टाळ्यांचा कडकडाट कवीला आतला आवाज कानावर पडू देत नाही. राहत इंदोरी यांचे असे झाले होते किंवा काय, याबाबत चाहत्यांगणिक मतमतांतरे असतील..

Who collected penalty of 60 lakhs in month from people who throw garbage
कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली कोणी केली?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
Which schools in Wardha district have water that is dangerous to drink
धोकादायक! ‘या’ शाळांतील पाणी पिण्यास घातक, जीवावर बेतणार…
Yashomati Thakur warned that distributing trishuls could lead to violence and threaten law and order
अमरावती जिल्ह्यात काही संघटनाकडून शस्त्रांचे वाटप, यशोमती ठाकूर यांचा आरोप
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण

निवांत खिडकीतून पाहात कोरडे राहून पाऊस अनुभवणेदेखील तितकेच आनंदाने ओले करणारे असते. राहत इंदोरींच्या कवितेचा असा निवांतओला आनंद दुर्लक्षित राहिला. सार्वजनिक पावसात भिजण्याची सवय झालेल्यांनी त्यांच्या काव्याचे तरल तुषार अनुभवलेच नाहीत.

हा जितका काव्यरसिकांचा दोष, तितकाच कवीचाही..

गदिमांच्या ‘जोगिया’तील नायिका ‘ही तिथी पाळते व्रतस्थ राहुनि अंगे’ असे म्हणते. ‘जोगिया’ साठच्या दशकातील. सध्याचा काळ हे असे व्रतस्थ राहू देत नाही. तसा प्रयत्न जरी केला तरी तो करणाऱ्याच्या कपाळावर याच्या किंवा त्याच्या नावाचा मळवट भरण्यासाठी समाज उत्सुक असतो. परिणाम असा की त्यामुळे मळवटाशिवायचे चेहरे आपल्याला ओळखता येत नाहीत हल्ली. शायर राहत इंदोरी यांच्या निधनाची बातमी मंगळवारी आली आणि या सत्याची विदारक जाणीव झाली. कारण ही निधनवार्ता आल्यापासून ‘ये देश किसी के बाप की जागीर नहीं’ हे(च) ऐकून ऐकून कान किटले.. जणू काही याखेरीज राहत यांनी काही लिहिलेच नाही. या सत्याचा दुसरा दुष्परिणाम असा की यामुळे मळवटाचा रंग पाहूनच आजकाल समाज एखादी व्यक्ती आपली की ‘त्यांच्यातली’ अशी वर्गवारी करून टाकतो. एकदा का ती झाली की मग त्यास एक घटक डोक्यावर घेणार आणि दुसरा पायदळी तुडवणार. मध्ये काहीच नाही. या अशा बालिश समाजात राहत इंदोरी यांच्यासारखे अनेक होरपळतात. ‘मेरी ख्वाईश है की आँगन में न दीवार उठे, मेरे भाई, मेरे हिस्से की ज़्‍ामीं तू रख ले’, अशी तरल शायरी लिहिणारे राहत यांच्याच अंगणात मग भिंत बांधली गेली आणि ती बांधू देणारे राहत इंदोरी मग त्याच भागात अडकून गेले. पृथ्वीवरच्या या क्षुद्र भिंतींना ओलांडून क्षितिजाच्या पल्याड ते गेल्यावर तरी त्यांच्या काव्याचा रसास्वाद घ्यायला हवा.

मराठीत ‘मस्ती’ हा शब्द ‘माज’ या शब्दास समानार्थी म्हणूनही वापरतात. तथापि यांतील सूक्ष्म भेद सुरेश भट यानी उलगडून दाखवला. ‘काळानुरूप उतरत जातो तो माज आणि उत्तरोत्तर चढत जाते ती मस्ती’, अशी भट यांची मार्मिक टिप्पणी. राहत इंदोरी यांना ही अशी कवीपणाची (उत्तर भारतीय) मस्ती होती. उत्तर भारतात काव्यानंद हा एक सामाजिक सोहळा असतो. हिंदी भाषकांसाठी त्या प्रांतात ‘कवितापाठ’ होतात आणि उर्दू प्रेमींसाठी मुशायरे. त्यामुळे कविता अलगदच ‘वाहवा.. वाहवा’च्या चीत्कारांत जोजवत अवतरते. सुमित्रानंद पंत, हरिवंशराय बच्चन आदी अनेकांनी या ‘कवितापाठां’स मोठय़ा उंचीवर नेऊन ठेवले. हरिवंशराय तर आपली कविता गात. काव्याच्या अशा सामुदायिक आविष्कारात फारशा सहभागी न झालेल्या एखाद्याच महादेवी वर्मा. या परंपरेमुळे दहा दहा हजार काव्यप्रेमींच्या चीत्कारांत हिंदी कविता मदमस्त सुंदरीने ‘कॅट वॉक’ करावा त्या डौलात समोर येते. राहत इंदोरींची ओळख आपल्यातील अनेकांना ही अशी आहे. यात ना आपला दोष ना राहत यांचा. अशा पद्धतीत बरोबरीच्या मित्रांनी एकमेकांच्या सहवासात पाऊस अनुभवावा, तसे रसिक कविता अनुभवतात. पण पावसाच्या प्रत्येक सरीचा आनंद त्या अंगावरून ओघळू देण्यातच असतो असे नाही. निवांत खिडकीतून पाहात कोरडे राहून पाऊस अनुभवणेदेखील तितकेच आनंदाने ओले करणारे असते. राहत इंदोरीच्या कवितेचा असा निवांतओला आनंद दुर्लक्षित राहिला, असे म्हणायला हवे. हा जितका काव्यरसिकांचा दोष, तितकाच राहत इंदोरी यांचाही.

वास्तविक राहत इंदोरी यांच्या अनेक कविता तरल म्हणता येतील अशा आहेत. पण सार्वजनिक पावसात भिजण्याची सवय झालेल्यांनी हे तुषार अनुभवलेच नाहीत. ‘किसने दस्तक दी, दिल पे, ये कौन है, आप तो अन्दर हैं, बाहर कौन है,’ असे जेव्हा राहत लिहितात तेव्हा ते कुठल्या एका रंगाचे नसतात. त्यांच्यातला शुद्ध कवी जागा असतो आणि तो आपल्याला सांगतो: ‘कहीं अकेले में मिल कर झिंझोडम् दूँगा उसे, जहाँ जहाँ से वो टूटा है जोडम् दूँगा उसे’. ‘बाप की जागीर नहीं,’ या त्यांच्या ओळींनी त्यांना टाळ्या मिळाल्या असतील. त्या टाळ्यांनी त्यांना क्रांतिप्रसवतेचा आनंदही दिला असेल. पण परिणामकारकतेच्या रकान्यात ‘नींद से मेरा ताल्लुकम् ही नहीं बरसों से, ख्म्वाब आ आ के मेरी छत पे टहलते क्यूं हैं’ या त्यांच्या ओळी टाळ्यांच्या गर्जनेपेक्षा अधिक जाग्या करणाऱ्या आहेत. ‘रोजम् तारों को नुमाइश में खलल पडम्ता है, चाँद पागल है अँधेरे में निकल पडम्ता है,’ राहत यांची अशी किती तरी हळवी शायरी अधिक कलात्मक आणि उत्कट आहे.

मंचीय कवितेचे म्हणून एक चातुर्य असते. कलात्मकतेपेक्षा तेथे महत्त्व असते ते कारागिरीस. राहत यांच्यातील कवी अलीकडच्या काळात त्यांच्यातील या कारागिरीच्या प्रेमात अधिक पडला, असा वहीम घेण्यास जागा आहे. कोणत्याही खऱ्या, जिंदादिल कवीप्रमाणे राहत यांच्या काव्याची ताकद ही त्यांच्या डावेपणात आहे. उजवेपण आहे त्या व्यवस्थेचे गोडवे गाण्यात आणि त्यात स्वत:चे कसे भले करता येईल याची समीकरणे जुळवण्यात मग्न असताना कवीचे डावेपण रसिकांना वास्तवाचे भान आणते. ‘शाखों से टूट जाएं वो पत्ते नहीं हैं हम, उन आँधियों से कह दो औकात में रहें’ असे खणखणीतपणे बजावणारे राहत मग दुष्यंतकुमार यांच्या ‘एक पत्थर तो तबीयतसे उछालो यारों’शी नाते जोडतात. ही त्यांची कविताही तितकीच आनंद देऊन जाते. सांप्रत काळी बहुतांश कलाकार आपली कारागिरी सत्ताधीशांभोवती महिरप काढण्यातच खर्च करत असताना सामाजिक, राजकीय मुद्दय़ांवर काहीएक भूमिका घेणारे राहत नक्कीच दखलपात्र ठरतात. ‘सच बात कौन है जो सर-ए-आम कह सके, मैं कह रहा हूँ मुझ को सजम देनी चाहिए,’ असे लिहिणारे राहत म्हणून प्रामाणिक आणि अन्यांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरतात. खरे म्हणजे अशा स्थानावरच्या कवीने गुरुत्वाकर्षणावर मात करायला हवी. आणि आपल्या चाहत्यांना स्वत:ची उंची वाढवणे भाग पाडायला हवे. पण या मुद्दय़ावर राहत कमी पडतात की काय असा प्रश्न पडतो.

याचे कारण मंचीय कवितेत कर्कशपणाही अनेकदा अंगभूत असतो. तो त्यांच्या कवितेतून नाही पण सादरीकरणातून जाणवू लागला होता. त्यात त्यांची वर उल्लेखलेली ‘किसी के बाप की जागीर नहीं’ सादर झाल्यावर तर ते कवींमधले ‘जंजीर’ किंवा ‘दीवार’कालीन अमिताभ बच्चन भासू लागायचे. ही अशी प्रतिमा ही त्या व्यक्तीच्या प्रतिभेवर मर्यादा आणत असते. टाळ्यांचा कडकडाट मग आतला आवाज कानावर पडू देत नाही. राहत यांचे असे झाले होते किंवा काय, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या चाहत्यागणिक कदाचित वेगळे मिळेल. म्हणजे याबाबत दुमत असू शकेल. मात्र या अशा काव्यचव्हाटय़ांमुळे कवी आडवा पसरत जातो आणि त्याचे खोल जाणे थांबते, यावर मात्र सर्वाचे एकमत असेल. आता तर राहत इंदोरी या सगळ्याच्या पलीकडे गेल्यावर याची चर्चा करणे निर्थक मानले जाईल. ते नसतील पण त्यांची कविता आपल्या सोबतीस असेल.

महादेवी वर्माप्रमाणे आपल्या कवितेस मंचीय मोहापासून सातत्याने दूर ठेवणारे व्रतस्थ कवी आरती प्रभु यांची एक सुंदर कविता आहे. ‘तारांवरी पडावा केंव्हा चुकून हात, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा’. कवीस हवा असणारा हा ‘विस्तीर्ण पोकळीचा गंधार’ त्यांना मंचावर गवसला की नाही, माहीत नाही. पण त्यांची कविता मात्र आपणास निश्चित त्यानजीक घेऊन जाते. ‘लोकसत्ता’ परिवाराची या जातिवंत कवीस आदरांजली.

Story img Loader