पब्लिक स्कूल या नवी दिल्लीतील आरके पुरममधील त्यांच्या शाळेत आले असताना त्यांनी आपल्या आठवणीना उजाळा दिला. शिक्षक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी केलेल्या स्वागताने भारावलेले राजन आपल्या जुन्या आठवणीत रमले व ते ज्या बाकावर दहावीच्या वर्गात बसत असत त्या बाकावर जाऊन बसले. अत्यंत भावूक स्वरात राजन यांनी आपल्या शालेय जीवनातील अनेक आठवणीना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘मी सामन्य कुटुंबातून आलो. जिथे मर्यादित आवक असल्याने गरजा ही मर्यादित ठेवण्याला प्राथमिकता होती. म्हणून माझ्याकडे ब्लेझर नव्हता आणि मला ब्लेझर घालण्याची तीव्र इच्छा होत असे. माझे वडिल या शाळेचा प्रवेशअर्ज मिळण्यासाठी रात्री रांगेत उभे राहिले व १९७४ मध्ये इयत्ता पाचवीत मी दाखल झालो. आणि शाळा सोडताना शाळेने मला एक उत्तम नागरिक म्हणून घडविले.’’ आज अर्थव्यवस्थेतील बेसूरपणा अचूक ओळखणारे राजन शाळेत असताना शाळेच्या वाद्य वृंदाचा एक भाग होते व ध्वजसंचालनाच्या कवायतीत वाद्य वृंदात ते बेंजो वाजवत असत. ‘‘संथ लयीत वाजवणे सहज जमत असे; पण द्रुत लयीत गोंधळ होत असल्यामुळे पुढे मी वाद्यवृंद सोडला. शाळेत असताना कधी शेफ तर कधी ऑर्केस्ट्राचा कंडक्टर होण्याची स्वप्ने आपण पहात असू. परंतु देशाच्या मध्यवर्ती बँकेचा प्रमुख होण्याचा विचारही शाळेत असताना मनाला शिवाला नाही. कारण तेव्हा शाळेतल्या विद्यार्थ्यांला रिझव्र्ह बँकेचा प्रमुख कोण आहे हे ही ठाऊक नव्हते. आज परीस्थीते खूपच वेगळी आहे. शाळेत असतानाच विद्यार्थी आपले लक्ष्य निश्चित करतात व त्या लक्ष्याचा पाठ पुरावा करतात. हे अर्थ व्यवस्थेतील झालेल्या बदलामुळे शक्य झाले आहे,’’ असेही ते म्हणाले.
शाळेत असताना मध्यवर्ती बँकेचा प्रमुख होण्याचा विचारही मनाला शिवला नाही: डॉ. राजन
मी शाळेत शिकत असताना माझ्याकडे ब्लेझर नव्हता आणि मला थंडीत स्वेटर घालून शाळेत यायला लाज वाटत होती
First published on: 28-01-2014 at 07:44 IST
Web Title: Dont even thought in school days that i will become a central bank head dr rajan