वेगाने वाढणारी ई-पेठ (ई-कॉमर्स) व बँका यांच्यातील भागीदारीविषयी भाष्य करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी या नवागत उद्योगाचा बँकांनी आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी अधिकाधिक वापर करून घ्यावा, असे आवाहन केले. मुंबईत मंगळवारी बँकिंग तंत्रज्ञान परिषदेच्या व्यासपीठावरून खान यांनी या विषयावरील आपले मत मांडले.
ई-कॉमर्स आणि बँकांतील भागीदारीविषयक खान यांनी या आधीही भाष्य केले होते. भारतीय उद्योग महासंघामार्फत (सीआयआय) मंगळवारी मुंबईत आयोजित बँक परिषदेतील भाषणातही त्यांनी यावरच भर दिला. या वेळी ‘नॅशनल पेमेन्ट्स कॉपोरेशन ऑफ इंडिया’चे (एनपीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी ए. पी. होटा, आयडीबीआय बँकेचे अध्यक्ष एम. एस. राघवन हेही उपस्थित होते.
ई-कॉमर्स संकेतस्थळे व बँका यांच्यात एक समान धागा विणला जावा व तो ग्राहक म्हणून प्रत्येकाच्या हितार्थ असावा, असे खान म्हणाले. बँकांनी यापूर्वी दूरसंचार क्षेत्राच्या वाढीमार्फत व्यवसाय वृद्धीची संधी मिळविली आहे व आता ई-कॉमर्स हे नवे व्यासपीठ त्यांच्यासाठी उपलब्ध झाले आहे, तेव्हा त्याचा लाभ बँक क्षेत्राने उचलायला हवा, असे आवाहनवजा प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
पेमेंट बँकांबाबत खान म्हणाले की, अशा पद्धतीच्या बँका प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकसंख्येला प्राथमिक वित्तीय सेवा देण्यासाठी असतील. बँक प्रतिनिधीसारखे पारंपरिक पर्याय या बँका त्यांच्या व्यवसाय विस्तारासाठी अनुसरणार नाहीत; तर सध्याचे मोबाइलधारकांचे वाढते प्रमाण पाहता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कार या नवागत बँका भविष्यात करताना दिसतील, असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर या माध्यमातून होणाऱ्या गैरव्यवहाराबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. स्मार्टफोन आणि त्याबरोबर येणारे जलद इंटरनेट, जीपीएस, कॅमेरा यांची जोड ही एकूणच बँक उद्योगाच्या वाढीसाठी पूरक ठरेल, असेही ते म्हणाले.

बँकांना नवा ग्राहक वर्ग खुणावतोय..
वेगाने वाढणारी ई-कॉमर्स बाजारपेठ व वित्तपुरवठा करणाऱ्या बँका यांच्या दरम्यान सहकार्य हवे, अशी आवश्यकता बँक तंत्रपरिषदेच्या निमित्ताने ‘पीडब्ल्यूसी-सीआयआय’ने तयार केलेल्या अहवालातही मांडण्यात आली आहे. ई-कॉमर्स व्यासपीठाच्या माध्यमातून ग्राहकवर्ग मिळविण्याचा बँकांना आणखी एक मार्ग उपलब्ध झाला असून याद्वारे बँकांनी निमशहरातील ग्राहकांना सेवा देण्याचे उद्दिष्ट राखावे, असे प्रतिपादन या अहवालात करण्यात आले आहे.

Story img Loader