अभिनेता रणवीर सिंगचे चित्रपट म्हणजे चाहत्यांसाठी एकप्रकारे मेजवानीच असते. त्यामुळे त्याच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. रणवीरचा असाच आगामी ‘गली बॉय’ हा चित्रपट आहे. २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात रणवीर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीरमधील अभिनयाव्यतिरिक्तचे गुणही पाहायला मिळाले. सध्या ‘गली बॉय’मधील नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.
नुकतंच प्रदर्शित झालेलं हे गाणं स्वत: रणवीरने गायलं असून या गाण्यातून समाजातील विषमतेवर भाष्य करण्यात आलं आहे. कोई मुझको यु बताए, क्यों ये दूरी और मजबुरी असे या गाण्याचे शब्द आहेत. २ मिनीट ३१ सेकंदाचं हे गाणं रॅप प्रकारातलं असून यामध्ये गरीब आणि या गरीबीशी संघर्ष करणाऱ्या व्यक्ती दाखविण्यात आल्या आहेत.
ऋषी रिच यांचं म्युझिक असलेलं हे गाणं जावेद अख्तर आणि डिव्हाईन यांनी शब्दबद्ध केलं आहे. यापूर्वी ‘गली बॉय’मधील ‘असली हिप हॉप’ आणि ‘अपना टाईम आयेगा’ ही गाणी प्रदर्शित झाली आहेत.