सोळाव्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपट पटकवणाऱ्या मार्टिना हिंगिसची कारकीर्द दुखापतींनी व्यापलेली. याच कारणासाठी तिने दोनदा निवृत्तीचा निर्णय घेतला खरा पण खेळाची आवड तिला स्वस्थ बसू देईना. दुसरीकडे सानिया मिर्झाची कारकीर्दही दुखापतींनीच ग्रासलेली. त्यात वादविवादांनी भरच घातलेली. या दोघींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला सगळी नकारात्मकता नाकारून नव्या जोमाने खेळायला सुरूवात केली. टेनिसच्या विश्वात या जोडीने वुहान स्पर्धेच्या जेतेपदासह एकत्रित सातव्या जेतेपदाची केलेली कमाई हा त्याचाच परिणाम म्हटला पाहिजे. दुहेरी हा अत्यंत वेगवान आणि तंदुरुस्तीची कसोटी पाहणारा प्रकार. खेळताना स्वत:बरोबर सहकारी खेळाडूचा खेळ, त्याचे कच्चे दुवे आणि शक्तिस्थान समजून घ्यावे लागते. खणखणीत फोरहँड सानियाच्या खेळाची ताकद तर सखोल तांत्रिक अभ्यासासह नेटजवळून सुरेख खेळ हे मार्टनिच्या खेळाचे वैशिष्ट्य. परस्परपूरकतेसह एकमेकींच्या कच्या दुव्यांवर मात करत या जोडीचा विजयरथ घोडदौड करत आहे. या दोघींनी वयाची तिशी पार केली आहे. त्यामुळे खेळ आणि व्यक्तिमत्वात् प्रगल्भता जाणवते, प्रदीर्घ अनुभव त्यांच्या साथीला आहे. या दोघींची आगेकूच सुरु असताना प्रतिस्पर्धी मंडळींचा दर्जा घसरला आहे हे त्यांच्या सहज मिळणाऱ्या विजयातून अधोरेखित होते. सातत्याने प्रवास, नवीन वातावरण, कोर्टचे बदलणारे स्वरूप या सगळ्या आव्हानांस टक्कर देत, या जोडीने जपलेली जिंकण्याची ऊर्मी कौतुकास्पद आहे. देशात क्रीडा संस्कृती अस्तित्वात नसताना सानियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर राखलेले सातत्य अचंबित करणारे आहे. यशोशिखर गांठण्यासाठी वय, अडचणी, आव्हाने यापेक्षाही सकारात्मक वृत्ती महत्वाची ठरते याचा वस्तुपाठ या जोडीने ठेवला आहे.
विजयी सप्तक
सोळाव्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपट पटकवणाऱ्या मार्टिना हिंगिसची कारकीर्द दुखापतींनी व्यापलेली. याच कारणासाठी तिने दोनदा निवृत्तीचा निर्णय घेतला खरा पण खेळाची आवड तिला स्वस्थ बसू देईना.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 04-10-2015 at 16:09 IST
Web Title: E edit on sania mirza martina hingis victory