रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार मनीष जैन यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने विद्यमान खासदार हरीभाऊ जावऴे यांची जाहीर झालेली उमेदवारी मागे घेऊन विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांच्या नावाची सोमवारी घोषणा केली.
हरिभाऊ जावळे यांनी प्रचाराला सुरुवात केली असताना त्यांची अचानक उमेदवारी मागे घेण्यात आली. उमेदवारी नाकारण्यात आल्यावरही भाजपचे राष्ट्रीय नेते जसवंत सिंह यांच्याप्रमाणे बंडखोरी न करता पक्षाचा निर्णय मला मान्य आहे, अशी भूमिका हरीभाऊ जावळे यांनी मांडली.
राष्ट्रवादीचे खासदार इश्वर जैन यांचे चिरंजीव मनीष जैन यांना रावेरमधून राष्ट्रवादीतर्फे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे निवडणूक ‘अर्थपूर्ण’ होणार हे स्पष्टच आहे. मनिष जैन यांच्या धनशक्तीपुढे टिकाव धरणे हे हरीभाऊ जावळे यांच्यासाठी अशक्य होते. त्यातच एकनाथ खडसे यांचे दिवंगत पूत्र निखिल यांचा जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहून मनिष जैन यांनी पराभव केला होता. त्यावेळी आमदार सुरेश जैन यांच्यासह जिल्हातील सर्व धनशक्ती जैन यांच्यापाठीमागे उभी राहिल्यामुळे खडसे यांच्या मुलाचा पराभव झाला होता. त्यानंतर काही काळाने निखील यांनी आत्महत्या केली. या पार्श्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसाठी सुनेला उमेदवारी मिळावी यासाठी एकनाथ खडसे आग्रही होते. तथापि भाजपने स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कौल घेऊन विद्यमान खासदार हरीभाऊ जावळे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जावळे यांची उमेदवारी जाहीरही झाली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने रावेरमधून मनिष जैन यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपमधील चक्रे फिरून जावळे याच्याजागी एकनाथ खडसे यांच्या सुनेला उमेदवारी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. याबाबत जावळे यांनी पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य आहे मात्र त्याबाबतची कारणेही आपल्याला कळणे आवश्यक असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले तर खडसे यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक परिस्थितीतील बदल लक्षात घेऊन भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरल्यामुळे आपल्या सुनेला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रावेरमध्ये खडसेंच्या सुनेला उमेदवारी!
रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार मनीष जैन यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने विद्यमान खासदार हरीभाऊ जावऴे यांची जाहीर झालेली उमेदवारी मागे घेऊन विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांच्या नावाची सोमवारी घोषणा केली.
First published on: 25-03-2014 at 05:27 IST
Web Title: Eknath khadse pulls all stops for daughter in laws nomination